Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीत वैष्णवांचा मेळावा

ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीत वैष्णवांचा मेळावा

घंटानाद अन पुलांची उधळण करत संजीवनी समाधी सोहळा पडला पार

पुणे : ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’चा घोष, घंटानाद… समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे… अशा भावपूर्ण वातावरणात माउलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा सोमवारी पार पडला.

संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले. तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे – पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. विना मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.

सकाळी दहाला संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराजांचे कीर्तन सुरु झाले. यावेळी विनामंडपात कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती. दरम्यान मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

घंटानाद, अभिषेक आणि आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांच्यामार्फत विना मंडपातून कारंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माऊलींच्या समाधीपुढे विराजमान करण्यात आल्या व ”पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” अशा जयघोषात माऊलींच्या समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून समाधी सोहळा साजरा करण्यात आला.

संत श्री नामदेव महाराजांच्या वंशजांनी टाळ – मृदुंगाच्या निनादात नामदेव महाराजांच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून जयजयकार केला. या वेळी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आवारात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजता विना मंडपात ह.भ.प. सोपानकाका महाराज देहूकर यांचे हरीकीर्तन झाले. तर रात्री उशिरा ‘श्रीं’च्या गाभाऱ्यात देवस्थानच्या वतीने नारळ – प्रसाद वाटून त्रयोदशीची सांगता करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -