दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात झाला सोहळा
मुंबई : मराठी रंगभूमीला (Marathi Theatre) प्रदीर्घ असा इतिहास लाभला आहे. आजवर मराठी नाट्यसृष्टीतल्या अनेक कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. एखादं नाटक तयार होतं तेव्हा त्यासोबत त्या नाटकाची संपूर्ण टीम म्हणजे एक कुटुंबच बनून जातं. नाटक संपलं की त्यात काम केलेल्या नट-नट्यांसाठी प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवतात. पण ते नाटक सुंदर दिसण्यासाठी ज्यांनी अफाट मेहनत घेतलली असते त्या पडद्यामागच्या कलाकारांना (Backstage Artists) कोण लक्षात ठेवतो? नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये (Ashok Mulye)यांना एक कल्पना सुचली आणि त्यातून एक जेवणाची पंगत बसली ती बॅकस्टेज कलाकारांसाठी!
सर्वाधिक नाटकांच्या तालमी चालणार्या मुंबईतील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात (Dadar Matunga Cultural Centre) बॅकस्टेज कलाकारांसाठी नुकताच एक सुंदर सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची मनोरंजनसृष्टीत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नाट्यसृष्टीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाची घोषणा झाली, त्यानिमित्त रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या डोक्यात या सोहळ्याची कल्पना आली. पडद्यामागच्या कलाकारांसाठीही असा एक कार्यक्रम असावा, याची कल्पना मराठी नाट्यसृष्टीशिवाय कोणीही केली नसेल.
या सोहळ्याला अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अभिनेत्री प्राजक्ता माळी, नाट्यनिर्माते राहुल भंडारे, चंद्रकांत लोकरे, सूत्रधार गोट्या सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव, प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे, नेपथ्यकार संदेश बेंद्रे, मंजिरी मराठे, नरेंद्र-नंदिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
बॅकस्टेज कलाकारांपैकी सध्या उत्तम यश मिळवलेल्या दोन कलाकारांच्या मुलांचा सत्कार समारंभही करण्यात आला. केशभूषाकार संध्या खरात यांची उच्च शिक्षण घेणारी कन्या प्रज्ञा खरात, तर बॅकस्टेज कामगार पांडुरंग मेटकरी यांची मेट्रो पायलट बनलेली कन्या स्वाती मेटकरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ‘शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर हा सुंदर सोहळा झाला. असा उपक्रम माझ्या आठवणीत तरी आजपर्यंत कुणी केलेला नाही’, असं रंगकर्मी विजय केंकरे यांनी सांगितलं.
छोटेखानी सत्कार समारंभानंतर बॅकस्टेज कलाकारांची जेवणाची पंगत बसली. या सोहळ्याला नाटकाचे सेट डिझायनर, लाईट डिझायनर, बसचालक, टेम्पोचालक, सुतार असे सुमारे १४० बॅकस्टेज कलाकार उपस्थित होते. मसालेभात, श्रीखंड, बटाट्याची भाजी-चपात्या, वरणभात, त्यावर तुपाची धार, चटणी, कोशिंबीर, ताक, लोणचं-पापड असे चविष्ट पदार्थ ताटात होते. बॅकस्टेज कलाकारांच्या या पंगतीला काही कलाकारही स्वत: आग्रह करून पदार्थ वाढत होते. प्रशांत दामले यांनीही, नाट्यपरिषदेने जे काम करायला हवं होतं, ते मुळ्ये यांनी केलं आहे, असं सांगत त्यांचं कौतुक केलं.