जयपूर : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भाजपाला (BJP) दणदणीत यश मिळाले आणि तीन राज्यांमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाले. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी भाजपने सरकार स्थापन केलं. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड करावी हा मोठा पेच होता. यातील छत्तीसगडमध्ये विष्णूदेव साय यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली तर मध्यप्रदेशमध्ये मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. यानंतर आता राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचाही प्रश्न सुटला असून भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार आणि भाजपचे सरचिटणीस आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या आमदारांनी त्यांना आपला नेता मानले. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांची भेट घेतली होती. निरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीनंतर भाजपाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भजनलाल शर्मा यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली.
विधानसभा निवडणुकींचा निकाल ३ डिसेंबरला लागल्यापासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यासंबंधी चर्चा सुरु होती. बाबा बालकनाथ ते राज्यवर्धनसिंग राठोड यांच्यापर्यंतच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. तर दुसरीकडे वसुंधरा राजे यांना पुन्हा दिल्लीत बोलावल्याने राजस्थानमध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या शर्यतीत आघाडीवर असणार्या वसुंधरा राजेंना मागे टाकत आता भजनलाल शर्मा यांची निवड भाजपाने केली.