विशेष: स्वाती महाळंक
मराठी माणसाच्या भावविश्वात आगळंवेगळं स्थान निर्माण केलं आहे ते दिवाळी अंकांनी! मराठी माणसाची दिवाळी या दिवाळी अंकांखेरीज साजरी होऊच शकत नाही. दिवाळीचा स्वादिष्ट फराळ चाखता चाखताच हा साहित्यिक फराळ त्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करत जातो. शतकभरापेक्षा मोठी ही परंपरा! १९०९ मध्ये काशिनाथ रघुनाथ आजगावकर ऊर्फ का. र. मित्र यांनी पहिल्यांदा ‘मनोरंजन’चा पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला. अमेरिकेतील नाताळच्या विशेष अंकावरून त्यांना ही कल्पना सुचली. पहिली ३ वर्षे तो त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिला. तेव्हापासून आजतागायत सलग ११४ वर्षे अनेक चढउतार सोसत, नवी वाटावळणं घेत, नवे बदल स्वीकारत जिद्दीनं आणि जोमानं दिवाळी अंकांची ही वाटचाल अखंडितपणे सुरू आहे.
मध्यंतरी दहा-बारा वर्षांपूर्वी दिवाळी अंकांमध्ये साचलेपण आलं आहे का, दिवाळी अंकांचा वाङ्मयीन समृद्धीला खरंच हातभार लागतो की, ते केवळ अर्थार्जनाचं साधन बनले आहेत, अशा प्रकारच्या चर्चा झाल्या. कोविडच्या काळात या वाटचालीला खीळही बसली. पण आता पुन्हा नव्या जोमानं दिवाळी अंक बाजारात आले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदाचे दिवाळी अंक कसे आहेत, त्यांची वैशिष्ट्यं काय, वेगळेपण काय याविषयी वेध घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न!
यंदा ३०० ते ३५० दिवाळी अंक बाजारात दाखल झाले. हे अंक अत्यंत वैविध्यपूर्ण आणि परिश्रमपूर्वक तयार केल्याचे अनेक बाबींवरून जाणवते. मौज, दीपावली, हंस, अक्षरधारा, अक्षरलिपी असे उत्तम साहित्याने सजलेले अंक यामध्ये आहेतच, पण पुणे-मुंबईच्या पलीकडे, राज्याच्या इतर कानाकोपऱ्यांतून प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांची संख्याही यंदा लक्षणीय आहे. ‘मौज’ दिवाळी अंकाचं यंदा १०१वे वर्षं आहे. श्री. पु. भागवत यांच्या शताब्दीनिमित्तचा विशेष लेखही त्यामध्ये आहेत. ‘दीपावली’च्या अंकात विविध गद्य विषयांसह काव्य विभागही अत्यंत बहरलेला आहे. ‘अक्षरलिपी’च्या अंकात ‘साहित्य आणि समाजभान’ हा नवीन कवी लेखकांचा विवेक एक प्रकारे जागविणारा वसंत आबाजी डहाके यांचा लेख, ‘स्त्री केंद्रित शेतीचा जहिराबादी प्रयोग’, ‘भारतीय रेल्वे आणि स्वातंत्र्यसंग्रामातील नेते’ असे वेगळ्या विषयांवरील लेख उल्लेखनीय आहेत.
अलीकडच्या गाजणाऱ्या विषयांवरही अनेक दिवाळी अंकांमध्ये लेख आहेत. ‘अक्षर’च्या दिवाळी अंकात ‘ए आयचे जग’ ही मान्यवर अभ्यासक लेखकांची स्वतंत्र लेखमाला आहे. २०२४ मधील आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन अनेक अंकांमध्ये स्वतंत्र विभागाद्वारे हा विषय हाताळण्यात आला आहे. ‘अक्षरदान’चा दिवाळी अंक महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारा आहे. यामध्ये मान्यवरांनी आपल्या पहिल्या निवडणुकीविषयी लिहिले आहे. ‘आंतरभारती’चा संपूर्ण अंक संविधानाविषयी आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीतील राजकीय, सामाजिक विषयांनाही दिवाळी अंकांमध्ये आवर्जून स्थान देण्यात आले आहे. निवडणुकांबाबतचे राजकीय विश्लेषण, मराठा आरक्षण, लोकशाहीचे भवितव्य, आरक्षणामुळे नेमके काय साधणार? अशा स्वरूपाचे लेखनही मान्यवरांनी केले आहे.
अनेक दिवाळी अंकांमध्ये विविध निमित्तामुळे चर्चेत असलेल्या व्यक्तींविषयीचे लेखनही आवर्जून समाविष्ट केलेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते देव आनंद, गीतकार शैलेंद्र, पंडित कुमार गंधर्व, विद्याधर गोखले यांच्या शताब्दीनिमित्त अनेक अंकांमध्ये लेख आहेत. वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त त्यांच्या चित्रपटविषयक कारकिर्दीचा आढावा घेणारेही लेख अनेक अंकांमध्ये आहेत. साने गुरुजी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष आहे. त्याचप्रमाणे ‘श्यामची आई’ चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या दोन्हींचे औचित्य साधून याविषयीचे लेखही दिवाळी अंकांमध्ये आहेत.
दिवाळी अंकांमध्ये पहिल्यापासून वैचारिक साहित्यालाही प्राधान्याने स्थान दिले गेले आहे. ‘मनोरंजन’च्या पहिल्या अंकापासून विचारवंतांची मांदियाळी त्यामध्ये लिहिती झाली होती. ती परंपरा पुढे सुरू राहिली आणि त्या त्या काळातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिवाळी अंकांमध्ये आवर्जून लेखन केलं. यंदाच्या दिवाळी अंकांमध्येही वैचारिक लेखनाची ही परंपरा तितक्याच जोमाने सुरू आहे. एखादा विशिष्ट विषय सर्वांगांनी हाताळणाऱ्या विषयकेंद्रित दिवाळी अंकांची संख्याही लक्षणीय आहे. दिवाळी अंकांमध्ये लेखन केलेल्या लेखिकांची संख्याही बरीच मोठी आहे. कवितांपासून कायदेशीर विषयांपर्यंत आणि पाककृतीपासून प्रशासनापर्यंत असे प्रचंड मोठी कक्षा हाताळणारे महिला अभ्यासकांचे अनेक लेख यंदाच्या दिवाळी अंकांमध्ये आहेत.
स्त्रीविषयक जाणिवा व्यक्त करणारे, स्त्रियांची परिस्थिती, घुसमट, त्यांचे विश्व रेखाटणारे, महिलांचे प्रश्न हाताळणारे लेखनही आहे. २०-२५ वर्षांपूर्वी स्त्रियांनी नोकरी करावी का, तिची कमाई म्हणून आलेला पगार नवऱ्याच्या हातात द्यायचा का, तिला आर्थिक निर्णय घेण्याची मुभा का नाही, या प्रश्नांपासून सुरू झालेला प्रवास आता बदलत चालला आहे. बदलत्या काळानुसार परिस्थिती आणि प्रश्न बदलत गेले. त्याचे प्रतिबिंब या लेखनामध्ये आहे. नोकरी आणि संसार ही दुहेरी कसरत करताना पुरुषांची, सासरच्या मंडळींची भूमिका नेमकी कशी असावी इथपासून, लग्न केलेच पाहिजे असे थोडेच आहे? असे म्हणत लग्न नाकारणाऱ्या स्त्रियांचं म्हणणं मांडणाऱ्या लेखांपर्यंत हा पट व्यापक होत गेलेला आढळतो. महिला संपादकांनी संपादित केलेल्या दिवाळी अंकांची संख्याही मोठी आणि त्यामुळेच अत्यंत दिलासादायक आहे.
वृत्तपत्रे आणि माध्यमगृहांनी प्रकाशित केलेले दिवाळी अंकही देखणे आणि वाचनीय आहेत. पूर्वी दिवाळी अंक ही जणू पुणे-मुंबईची मक्तेदारी होती. मात्र आता राज्याच्या इतर विभागांतून, अगदी कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या दिवाळी अंकांची संख्याही मोठी आहे. त्या त्या भागातील लिहिणाऱ्या प्रतिभावंत मंडळींना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून लहान-मोठ्या गावांमध्ये दिवाळी अंक या संकल्पनेने मूळ धरले. त्यानिमित्ताने लिहिते हात वाढून असंख्य मने व्यक्त होत आहेत, शेती-मातीत रुजलेले, मानवतेची गीते गाणारे निखळ साहित्य जन्माला येते आहे, हे फार महत्त्वाचे! लहान मुलांसाठी प्रकाशित केलेल्या अंकांमध्येही प्रचंड वैविध्य आहे. नव्या पिढीचे नवे विषय घेऊन हे अंक दाखल झाले आहेत. हे अंक विविध चित्रकारांच्या कलाकृतींनी सजलेले आणि त्यामुळे देखणे आहेत. रंगांची ही करामत लहान मुलांचेच काय, मोठ्या माणसांचेही भान हरपून टाकते. कुल्फी, चिकू पिकू, वयम, साधना बालकुमार, छात्र प्रबोधन, किशोर ही याची ठळक उदाहरणे.
दिवाळी अंकांची संख्या वाढते आहे, तशी आपोआप लिहिणाऱ्या लेखक, कवी मंडळींची संख्याही वाढते आहे. प्रादेशिक विभिन्नतेनुसार त्यामध्ये वैविध्यही येते आहे. या लेखनाचा दर्जा काय, त्याची गुणवत्ता किती याबाबत लगेच भाष्य करणे कठीण आहे. कसदार लेखन काळाच्या कसोटीवर उतरणार आणि दीर्घकाळ टिकणार हे निश्चितच आहे; परंतु व्यक्त होऊ पाहण्याच्या ऊर्मीपायी प्रत्यक्षात लेखन करणाऱ्या, त्यासाठी आपल्या आणि समाजाच्या जीवनाचे, भवतालाचे, परिस्थितीचे चिंतन करून नवी स्वप्ने पाहणाऱ्या सर्जनशील मंडळींमध्ये वाढ होते आहे, हे दिलासादायक आहे. दिवाळी अंकांमध्ये वर्षानुवर्षे लिहीत असलेली कवी-लेखकांची पिढी कार्यरत असताना ही नव्या दमाची पिढी सक्रिय होत जाणे निश्चितच महत्त्वाचे आणि म्हणूनच आशादायी!
दिवाळी अंकांची मुखपृष्ठेही प्रयत्नपूर्वक तयार केल्याचे जाणवते. काही वर्षांपूर्वी सुंदर स्त्री हेच प्रामुख्याने मुखपृष्ठ असलेल्या दिवाळी अंकांवर आता मान्यवर चित्रकारांच्या कलाकृती, विशेषांकांना अनुसरून मुद्दाम करून घेतलेले चित्र अशा गोष्टीही दिसतात. त्यामुळे अंक अधिक आकर्षक झाले आहेत. एरवी फक्त सायन्स जर्नलमध्ये इंग्लिशमधून प्रकाशित होतील, अशा विषयांवरील लेखही आता प्रादेशिक भाषांमध्ये आणि दिवाळी अंकांत प्रकाशित होऊ लागले आहेत, ही दखल घेण्याजोगी बाब म्हणावी लागेल. दिवाळी अंकांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे विक्रेत्यांचे आणि प्रकाशकांचेही सांगणे आहे. पुण्यात कोथरूड परिसरात रस्त्याला फुटपाथवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे गेल्या ८-१० दिवसांत सात ते साडेसात लाख रुपयांच्या दिवाळी अंकांची उलाढाल झाली. शहरातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे अनेक दिवाळी अंक पुन्हा पुन्हा मागवावे लागले, ही आशादायक गोष्ट आहे. मुळात गेल्या ३-४ वर्षांत दिवाळी अंक लवकर प्रकाशित होतात आणि दसऱ्याच्या सुमारालाच बाजारपेठेत दाखल होतात.
अनेक मोठ्या पुस्तक विक्रेत्यांनी प्रकाशकांशी, संपादकांशी चर्चा करून एकत्रित दिवाळी अंकांच्या विक्रीचा एक नवा ट्रेंड बाजारात आणला आहे. त्यामुळे भेटवस्तू म्हणून देण्यासाठीही अशा दिवाळी अंकांच्या पॅकचा वाचक आवर्जून उपयोग करतात, हे लक्षात आले आहे. प्रकाशकांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये काळानुरूप बदल केले आहेत. त्यामुळे अंकांच्या ऑनलाइन खरेदीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रकाशक-संपादकांनी आपल्या अंकांविषयी तसेच आपण कुठल्या अंकांमध्ये लेखन केले आहे हे सांगण्यासाठी लेखकांनीही समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतल्याचे यंदा प्रामुख्याने ठळकपणे जाणवले. या लेखनामधून होणारा दिवाळी अंकांचा थोडक्यात परिचय लक्षात घेऊनही ते अंक वाचणाऱ्या, विकत घेणाऱ्या वाचकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. तसेच इतर भागांमधून, राज्याच्या कानाकोपऱ्यांतून दाखल होणाऱ्या अंकांच्या विक्रीलाही हातभार लागला आहे.
अनेक संपादकांनी, प्रकाशकांनी काळानुरूप बदल स्वीकारत, नवे तंत्रज्ञान आणि नवी पिढी यांच्याशी नाते दृढ करण्यासाठी काही उपयुक्त, सकारात्मक पावले उचलली. लोकांची बदलती अभिरुची लक्षात घेऊन दृकश्राव्य अंकही प्रकाशित केले आहेत. त्यांनाही उत्तम प्रतिसाद आहे. दृष्टीश्रुती, पद्मगंधा, ऐसी अक्षरे, साहित्य चपराक यांची उदाहरणे त्यासाठी देता येतील. यंदा “आमचे २५ लाख मराठी वाचक” असे सांगत अभिमानाने मिरवणारे ‘छंद’ या दिवाळी अंकाचे होर्डिंग पुण्यात डेक्कन जिमखान्यावर झळकले, हीसुद्धा दिवाळी अंक, अभिरुची संपन्नता आणि अर्थकारण या सर्व दृष्टींनी दखल घेण्याजोगी बाब म्हणावी लागेल.
दिवाळी अंक म्हणजे कवी, लेखक, संपादक, मुद्रितशोधक, चित्रकार आणि प्रकाशक या साऱ्यांचा एकत्रित मिलाफ असतो. यामधूनच वाचकांशी असलेला भावबंध अधिक दृढ होत जातो. गेल्या ११४ वर्षांच्या वाटचालीत दिवाळी अंक आपले वैशिष्ट्य टिकवित, नवे प्रवाह सामावून घेत, काळानुरूप बदल स्वीकारत सशक्त होत गेले. दिवाळी अंकांनी वाचकांना वाङ्मयीन दृष्टी दिली. वाचक अभिरुचीवर संस्कार करणे आणि त्याचबरोबर लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे अशी दुहेरी जबाबदारी दिवाळी अंकांनी पेलली. त्यामुळे खरा ‘दीपोत्सव’ ४ दिवसांचा असला तरी त्यानिमित्ताने होणारा हा ‘शब्दोत्सव’ जवळजवळ वर्षभराचा झाला आहे. आजही काळाची विविध आव्हाने समोर असली तरी हा शब्दोत्सव नव्या चैतन्याने बहरतो आहे. त्यानिमित्ताने सर्जकतेला साद घालत प्रतिभेला बहर येतो, नवनव्या विषयांवर नव्याने चिंतन होते, त्यातून उदंड लेखन होते आणि वाचनसंस्कृती परिपुष्ट होत जाते, हे दिवाळी अंकांचे फार मोठे योगदान आहे.
यंदाच्या दिवाळी अंकांचे अंतरंग निश्चितच प्रेरणादायी, उत्साहवर्धक आणि सुखकारक आहे. त्यातून वाचनाचे समाधान मिळेल, नव्याने काहीतरी करण्याची ऊर्मी पल्लवित होईल आणि जीवनाच्या प्रकाशवाटा अधिकाधिक उजळत जातील, असा विश्वास वाटतो.