Tuesday, July 9, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसामर्थ्य मनाचे...

सामर्थ्य मनाचे…

मनस्विनी: पूर्णिमा शिंदे

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।
प्रसन्न मन, प्रसन्न तन हे शक्तिशाली सामर्थ्यशाली ऊर्जादायी असते. ‘आरोग्यम् धनसंपदा’ जीवनामध्ये माणसाचे आरोग्य आनंददायी असणे महत्त्वाचे असते. यासाठी त्याचे तन आणि मन सुदृढ असावे लागते. शरीर हे व्यायाम, योगा, प्राणायाम, उत्तम आहार, उत्तम जीवनशैली यांनी सुदृढ करावे लागते आणि मन ध्यानधारणा, वाचन, मनन, चिंतन, श्रद्धा, भक्ती सकारात्मक विचार-आचार आणि उच्चार यांनी सामर्थ्यशाली बनवावे लागते. माणसाच्या आयुष्यामध्ये येणारे सुख-दुःख, यश-अपयश, हार-जीत, आजारपण, अनुभव, प्रतारणा, अपमान यांतून मन खचण्याची शक्यता जास्त असते. खचलेल्या मनामुळे त्याचे परिणाम शरीरावर घातक उद्भवतात आणि वेळीच जर आपण त्याची दक्षता, काळजी घेतली नाही, तर वेळ हातातून निघून जाते.

शरीरावरची जखम भरून येते. पण मनाचे काय, मनावर ओढलेले ओरखडे यासाठी काय करावे? समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जर आपण वाचले किंवा गीताई आचार्य विनोबा भावेंची तेव्हा कळते की, अाध्यात्मामध्येसुद्धा ती ताकद आहे. जगातले कोणतेही विज्ञान हे मनापुढे हार मानते आणि मन ही एक अशी जादू आहे की न दिसणारी, पण सतत असणारी, भासणारी.

मनाची जटिलता, गुंता, अस्थिरता विचलता, चंचलता यामुळे त्या विचारांनी नकारात्मकता शरीरावर उद्भवणारी घातक परिणाम असतात. म्हणूनच योगी आचार्य ऋषीमुनी, संत, कवी कवयित्री यांनी मनाच्या जटिलतेचे वर्णन करत असताना त्यावर ध्यानधारणा, विपश्यना, संस्कार केंद्रे, संस्कार पीठे, सत्संग यांचे दाखले दिलेले आहेत. भगवान बुद्धसुद्धा तपस्थ झाले, विवेकानंदसुद्धा तपस्थ झाले आणि त्यांना या जगाचा शोध आणि बोध समजला. जर आपणसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये निराशारूपी जळमटे झटकून मोठ्या जोमाने पुन्हा खंबीरपणे जिद्दीने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उंच भरारी घेता आली पाहिजे. एक निखारा पेटता असतो, तो उमेदीचा असतो आणि त्या उमेदीतूनच माणसाची हिंमत, आशा, सामर्थ्य, उमेद जागृत होते आणि हा असा पेटता आत्मोद्धाराचा दिवा आत्मविश्वासाने प्रज्वलित करून स्वप्न सत्यात साकारण्यासाठी झुंज ही दिलीच पाहिजे. रडतरडत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगणे केव्हाही मोलाचे.

मनाचे खच्चीकरण झाले, तर काजळी निर्माण होते आणि ती विचाराची काजळी आपण विवेकाचे दीप प्रज्वलित करून आयुष्याची, जीवनाची दीपावली साजरी करावी. ते करण्यासाठी सद्सदविवेक बुद्धीने जागृत होऊन अाध्यात्माशी सांगड घालून आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांच्याशी मेळ घालावा. मनाच्या जटिलता, गुंतागुंत सोडवून मनाचे सामर्थ्य वाढवावे. कोणताही धर्म संप्रदाय असो, त्यात आपल्याला वेळोवेळी हे सूचित करण्यात येते की, त्याचा आधार घेऊन आपण मार्गक्रमण केले पाहिजे.

जीवन जगता-जगता आपल्या आजूबाजूला असणाऱ्या पशुपक्षी, वृक्षवल्ली निसर्गरूपी देवतेकडून शिकले पाहिजे. पहाटे पक्षी किलबिलाट करतात, फुले फुलतात, वृक्षवेली मोहक डवरतात, दवबिंदू, धुकं पडतं. सुंदर, निसर्गरम्य आनंददायी प्राणवायू देणाऱ्या निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला एक आनंददायी शक्तीदायी ऊर्जा प्राप्त होते. म्हणूनच निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे, निसर्गाशी मैत्री केली पाहिजे. स्नेहाचे, मैत्रीचे, मानवतेचे नाते जोडले पाहिजे. भूतदया, पशुपक्षी, प्राणी यांच्यावर देखील चांगल्या पद्धतीने आपले वर्तन हे सहकार्यपूर्ण असले पाहिजे. आपण वृक्ष पूजा करतो. तुळस, वड, पिंपळ, औदुंबर यांची पूजा करतो. गाईला, कुत्र्याला, कावळ्याला नैवेद्य देतो. तुम्ही आपली संस्कृतीची परंपरा जतन, संवर्धन केली पाहिजे. त्यातून जो मनाला आनंद मिळतो, तो टिकवून आनंदात वृद्धी कशी करता येईल हे शोधत आणि आपल्यात आत्मीक समाधान शोधता आलं पाहिजे. सुख हे वेचता आलं पाहिजे म्हणूनही शरीर आणि मन हे दोन्ही सुदृढ असणे गरजेचे आहे.

रस्त्याच्या कडेला जाणारी गाय पाहून आपण चटकन तिला स्पर्श करतो. दर्शन घेतो. जेवणाआधी कावळ्याचा घास काढून ठेवतो. कुत्र्याला अर्धी का होईना दारातल्या आपण भाकरी देतो, ही सर्व मानवतेची उदाहरणे असली तरी संतांची शिकवणसुद्धा आपल्याला हेच सांगते. ममत्व, देवत्व आणि संतत्व हे माणसाठायी असणे गरजेचे असतं. त्यासाठी परिपक्व, प्रगल्भ, उदात्त, सौहार्द मन असणं गरजेचे आहे. मनाचा विकास होण्यासाठी आपल्याला उत्तमोत्तम साहित्य, ज्ञानभक्ती, कर्मकृती, सर्जनशीलता आणि सृजनशीलता यांची कास धरली पाहिजे. महत्त्वाकांक्षी बनून नित्य नव्याचा ध्यास घेतला पाहिजे. प्रत्येक श्वासागणिक नवनिर्मितीचा आनंददायी प्रवास म्हणजे जीवन. एक दरवाजा बंद झाला तरी जीवनात असंख्य दरवाजे उघडण्याची ताकद असली पाहिजे. यात मारील तिथे पाणी काढीन, आपला हात जगन्नाथ अशा हिररीने जगावं.

१४ दिवसांचे केवळ आयुष्य असणारे फुलपाखरूसुद्धा किती बागडतं! एका फुलावरून दुसऱ्या फुलावर स्वच्छंदी बागडतं! फुलांना माहीत नसतं उद्या कुठे, कोणत्या देवाच्या पायावर की कोणाच्या प्रेतावर आपण जाणार आहोत. पण तरी ते सुंदर फुलून सुवासिकतेचं वरदान लाभलेलं सर्वांना सुवास देतच असतं आणि फुलत असताना आनंददायी ठरतं. तसेच माणसाचे आयुष्य आ. आपल्या कर्तृत्वाचा सुगंध आपण आपल्या निश्चयबलाने आचरणाने सर्वतोपरी उधळावा. असे सुगंधी कर्मज्ञान, भक्ती इत्यादींनी आपल्या आयुष्य उपकृत करावं इतरांसाठी जगावं आनंदाने फुलावं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वळणा-वळणावर गाणे गात सुरात सूर मिसळत आनंदाने जगावं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -