ऐकलंत का!: दीपक परब
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखोंच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या
भावनांना ओघ आला, त्यांनी शोक व्यक्त केला, प्रार्थना सभा घेतल्या आणि श्रद्धांजली वाहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये बाबासाहेबांच्या अंतयात्रेतील लाखो लोकांची गर्दी दिसत आहे, जी त्यांच्या शक्तिशाली कथाकथनाने मार्मिकपणे प्रेक्षकांना मोहित करत आहे. ‘माणूस मेल्यावर त्याची राख होते, आपण राख विसर्जित करतो, पण मला त्या राखेच्या दिव्य आणि तेजस्वी कणातूनच इतिहास घडवायचाय’, असे म्हणत अभिनेता प्रसाद ओक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या
भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत अभिनेता गौरव मोरेही दिसत आहे. मात्र त्याची नेमकी भूमिका काय आहे, हे चित्रपट आल्यावरच कळेल. याव्यतिरिक्त या चित्रपटात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार? हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे.