अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन करणार नेतृत्व
मुंबई : राज्याचं राजकारण ढवळून काढणार्या दिशा सालियन मृत्यूप्रकरणात (Disha Salian Death Case) अखेर एसआयटी (SIT) समिती स्थापन करण्यात आली आहे. अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखाली या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये उपायुक्त अजय बन्सल, मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश असणार आहे. यामध्ये क्राईम ब्रांच आणि इतर युनिट्सच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर यावर विशेष हालचाली झाल्या नाहीत. मात्र भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) दिशाच्या मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर वारंवार करत असलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एसआयटी समिती स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले. त्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात आली असून तपास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता फेरतपास सुरु होणार आहे.
दिशा सालियन हिने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता विशेष चौकशी स्थापन करण्यात आल्यानंतर पुन्हा नव्याने तपास होणार आहे. या आधी झालेल्या तपासात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या लक्षात घेऊन तपास सुरू होईल. त्याशिवाय, या प्रकरणात कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांच्याकडून पुरावे जमा केले जाणार आहेत.
आदित्य ठाकरेंच्याही वाढणार अडचणी
आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार आहेत. दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची कसून चौकशी केली जाणार आहे. नेमके दिशा सालियनच्या मृत्यूच्या वेळी आदित्य ठाकरे कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या एसआयटी चौकशीत अनेक पुरावे समोर येणार आहेत.