नागपूर : राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या-त्या महिन्यात थेट पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील दिव्यांग, वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सतेज पाटील, शशिकांत शिंदे, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला होता.
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा एक हजार रुपयावरुन पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे. सध्या 1500 रुपये इतके मिळणारे मानधन वाढवून तीन हजार रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
आता पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच मिळण्याची सोय करण्यात येईल. आर्थिक निकषांची मर्यादा वाढविण्यात येईल. दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.