क्राइम: ॲड. रिया करंजकर
जेवढी तंत्रज्ञानाची प्रगती होते, तेवढीच ती समाजाला घातकही ठरते. आज-काल मोबाइलवर अनेक मेसेज किंवा व्हॉट्सॲपवर एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन देण्यासाठी मेसेज सतत येत असतात. काही मेसेज हे स्वतःचे ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी असतात, तर काही असेच लोकांना त्रास देणारी असतात. असाच रिमाला व्हॉट्सॲपवर सतत एक मेसेज येत होता एका नंबरमार्फत की, “तुमच्या ग्रहांमध्ये काही अडचणी असतील तर आमच्याकडून त्या दूर केल्या जातील एकदा संपर्क करा आणि अनुभव घ्या.” त्याचवेळी रिमाच्या आयुष्यामध्ये नवऱ्याच्या बाबतीत अनेक अडचणी चालू होत्या म्हणून तिने वरील संपर्क नंबरची कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिला तुमच्या नवऱ्याची पत्रिका म्हणजेच कुंडली पत्रिका पाठवून द्या व आम्ही तुम्हाला योग्य उत्तर आमच्या गुरुजींच्या मार्फत कळवतो असे सांगण्यात आले.
रिमाने त्याप्रमाणे आपल्या नवऱ्याची जन्मकुंडली व्हॉट्सॲपच्या मार्फत त्यांना पाठवून दिली आणि वर त्या लोकांनी जन्म कुंडली पाहण्यासाठी १५ हजार रुपये खर्च येईल, असं सांगितले. तेही तिने त्यांना त्यांनी दिलेल्या नंबरवर गुगल पेने पाठवून दिली. दोन दिवसानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता “आमच्या गुरुजींनी तुमच्या नवऱ्याच्या जन्मकुंडलीत अनेक दोष दिसून आलेले आहेत व ते दोष दूर करण्यासाठी तुम्हाला एक मोठी पूजा करावी लागेल”, असं सांगितलं. त्यासाठी तुम्हाला खर्च लागेल असेही त्या संपर्क नंबरकडून रिमाला सांगण्यात आलं. रिमाने किती खर्च येईल असे विचारला असता समोरून पन्नास हजार खर्च येईल, असं सांगितलं होतं त्यामुळे आधीच रिमा घाबरलेली होती कारण, आपल्या नवऱ्याच्या पत्रिकेत एवढे दोष आहेत त्याच्यामुळे आपल्याला नवऱ्याला आणि आपल्याला त्रास होतो आहे, अशी भीती त्या समोरच्या संपर्क नंबरवरून रिमाला करण्यात आलेली होती. त्यामुळे रिमा अगोदरच खूप घाबरलेली होती. म्हणून तिने कसलाही विचार न करता ५० हजार रुपये अगोदर गुगल पे केलेल्या नंबरवर पे केले व पूजा घालण्यास सांगितली.
ही सर्व पूजा त्यांच्यासमोर न घालता तुम्ही पैसे पाठवा आणि पूजा आम्ही घालतो, असं तिला सांगण्यात आलेलं होतं आणि दोन दिवसानंतर परत त्या संपर्क नंबरवरून तिला फोन आला आणि सांगण्यात आलं की, “तुमची पूजा चालू असताना तुमच्या नवऱ्यामध्ये एवढे दोष आहेत की मधेच पूजेला अडथळा येऊन त्या पूजेमध्ये विघ्न आले आणि ती पूजा तिथे थांबली गेली. त्यामुळे पूजा पूर्ण झालेली नाहीये आणि पुन्हा पूजा करायची असेल, तर पुन्हा तुम्हाला ५० हजार रुपये पाठवावे लागतील.” त्यावेळी रिमाच्या मनात कुठेतरी शंका निर्माण झाली आणि तिने पूजेमध्ये कसले विघ्न आले, असे विचारले असता ते मात्र त्यांना सांगता आलं नाही आणि दुसऱ्या दिवशी तिने परत त्यांना कॉन्टॅक्ट केला असता त्या नंबरशी संपर्क होऊ शकला नाही, म्हणून रिमा हिने पोलीस तक्रार केली.
पोलीस आणि सायबरमार्फत त्या नंबरचा शोध घेऊन त्या दोन गुन्हेगारांनाही अटक करण्यात आली. त्यावेळी गुन्हेगारांनी आपलं म्हणणं मांडताना सांगितलं की, “आम्ही गुन्हेगार नाहीत. आम्ही यांना ॲडव्हर्टाईझसाठी मेसेज पाठवला होता. यांनी स्वतःहून आम्हाला फोन केला व जन्मपत्रिका पाठवली. स्वतःहून पैसे पाठवले, नवऱ्याची पूजा घालण्यात सांगितल्याने स्वतःहूनच ५० हजारांची रक्कम पाठवली. या गोष्टीसाठी आम्ही त्यांना जबरदस्ती कुठे केलेली नाही. फक्त पूजेत विघ्न आलं म्हणून पुन्हा ५० हजार पाठवा व पुन्हा आम्ही पूजा करतोय एवढेच त्यांना आम्ही सांगितलं” असं गुन्हेगारांनी कबूल केलं; परंतु आम्ही गुन्हेगार नाहीत कारण, त्यांनी स्वतःहून रक्कम दिलेले आहे आणि त्यांच्याकडून जबरदस्ती घेतलेली नाही, अशी आपली बाजू त्यांनी मांडली.
लोक आजकाल शॉर्टकटचा मार्ग अवलंबतात. पैसे देतात आणि मोकळे होतात काय पूजा, कोणती पूजा झाली याचा ते विचार करत नाही आणि ज्यावेळी त्यांना कळतं की, आपली फसवणूक होत आहे. त्यावेळी मात्र फार उशीर झालेला असतो. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धेमुळे अनेकांचे नुकसान झालेलं आहे. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत.(सत्यघटनेवर आधारित)