मुंबईकरांना मेट्रोमुळे एक दिलासा देणारा प्रवास देणाऱ्या मेट्रो वुमन म्हणजे अश्विनी भिडे. एक कर्तबगार आणि निर्भीड महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कला विषयातून आपले शिक्षण पूर्ण करून पुढे एमपीएसी, यूपीएसीसारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत आयएएस अधिकारी पदावर त्यांनी आपला खास ठसा उमटवला. राज्यपालांचे उपसचिव, शिक्षणाधिकारी आणि त्यानंतर मेट्रो-३ साठी संचालक अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. अशावेळी अभियंता म्हणून कोणतेही शिक्षण किंवा प्रशिक्षण नसतानाही हा टप्पा यशस्वीपणे पेलणाऱ्या अश्विनी भिडे यांनी दैनिक प्रहारच्या ‘गजाली’ या कार्यक्रमात सहभागी होत प्रहारच्या टीमशी मनमोकळा संवाद साधला. दैनिक प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, प्रशासन व लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत, वरिष्ठ जाहिरात अधिकारी कौशल श्रीवास्तव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मेट्रोबाबत लोकांनी निर्माण केलेल्या अनेक गैरसमजुती कशा दूर केल्या आणि मेट्रो प्रकल्प हे आव्हान पेलताना त्यांनी स्वतःला इथे कसे सिद्ध केले याविषयी माहिती दिली.
एका विशिष्ट पदावर महिला आहे की पुरुष याचा कोणत्याही कामाशी काहीही संबंध नसतो, केवळ आत्मविश्वास आणि काम करण्याची जिद्द असेल तर त्याला यशच नाही तर यशाचे शिखरही गाठता येत, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘मेट्रो वुमन’ अश्विनी भिडे. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतून त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासापासून ते मेट्रो वुमनपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेतले. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांचे वडील बँकेत होते. त्यामुळे वडिलांच्या होणाऱ्या बदलीमुळे सांगली शिक्षण संस्था आणि न्यू एज्युकेशन शिक्षण संस्था कोल्हापूर या दोन ठिकाणी मराठी माध्यमातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी स्वतःला झोकून देऊन शिक्षण देणारे शिक्षक लाभले. त्यामुळे अश्विनी यांच्या शिक्षणाचा पायाच मजबूत झाला. त्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या असून त्यांच्या घरी शिक्षणाला अधिक महत्त्व होते. दहावीला त्या बोर्डात आल्यानंतर मंत्रालयात कामाला असणाऱ्या आईच्या काकांनी आयएएस होण्याचा विचार कर म्हणून त्यांना सुचवले. सांगलीला शिवाजी विद्यापीठातून इंग्लिश लिटरेचर या विषयातून त्यांनी बीएचे शिक्षण पूर्ण केले. यूपीएसी आणि एमपीएसी परीक्षा देण्याचा विचार त्यांच्या डोक्यात होता. त्याप्रमाणे एमपीएसी परीक्षेचा निकाल हाती येईपर्यंत यूपीएसीची परीक्षा देखील त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. येथून त्यांचा मुख्य प्रवास सुरू झाला. आयएएस अधिकारी होण्यासाठी लेखी परीक्षा पास झालो तरी प्रत्येकवेळी येणाऱ्या अनुभवातून तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना एक नवा धडा शिकायचा आहे हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. प्रत्येक गोष्ट शिक्षणातून मिळत नाही हेच त्यांना इथे सुचवायचे आहे. इचलकरंजी इथे उपविभागीय अधिकारी म्हणून झालेले त्यांचे पहिले पोस्टिंग. इथे त्यांना अनेक अनुभव आले. मिळालेले पद हे जबाबदारीने पेलण्यासाठी लागणारे कौशल्य हे प्रत्येकाने आत्मसात करायलाच हवे हेच भिडे यांना आलेल्या त्यांच्या प्रत्येक अनुभातून सांगायचे होते.
१९९५ पासून खऱ्या अर्थाने त्यांचा आयएएस अधिकारी म्हणून प्रवास सुरू झाला. इचलकरंजीमध्ये झालेली पहिली पोस्टिंग. इथे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पर्यटनाच्यादृष्टीने खूप काम केले आहे. तसेच सहज एका कार्यक्रमात त्यांची माझ्याशी झालेली सहज भेटही त्यांनी माझ्या पोस्टींगनंतरही लक्षात ठेवली होती, ही मला माझ्या कामासाठी मिळालेली पोचपावती असल्याचे त्या म्हणाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिस्तबद्ध प्रशासन आणि तेथील लोकांचा सहभाग त्यामुळे इथे एक वेगळा अनुभव त्यांना मिळाल्याचे त्या सांगतात. त्यानंतर नागपूरला बदली झाली. तिथे लोकसहभागातून वनराई बंधाराचे काम त्यांना करता आले.त्यानंतर राज्यपालांकडे काम करण्याची संधी मिळाली. पाच वर्षे उपसचिव म्हणूनी काम केले. त्यानंतर एमएमआरडीएमध्ये काम करण्याची संधी मिळाली. हे त्यांच्यासाठी आव्हान होते. कारण अर्बन इन्फ्रास्टक्चरबाबत त्यांचे कोणतेही बॅकग्राऊंड नव्हते.
अभियंता म्हणून कोणते शिक्षण झाले नव्हते. प्रशासनाचा अनुभव होता. इथे वॉटर सप्लायपासून रोड स्ट्रक्चर, स्वच्छता, मेट्रो प्रकल्प यावर त्यांनी काम केले. तिथे काम केल्यानंतर आता मेट्रो प्रकल्प समोर आहे. एमएमआरडीएच्या पोटातली ही एक संस्था. मात्र याचे एक स्वतंत्र कार्यालय नव्हते. त्यामुळे तिथून सुरुवात होती. या प्रकल्पासाठी प्रत्येक व्यक्तीची निवड करावी लागली. अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. पण आधीचा अनुभव, चांगली टीम, अनुभवी अधिकारी, शासनाचे सहकार्य मिळाले. कोविडच्यामधल्या काळात सुरुवातीला राज्यस्तरावर आणि नंतर बीएमसीसाठी काम त्यांनी काम केले. इथे एक तर कोविडबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे लोकांमध्ये अनेक अफवा होत्या. त्या पुसून काढण्यात त्या यशस्वी झाल्या. त्या म्हणतात, त्यामुळे पुढचे निर्णय घेणे सोपे झाले. कोणतेही घेतलेले निर्णय चुकले नाहीत आणि कोविडसाठी मिळालेली जबाबदारीही चांगल्या पद्धतीने हाताळता आली. त्यानंतर बीएमसीमध्येच अॅडिशनल कमिशनर म्हणून निवड झाली आणि इतर विभागांबरोबर २०२० मध्ये कोस्टल रोडची जबाबदारी आली. आता कोस्टल रोडचे काम देखील ८३ टक्के पूर्ण झाले आहे. मे २०२४ पर्यंत तो सुरू करू, असे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा एकदा मेट्रो ३ ची जबाबदारी मिळाली. मधली दोन-तीन वर्षे कोविडमुळे आणि काही अन्य कारणांमुळे काम थांबलेले होते. रखडलेल्या कामांना पुन्हा एकदा वेग आलाे. ज्या कामांना स्थगिती होती ती कामे आता निर्णायक स्टेजपर्यंत पोहोचली आहेत. मेट्रो-३ ची कामे कुलाबा ते आरे असा साडेतेहतीस कि.मी.लांबीचा हा प्रकल्पे. त्याच्यामध्ये २७ स्टेशन आहेत. त्यापैकी २६ भूमिगत आहेत. त्यापैकी २७ वे आरे स्टेशन आहे ते जमिनीवर आहे. आतापर्यंत ८८ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
एक अभियंता म्हणून कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी प्रशासक म्हणून इतर ठिकाणी काम केलेला अनुभवच कामी येतो. कारण तुम्ही अभियंता असलात तरी जर काम करण्यासाठी ते ग्राऊंडच नसेल तर तुम्ही काय करणार? त्यामुळे एक प्रशासक म्हणून हे नेमून देणे हे तुमचे काम असते. मेट्रो-३साठी काम करताना अनेक गोष्टी समजून घेतल्या. प्रत्येक प्रकल्प कागदावर रेखाटला जातो तसा होत नाही. तर प्रत्येकवेळी त्यात बदल करावे लागतात आणि ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यामुळे कोणतेही काम टीमकडून करून घेताना त्याचे बेसिक ज्ञान तरी हवे. हे सारे करत असताना अनेक आव्हाने समोर आली. मात्र त्या-त्या वेळी ती आव्हाने पेलत, प्रकल्प पूर्ण केले. या प्रकल्पाविषयी सुरुवातीला अनेक अफवा आणि भीती लोकांच्या मनात होती. पण कोणताही प्रकल्प उभा करताना आधी लोकांची सुरक्षितता महत्त्वाची असते. लोकांच्या पुनर्वसनापासून ते मध्ये येणाऱ्या डोंगरवाटांमधून मार्ग काढताना तिथल्या कोणालाही इजा पोहोचणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाते. तेव्हाच प्रकल्प आखले जातात आणि ते उभे राहतात. त्यामुळे भूमिगत किंवा जमिनीवरून होणारा हा प्रकल्प मुंबईकरांसाठी एक सुरक्षित आणि आरामदायी असेल असा विश्वास शेवटी त्यांनी
व्यक्त केला.
भारतीय प्रशासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या आणि मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (मुं.मे.रे.कॉ.) व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे मूळ गाव सांगली; परंतु वडील स्टेट बँकेत होते आणि त्यांचा ट्रान्सफर टेबल जॉब होता. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिह्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बदली व्हायची. त्या ठिकाणी अश्विनी भिडे यांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले. शाळा साध्याच होत्या; परंतु झोकून देणारे शिक्षक आल्याने शिक्षणाचा पाया चांगला झाला. घरात मुलगी, मुलगा असा काही भेद नव्हता.
पुण्यात आल्यानंतर यूपीएससीची माहिती व्हायला लागली. सीएसएमटी येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेत अभ्यासासाठी आले. सावित्रीबाई फुले वसतिगृह मरिन ड्राईव्ह येथे राहण्यास होते, कारण मुंबईत आमचे कुणी नातेवाईक नव्हते. त्यामुळे मुंबईत पहिल्यांदाच वास्तव्य केले. यूपीएससीची मेन्स परीक्षा सुरू असतानाच एमपीएससीचा निकाल आला. डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली. त्याची सर्व प्रोसेस होऊन तिथे रुजू होईपर्यंत यूपीएससीची मेन्स पास झाले. मुलाखत होऊन त्याचा निकाल आला, त्यामुळे स्टेट सर्विस जॉईन केली नाही. आयएएस म्हणजे क्लासरूम ट्रेनिंग नसते. प्रत्येक पोस्टिंग वेगळी असते. त्यामुळे सतत लर्निंग मोडमध्ये राहावे लागते.नागपूरमध्ये काम करतानाही चांगले अनुभव आले. नंतर मला राज्यपालांकडे काम करण्याची संधी मिळाली. तिथे पाच वर्षे काम केले. या कालावधीत राज्यातील प्रादेशिक असमतोलपणाचा प्रश्न निकाली निघाला. आता हा प्रश्नही कुठे चर्चेला येत नाही. त्यानंतर मला एमएमआरडीएमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ही संधी एका दृष्टीने मैलाचा दगड होता. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर या विषयात माझ्या कामाची पार्श्वभूमी नव्हती. इंजिनीअरिंगशीही संबंध नव्हता. प्रशासनाचा अनुभव होता. त्यावेळी एमएमआरडीए पुलाच्या ढाच्याच्या प्लॅनिंगमधून हळूहळू प्रत्यक्ष प्रकल्प अंमलबजावणीमध्ये जात होते. चंद्रशेखर साहेबांनी रस्ते उभारणीमध्ये मोठे काम केले होते.
मी असताना रत्नाकर गायकवाड एमएमआरडीएचे आयुक्त होते. त्यांनी खूप व्यापक स्वरूप केले. सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये पाणी, मेट्रो स्वच्छतेचे कार्यक्रम घेतले. एमएमआरडीएचे उड्डाणपूल ते मेट्रोचे सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्याची संधी लाभली. त्यानंतर शिक्षण विभागात बदली झाली. तिथेही सीएसआरमधून येणाऱ्या निधीचा वापर करण्यासाठी आम्ही धोरण तयार केले. त्यानंतर मेट्रो ३ साठी माझी निवड झाली. त्यावेळी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे वेगळे ऑफिस नव्हते. ऑफिससाठी जागा मिळविण्यापासून यंत्रणा उभारावी लागली. हा प्रकल्पही कठीण होता. प्रकल्पासाठी जागा बघण्यास जायचो तर जागा नसल्याने प्रकल्प कुठे उभा करणार असे अनेक प्रश्न होते. पण आधीचा अनुभव, चांगली टीम आणि वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प सुरू झाला. शासनानेही खूप सहकार्य मिळाले. लोकांचेही सहकार्य मिळाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी काम केले. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा वेगळाच जिल्हा आहे. तिथे अतिशय शिस्तबद्ध प्रशासन चालते. जिल्हा परिषदेच्या अतिशय व्यवस्थित आणि चर्चा होणारी मीटिंग मी तिथे पहिल्या. प्रशासनामध्ये नागरिकांचा सहभाग तिथे मोठ्या प्रमाणावर आहे. तेथील स्वच्छता ही भावली. ग्रामपंचायतमधील कामही चांगल्या पद्धतीने चालते. त्यामुळे मला जिल्हा परिषद प्रशासनाचा खूप चांगला अनुभव आला. बरेच काही शिकायला मिळाले. मुळातच सोशल इंडिकेटरवर हा जिल्हा विकसित जिल्हा आहे. तसेच पंचायत राजचे तिन्ही स्तर येथे जबाबदारीने काम करतात.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…