मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
मराठी शाळा टिकाव्यात, जगाव्यात या दृष्टीने सातत्यपूर्ण काम करणारी संस्था म्हणजे मराठी अभ्यासकेंद्र. २००७ साली केंद्राने मराठी शाळांसाठीची राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. तिथपासून मराठी शाळांच्या दृष्टीने पूरक वातावरण तयार होण्याच्या दृष्टीने मराठी अभ्यासकेंद्र प्रामाणिकपणे काम करीत आहे. २००९ च्या सुमारास मराठी शाळांच्या मान्यतांच्या प्रश्नांकरिता आंदोलन, त्यानंतर हाती घेतलेला बृहत्आराखड्यातील गावोगावच्या मराठी शाळांचा प्रश्न हे केंद्राने हाती घेतलेल्या कामाचे महत्त्वाचे टप्पे! गेली ५ वर्षे मराठी शाळांसाठीचा अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रम केंद्राने हाती घेऊन यशस्वी करून दाखवला आहे. तो म्हणजे ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन.’ यावर्षी हा उपक्रम केंद्राने गोरेगाव येथील नंदादीप शाळेत आयोजित केला आहे.
मराठीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या केंद्रातर्फे ४ महत्त्वाचे पुरस्कार दिले जातात. शांताराम दातार स्मृती मराठी भाषा आग्रही पुरस्कार, जयवंत चुनेकर स्मृती प्रयोगशील शिक्षक पुरस्कार, दिनू रणदिवे स्मृती मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्कार, अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक असे हे चार पुरस्कार. या प्रत्येक पुरस्काराचे स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. मराठीकरिता मौलिक योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची आठवण या पुरस्कारांच्या माध्यमातून अमर झाली आहे. ‘मराठी माध्यमात शिकून यश प्राप्त केलेल्या यशवंतांशी संवाद’ आणि ‘मराठी माध्यमाची निवड आपल्या पाल्यांकरिता करणाऱ्या पाल्यांसह पालकांशी संवाद’ ही दोन्ही सत्रे नेहमीच रंगत जाणारी ठरतात. एकतर ती प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असल्याने अन्य पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ती प्रेरक व मार्गदर्शक होतात.
‘मातृभाषेतील शिक्षणाचे शास्त्रीय आधार आणि पालकत्व’ आणि ‘मराठी शाळांसाठी आपण काय करू शकतो?’ ही दोन्ही सत्रे आज म्हणजे संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी होत आहेत. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मातृभाषेतील शिक्षणाच्या शास्त्रीय आधाराचा वेध घेणारी अरुण नाईक यांची मांडणी पालकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरेल. मराठी शाळा जगवणे हे व्यापक स्तरावर सर्वांचेच ध्येय आहे, ही जाणीव रुजण्याची गरज आहे. यादृष्टीने “मराठी शाळांसाठी आपण काय करू शकतो?” हे सत्र पथप्रदर्शक ठरावे. ‘मराठी शाळांकरिता शासनाची समूह योजना व दत्तक योजना’ या विषयाची विविध बाजूंनी चर्चा करणारे सत्रही दिवसभराच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आले आहे.
मराठी प्रयोगशील शाळांचे दालन, पुस्तकप्रदर्शन व शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन ही विशेष आकर्षणे आहेत. मराठीतील भाषातज्ज्ञ आणि मराठी अभ्यासकेंद्राचे संस्थापक सदस्य डाॅ. प्रकाश परब यांची दोन महत्त्वाची पुस्तके या संमेलनात प्रकाशित झाली. त्यापैकी एक विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांना उपयुक्त असे ‘मराठी व्याकरणाचा अभ्यास’ हे एक पुस्तक, तर ‘मराठी शाळा आणि मराठी समाज’ हे दुसरे संपादित पुस्तक! मराठी शाळांशी निगडित विविध पैलू उलगडणारे लेख आणि मराठी शाळांमधून घडलेल्या यशवंतांची मनोगते या पुस्तकात परिश्रमपूर्वक परब सरांनी संपादित केली आहेत.
सहयोगी संस्थांच्या सहकार्याने मराठी अभ्यास केंद्राने उचललेले हे खंबीर पाऊल मराठी शाळांच्या दृष्टीने सकारात्मक व चैतन्यदायी ठरेल, यात शंका नाही. मराठी शाळा हा मराठी भाषेचा कणा आहे, ही जाणीव मराठी अभ्यास केंद्र अव्याहतपणे जपते आहे, निर्माण करते आहे. मराठी समाजापर्यंत ही जाणीव केव्हा पोहोचेल?