Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीनाशिक शहरात दोन ठिकाणी छापा , दहा लाखाहून अधिक किमतीचा गुटखा जप्त

नाशिक शहरात दोन ठिकाणी छापा , दहा लाखाहून अधिक किमतीचा गुटखा जप्त

नाशिक (प्रतिनिधी)– अन्न औषध प्रशासनाने नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात लाखों रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा अर्थात विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा , खर्रा, मानवी स्वास्थ्यास अपायकरक घटक मिश्रित केलेले हानिकारक पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

अन्न आणि औषध प्रशासन, नाशिक कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरात दोन ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. एफ डी एने दिलेल्या माहितीवरून पहिल्या कारवाईत सातपूर येथील महाराष्ट्र हौसिंग कॉलनी मधील पवन संजय कोतकर यांच्या येथे धाड टाकली.या ठिकाणी विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा ११,२७२ रूपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले, हा साठा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.पाटील यांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पवन संजय कोतकर, यांचेविरुध्द सातपुर पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम ३२८ व अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातपुर पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

तसेच बुधवारी १३ डिसेंबरला पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बाळकृष्ण निवास, ४६१४, बाळकृष्ण सदन, उन्नती हायस्कुलसमोर, पेठरोड, नाशिक या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी साठवणुक केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयाचे पथक हे कार्यवाहीसाठी घटनास्थळी गेले असता सदरचे ठिकाण हे कुलूपबंद आढळून आले. आजुबाजूला चौकशी केली असता, जागामालक शिवाजी मधुकर पवार हे उपस्थित झाले. त्यांचा जबाब नोंदविला असता सदरचे गोदाम हे दिनेश चंद्रकांत अमृतकर यांना भाडयाने दिल्याचे सांगितले.

पत्यांवरून भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळला व आजूबाजूस चौकशी केली असता कोणीही उपलब्ध न झाल्याने सदर गोदामात खिडकीतून डोकावून पाहिले असता, प्रतिबंधित अन्नपदार्थाची पोती साठविल्याचे आढळून आल्याने पंचवटी पोलिस स्टेशन यांना बंदोबस्त मागितला असता पोलिसांच्या उपस्थितीत व पंचाच्या समक्ष सदरचे गोदाम अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी कुलूप तोडून उघडून प्रवेश केला असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. त्याचे मौजमाप केले असता अंदाजे १० लाखाहून अधिक किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. हा साठा अधिका-यांनी ताब्यात घेतला असून मोजमाप रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तींविरुध्द भा.द.वि कलम १८८, २७२, २७३, ३२८ अंतर्गत एफआयआर देण्यात येत आहे. पुढील कार्यवाही सुरु असून यापुढे अन्न व औषध प्रशासनाची जिल्हयात गुटख्याविरुध्द कार्यवाही सुरु राहणार आहे.

सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म.मो. सानप व विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.उ.रासकर, अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), यो.रो. देशमुख, गोपाल कासार यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं.भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -