प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
एका मुलाखती दरम्यान मुलाखतकाराने ज्याची मुलाखत घेत होता त्याला अचानक विचारलेला प्रश्न, “तुम्ही आस्तिक की नास्तिक?” मुलाखत देणारा खूप वेळ उत्तर देऊ शकला नाही आणि मग थोड्या वेळाने उत्तरला, “मी दोन्हीच्या काठावर आहे.” मुलाखतीतून माझे मन वेगळ्याच दिशेकडे वळले. आतल्या आत खोल विचारमंथन सुरू झाले. मन अनेक वर्षं मागे गेले. नुकतेच लग्न झाले होते आणि पहिल्याच दिवशी सासूबाई म्हणाल्या, “हे बघ रोज अंघोळ झाली की देवाला हात जोडूनच पुढचे कामं करायची.”
माझ्यात तशी श्रद्धा कमीच त्यामुळे केवळ सासूबाईंचा मान राखणे, एवढ्या उद्देशाने ‘हात जोडणे’ व्हायचे. मग कधी वेळ नाही म्हणून तर कधी लक्षात राहिले नाही म्हणून परंतु देवाला ‘हात जोडणे’ हे हळूहळू कमी होऊ लागले आणि एक दिवस बंदच झाले. हे जरी खरे असले तरी सासूबाई काही सांगायच्या, जसे की भाजी बाजारात चालली आहेस तर तिथे असलेल्या मारुतीला नारळ फोडून ये. आज शनिवार आहे.’ इथे नुसते ‘हो’ म्हणून चालणार नसते कारण तो फोडलेला अर्धा नारळ घरी आणावा लागतो ना… मग नारळ फोडणे व्हायचे. त्यांच्यासोबत कधी रस्त्याने जाताना कुठल्या अशा दुकानात सत्यनारायणाची पूजा चालू असायची तर त्या म्हणायच्या, ‘हे बघ सत्यनारायणाचा प्रसाद असा डावलून पुढे जायचं नसतं.” मग त्यांच्या सोबतीने मी पण हात पुढे करायचे आणि प्रसादही खायचे.
कधी या कारणास्तव कधी त्या कारणास्तव देवळात जाणे व्हायचे, घरातल्या पूजेत सहभागी होणे व्हायचे, सासू-सासरे घरात नसल्यावर देवाची पूजा करणे व्हायचे. सणासुदीला घरातल्या सर्व माणसांबरोबर आरती म्हणण्याची वेळ यायची तेव्हा खणखणीत आरतीही म्हणायचे. एक मात्र खरे की मनासारखे काही झाले नाही की मनात यायचेचं की आपल्या मनात खरी श्रद्धा नाही, म्हणून असे घडत आहे. कधी सहलीच्या निमित्ताने तर कधी उत्सुकता म्हणून मंदिराचे निरीक्षण करण्याची, मंदिरातल्या देवांच्या आख्यायिका ऐकण्याची, देवळाच्या प्रांगणात देवाची पूजा करण्याची संधी मिळत गेली. देवाविषयी नेहमीच आकर्षण वाटत राहिले आहे. पण परत श्रद्धा म्हटले की कुठेतरी ती कमी आहे हे जाणवतेच! कार्तिकी-आषाढीला विठोबाच्या दर्शनासाठी चार दिवस रांगेत शांतपणे उभे असलेले भाविक पाहिलेले आहेत. पौर्णिमेच्या दिवशी तुपाचे-तेलाचे दिवे पाण्यात सोडण्यासाठी हजारो मैल प्रवास करून गेलेले भाविक पाहिलेले आहेत. नवस बोलण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करणारे भाविक पाहिलेले आहेत. गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी सुट्टी मागितल्यावर, सुट्टी नाकारल्यामुळे कायमस्वरूपी नोकरी सोडणारे श्रद्धाळू भाविक पाहिलेले आहेत.
एक मात्र खरे की काहीतरी मिळाल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक देवदर्शनासाठी येणे शक्यच नाही, असे कुठेतरी आतून जाणवल्याशिवाय राहत नाही. मध्यंतरी जवळच्या मित्रवत भावाच्या मुलाला एका असाध्य रोगातून जीवदान लाभावे, यासाठी भक्तीभावाने देवाची पायरी चढले. देवाच्या चरणी लीन झाले. ‘माझे आयुष्य त्याला लाभावे’, अशी प्रार्थनाही केली पण माझी प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचली नाही बहुदा, याबद्दल अनेकदा अश्रू ढाळले आणि परत लक्षात आले की आपल्या श्रद्धेतच खोट आहे. एका मैत्रिणीने एकदा विचारले होते, “देवाचे तू फार करत नाहीस ना?” मी म्हटले, “देवाला हात जोडते पण कर्मकांड करत नाही.” ती म्हणाली, “खूप छान.”
काही दिवसांनंतर तिला कर्मकांड करताना पाहून आश्चर्यचकित झाले. मी तिला काही विचारले नाही आणि तिनेही स्वतःहून काही सांगितले नाही; परंतु माणसे अनेकदा टोकाची आस्तिक आणि टोकाची नास्तिक होत राहतात, हे मात्र नाकारून चालणार नाही. कारणे कोणतीही असोत… त्यामुळे मलाही कोणी प्रश्न विचारला की, मी आस्तिक की नास्तिक? तर अनेकांसारखे माझे उत्तर असेल… “मी दोन्हींच्या काठावर आहे.”