संवाद: गुरुनाथ तेंडुलकर
तुम्हाला युवराज सिंग आठवतोय का? हो हो तोच. आपला युवी. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात एका षटकातील सहा चेंडूंवर सहा कडकडीत षटकार ठोकणारा क्रिकेटपटू. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर यशस्वी मात करून पुन्हा भारतीय क्रिकेट संघात येऊन यशस्वी खेळी खेळणारा अष्टपैलू खेळाडू. चाळीस टेस्ट क्रिकेट मॅच आणि एक दिवसाच्या म्हणजे वन डेचे तीनशेहून अधिक सामने खेळणारा मधल्या फळीतला फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज. २००७च्या वर्ल्डकप स्पर्धेत केवळ बारा चेंडूत पन्नास धावांचा पाऊस पाडणारा… या युवराज सिंगबद्दल एक किस्सा सांगतात. युवराजसिंगचे वडील योगराज सिंग हे स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू होते. पण दुर्दैवाने एका अपघातामुळे त्यांच्या क्रिकेटमधील करिअरला पूर्णविराम मिळाला.
आपलं अपूर्ण स्वप्नं मुलगा निश्चित पूर्ण करील या विश्वासानं त्यांनी युवराजच्या शिक्षणाची सूत्रं हाती घेतली. युवराजला क्रिकेटची आवड होती. पण… लहान वयात इतर मुलांप्रमाणे त्याचंही मन इकडे तिकडे भरकटत जायचं. युवराजच्या वडिलांनी त्याच्या दिवसभराचं टाइमटेबल आखून दिलं. त्याच्यासोबत क्रिकेटच्या ट्रेनिंगला स्वतः जायला सुरुवात केली. युवराज फिल्डिंग करताना धावण्यात थोडा कमी पडतोय हे ध्यानात आल्यानंतर त्याला दररोज सकाळी पाच वाजता उठवून धावायला नेऊ लागले. युवराजचा धावण्याचा वेग वाढावा म्हणून त्याच्यासोबत स्वतःदेखील जॉगिंग करू लागले. डिसेंबर महिन्यात चंदिगडला पहाटेचं तापमान अनेकदा शून्याच्या जवळपास असतं. अशाच ऐका पहाटे युवराज पांघरुणात गुरफटून झोपला होता. त्याचे वडील नेहमीप्रमाणे पाच वाजता त्याला उठवायला आले. ऊबदार पांघरुणातून बाहेर येणं युवराजच्या जीवावर आलं होतं. “प्लीज थोडा और सोने दो ना पापा।” युवराज झोपेच्या ग्लानीत बोलला, पांघरूण पुन्हा डोक्यावरून ओढून घेतलं आणि… आणि त्याला जाग आली ती थंडगार पाण्याच्या स्पर्शानं… त्याच्या वडिलांनी त्याचं पाघरूण ओढून फेकलं होतं आणि त्याच्या अंगावर गार पाणी ओतलं होतं. युवराज खडबडून जागा झाला आणि मुकाट्यानं वडिलांबरोबर धावायला गेला.
ही कथा आठवण्याचं कारण म्हणजे अलीकडेच एका शाळेत मला पालकांच्या सभेमधे मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं होतं. कार्यक्रमाच्या आधी शिक्षकांबरोबर चहापानाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी बहुतेक शिक्षकांची तक्रार एकाच प्रकारची होती. “मुलं शाळेत मोबाइल आणतात आणि वर्गात देखील चोरून मोबाइलवरचे रिल्स बघतात. जरा संधी मिळाली की फेसबुक उघडतात. इन्स्टावर जातात. वगैरे वगैरे…”
सभा सुरू झाली. शाळेचे मुख्याध्यापक, काही शिक्षक आणि मी स्टेजवर बसलो होतो. मुख्याध्यापकांचं भाषण सुरू असताना माझ्या एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे खाली श्रोतृवर्गात बसलेल्या पालकांपैकी अनेकजण मोबाइल उघडून व्हॉट्सअॅप स्क्रोल करत होते आणि मुख्य म्हणजे केवळ पालकच नव्हे, तर मघाशी तक्रार करणाऱ्यांपैकी चारसहा शिक्षक देखील मुख्याध्यापकांचं भाषण सुरू असताना अधून मधून मोबाइलवर बघत होते. त्यांच्यापैकी एकजण तर तोंडाजवळ हात धरून त्याखाली लपवलेल्या मोबाइलवरून कुणाशी तरी हळू आवाजात बोलत होता. हा पालक सभेचा कार्यक्रम सुरू असताना किती जणांच्या मोबाइलच्या रिंग वाजल्या हे तर मी मोजलं देखील नाही. मी माझ्या भाषणात या सगळ्या गोष्टींबद्दल नाराजी आणि खेद व्यक्त केला. समोर बसलेल्या पालकांना मी काही वेगळं सांगण्याऐवजी भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील एकविसाव्या श्लोकातून भगवान श्रीकृष्णाने अर्जूनाला जे सांगितलं त्या श्लोकावर थोडंफार भाष्य केलं. तो श्लोक असा आहे…
यद् यद् आचरति श्रेष्ठः तद् तद् एव इतरे जनः।
सः यत् प्रमाणं कुरुते लोकः तद् अनुवर्तते ।।
भावार्थ : श्रेष्ठ किंवा मोठी माणसं ज्या प्रकारचं आचरण करतात त्याप्रमाणेच इतर लहान माणसं वागतात. मोठी माणसं आपल्या वागणुकीतून जे प्रमाण इतरांसमोर ठेवतात त्याच प्रमाणाला लहान माणसं अनुसरून तशाच प्रकारचं आचरण करतात.
त्या भाषणाच्या ओघात मी ब्रह्मचैतन्य श्री गोंदावलेकर महाराजांच्या चरित्रातील प्रसंग सांगितला. गोंदावलेकर महाराजांकडे एक बाई तिच्या सहा सात वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती. तो मुलगा जेवताना दररोज गूळ खायला मागायचा. नाही दिलं तर रडायचा. चिडायचा. डॉक्टरांनी त्याला जास्त गोड खायला मनाई केली होती तरीही तो मुलगा गुळासाठी हट्ट करायचा.“महाराज आपल्या शब्दांत जादू आहे. तुम्ही समजावून सांगा याला.” त्या बाईनं महाराजांना हात जोडून विनंती केली. “ठीक आहे. मी सांगेन. तुम्ही याला आठवड्यानंतर घेऊन या.” महाराजांनी त्या बाईला सांगितलं. आठवड्यानंतर ती बाई पुन्हा त्या मुलाला घेऊन महाराजांकडे दर्शनासाठी आली त्यावेळी महाराजांनी त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, “बाळा, दररोजच्या जेवणात गोड खाणं चांगलं नसतं. प्रत्येक जेवणाचे वेळी गूळ खाऊ नकोस हं.”
महाराजांच्या शब्दांत विलक्षण जादू होती. पुढच्या आठवड्यात ती बाई पुन्हा महाराजांकडे आली त्यावेळी आनंदून म्हणाली, “महाराज, आपण याला समजावून सांगितलं आणि त्या दिवसापासून या मुलानं एकदाही गुळासाठी हट्ट केला नाही. पण…” ती बाई बोलता बोलता घुटमळली. बोलू की नको असे भाव तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते. महाराजांनी तिला आश्वस्त केलं आणि विचारलं, “पण काय? विचारा… संकोच करू नका.” “महाराज मी पहिल्यांदा आले त्यावेळी आपण आम्हाला ‘एका आठवड्यानंतर या” असं कां सांगितलं? पहिल्याच दिवशी आपण या मुलाला समजावू शकला असता की.” महाराज मंद हसले आणि म्हणाले, “पहिल्याच दिवशी मी याला गूळ खाऊ नकोस कसं सांगणार होतो? कारण मी स्वतःदेखील दररोजच्या जेवणात काहीतरी गोडधोड खात होतो. अगदीच काही नसेल तर निदान एखादा गुळाचा खडा तरी मला हवाच असायचा. मागच्या एका आठवड्यापासून मी स्वतः गोड खाणं बंद केलं. त्यामुळे या बालकाला समजावण्याचा मला अधिकार मिळाला.”
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या युवराजसिंगच्या उत्तुंग यशामध्ये त्याच्या वडिलांनी केलेल्या पायाभरणीचा मोठा वाटा आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्याला घडवणारी त्यांची आई जिजाऊ मॉँ साहेब होत्या. डॉक्टर बाबसाहेब आंबेडकरांना वाचनाची गोडी लावण्यात त्यांचे वडील रामजीभाऊ यांचा मोठा वाटा होता. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. आठ वेळ ग्रँड स्लॅम विजेता जगद्विख्यात टेनिसपटू आंद्रे आगासी याचं चरित्र वाचलं की याच्या यशात त्याचे वडील माईक आगासी यांनी उपसलेले कष्ट आणि आंद्रेला योग्य वळण लावण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं केवढं मोठं योगदान आहे हे ध्यानात येईल. प्रत्येक आई-वडिलांना आपली मुलं चांगली निपजावीत. यशस्वी व्हावीत, त्यांना मानसन्मान मिळावा असं मनापासून वाटत असतं. पण… पण त्यासाठी मुलांच्या जोडीनं अभ्यास करण्याची पालकांची तयारी असते का?
आमची मुलं अभ्यास करत नाहीत. बाहेर मैदानात खेळायला जात नाहीत. पुस्तकं वाचत नाहीत. त्यांना मोबाइलचं व्यसन लागलंय, टीव्हीचं व्यसन लागलंय. म्हणून तक्रार करणाऱ्या पालकांनी आपण स्वतः किती पुस्तकं वाचतो आणि दिवसभरातील नेमका किती वेळ मोबाइलवर आणि टीव्हीसमोर वाया घालवतोय हे स्वतःचं स्वतःच तपासून बघायला हवं. नवीन पिढीबद्दल तक्रार करण्यापूर्वी एकदा स्वतः आरशात डोकावून पाहायला हवं.