
मुंबई: दुबईत सुरू असलेल्या अंडर १९ आशिया चषकात(u19 asia cup) भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा युवा संघ पाकिस्तानकडून ८ विकेटनी पराभूत झाला. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ बाद २५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या संघाने केवळ दोन विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले. पाकिस्तानसाठी मोहम्मद जीशानने धारदार गोलंदाजी केली आणि अजान अवैसने शानदार शतक ठोकले.
ग्रुप एमधील या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीची जोडीची सुरूवात संथ आणि सावध झाली. ९व्या ओव्हरमध्ये ३९ धावांवर भारताला पहिला झटका बसला. अशिन कुलकर्णीला २४ धावांवर अमीन हसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर रुद्र पटेलही १ धावेवर बाद झाला. त्याला मोहम्मद जीशानने बाद केले.
आदर्श सिंह आणि कर्णधार उदय शरणने तिसऱ्या विकेटसाठी १२० बॉलमध्ये ९३ धावा केल्या. भारतीय संघ यावेळी चांगल्या स्थितीत होता. मात्र आदर्श सिंह ६२ धावांवर परतला. त्यानंतर एकामागोमाग विकेट पडत गेले.
भारताच्या तीन फलंदाजांनी ठोकली अर्धशतके
यानंतर कर्णधार उदय शरणने सचिन धाससोबत मिळून ४८ धावा करताना संघाला २०० पार पोहोचवले. एकूण २०६ धावा झाल्या असताना तो ६० धावा करू बाग झाला. दुसऱ्या बाजूने विकेट पडतच होत्या. मुरूगन अभिषेकने ४ तर राज लिंबानीने ७ धावा केल्या. भारतीय संघाला ५० षटकांत ९ बाद २५९ धावा केल्या. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद जीशानने १० षटकांत ४६ धावा देत ४ विकेट मिळवल्या.
अजान अवैसचे शतक
२६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. २८ धावांवर पाकिस्तानचा पहिला गडी बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी झाली. त्यानंतर १३८ धावांवर त्यांची दुसरी विकेट पडली. मात्र त्यानंतर अजानने कर्णधार साद बैगसोबत १२५ धावांची नाबाद भागीदारी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.