दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम
कोकण ही भूमीच अद्भुत आहे. इथलं पाणी, इथली हवा, इथली भूमी, इथला निसर्ग याचं रूप वेगळं आहे. ठेवण वेगळी आहे. ही भूमी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, प्रगैतिहासिक, वैज्ञानिक अशा संस्कृतिची भूमी आहे. इथली माणसे जशी विचारवंत तशीच समुद्र अंगावर घेणारी, सह्याद्रीला कुशीत घेणारी धाडसी आहेत. इथली माणसे भावनाशील तितकीच कर्तव्याला जबाबदारी समजून खांद्यावर घेणारी आहेत. देवभोळी आहेत, कला जपणारी, ती अंगोपांगी फुलवणारी आहेत. इथेच दशावतार रंगतो, तर हौशी रंगभूमी इथेच बळकट होते, गोमू इथेच नाचते आणि नमन खेळे याच मातीत बेभान होऊन नाचतात. सर्वाधिक भारतरत्न याच मातीच्या कुशीतून जन्म घेतात.
छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं स्वराज्य बळकट करण्यासठी कोकणच्या कडेकपारी आणि अथांग समुद्राचीच आठवण झाली होती. अशा या भूमीचे कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्नं इथल्या अनेक पिढ्यांना दाखवण्यात आले. आंबा, काजू, मासळी आणि पावसात होणारा भात यावर गुजराण करत राहणारा कोकणी माणूस विकास या शब्दाला घाबरतो, असंसुद्धा म्हटलं गेलं. इथली माणसं मनिऑर्डरवर जगणारी आहेत, असाही शोध लावला गेला. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला इथे विरोध होतो, असं सांगून एक भयानक राजकारण इथल्या भोळ्या माणसांचा उपयोग करून केले गेले आणि यातून आजवर दाखवलेली स्वप्ने फक्त कागदावरच राहिली. त्यातूनच कोकणबद्दलची नकारात्मकता सर्वदूर पसरवण्यात आली. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने मात्र केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या दूरदृष्टीमुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून घेतला. तीच विकासाची संकल्पना कोकणात सर्वदूर पसरली पाहिजे, तो दृष्टिकोन झाला पाहिजे. त्याचीच वाट कोकणवासीय पाहत होते.
आता कोकणवासीयांची प्रतीक्षा संपली आहे, असं चित्र दिसू लागलं आहे. त्या दृष्टीने अनेक चांगल्या गोष्टी कोकणात घडत आहेत. त्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नौसेना दिवस मालवण येथे होणे. ही संपूर्ण घटना ऐतिहासिक तर होतीच; परंतु त्याला जागतिक महत्त्व सुद्धा प्राप्त झालं. मालवणसह सिंधुदुर्गचा संपूर्ण इतिहास यानिमित्ताने जगभरात पोहोचला. कोकण जगाने एक्स्प्लोर केले. देशाचा पंतप्रधान मालवणसारख्या एका शहरात येऊन एका राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमासाठी उपस्थित राहणे आणि नौसेनेचा कोणताही कार्यक्रम अशा ठिकाणी होणे याला सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व सुद्धा आहेच. ही खूप मोठी घटना कोकणच्या दृष्टीने घडली असून येथील राजकोट येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यामुळे हा परिसर अतिशय देखणा झाला आहे.
त्याचवेळी कोकणच्या अनेक वैशिष्ट्यांसोबतच कोकणातील कातळ सड्यांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहेच; परंतु जगभरातील इतिहास संशोधकांचे लक्षसुद्धा आज या जमिनीच्या तुकड्यावर लागलेले आहे. गेली अनेक वर्षे या कातळ सड्यांवर हजारो वर्षांपूर्वी रेखाटलेल्या अनेक आकृत्यांचे अर्थ लावल्याचा प्रयत्न इथले अभ्यासक करू लागले आहेत. कातळशिल्प म्हणून नामकरण झालेल्या या आकृत्यांनी आता जगाला आकर्षित केले आहे. ओळखीच्या तरीही गूढ वाटणाऱ्या या आकृत्या कठीण कातळावर कोणी, का आणि कशा काढल्या असतील? असे अनेक प्रश्न या आकृत्यांनी उभे केले आहेत. दगडावरही रेखाटलेल्या या आकृत्या काढण्यासाठी कोणती वस्तू वापरली असेल हे सर्वात मोठे गूढ आहे. त्यावर संशोधन सुरू असतानाच आता कोकणाचे नवे वैशिष्ट्य पाहण्यासाठी पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. खाद्य संस्कृतीसह निसर्ग, ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक, सामाजिक वैशिष्ट्यांसोबतच आता एक नवा कोकण यातून उलगडू लागला आहे.
हे सगळं सुरू असतानाच काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोकणातील कातळ सड्यांवर अश्मयुगात मानवाचा वावर होता याचे पुरावे दगडी हत्यारांच्या पुढे आले आहेत. कोकणातील मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात ही खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. तसेच दक्षिण कोकणात आढळून येत असलेल्या कातळशिल्प रचनांचा कालखंड निश्चित करण्यासाठी देखील हे महत्त्वपूर्ण पुरावे ठरणार आहेत. संचालक, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या पूर्वपरवानगीने हे पुरातत्त्वीय सर्वेक्षण चालू आहे. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर मालवण, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यातील काही कातळशिल्प ठिकाणांच्या परिसरात अश्मयुगीन दगडी हत्यारे आढळून आली आहेत. पुढील संशोधनात्मक कामासाठी यातील काही नमुने गोळा करून त्यावर शास्त्रीय चाचण्या करण्यात येत आहेत.
गेली वर्षभर चालू असलेल्या या संशोधनात्मक कामातून मिळालेली दगडी हत्यारे ही काही मध्यम आकाराची तसेच काही सूक्ष्म आकाराची आहेत. यात प्रामुख्याने तासणी (Scrapers), सूक्ष्म पाती (Micro Blades), गाभे (Cores), प्रीपेड कोर (Prepared Cores), छिलके (Flakes) यांचा समावेश आहे. मिळालेल्या दगडी हत्यारांचे आकार, बनविण्याची पद्धती यांवरून ही दगडी हत्यारे मध्य-पुराश्म (Middle Paleolithic) ते मध्याश्मयुग (Mesolithic) या कालखंडातील हे पुढे आले आहे. १८-२० लाख वर्षांपूर्वी मानवाने दगडांचा वापर हत्यारे म्हणून सुरू केला. जसजशी मानवाची प्रगती होत गेली, अनुभवात वाढ होऊ लागली, तसतसे मानवाने दगडांना आकार देऊन सहज बाळगता येतील, अशी उपयुक्त हत्यारे बनविण्यास बनविण्यास सुरुवात केली. या हत्यारांच्या सहाय्याने मानवाने शिकार करणे, मेलेल्या जनावरांचे मांस साफ करणे, फाडणे इत्यादी गोष्टी करू लागला.
काळानुरूप दगडी हत्यारांमध्ये झालेल्या बदलानुसार त्यांचे आकार, पद्धती, निर्मितीचे तंत्र यानुसार त्यांचे कालखंड ठरवले जातात. मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग म्हणजेच साधारणपणे इसविसन पूर्व ४०,००० ते १०,००० या कालखंडातील ही हत्यारे असावीत. कोकणच्या प्रागैतिहासिक कालखंडावर भाष्य करणारी ही हत्यारे संशोधकांना, अभ्यासकांना जशी नवी दृष्टी देणार आहेत, तशीच ती पर्यटनदृष्ट्या सुद्धा महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणच्या विकासाचे दार हे पर्यटनाच्या माध्यमातून उघडेल, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.