मुख्यमंत्री शिंदे यांची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका
ठाणे : अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी होणा राम मंदिराच्या उद्घाटनासाठी (Ayodhya Ram Mandir Inauguration) देशभरातील सर्व हिंदूधर्मीय (Hindu) प्रचंड उत्साही आहेत. विरोधक ज्या गोष्टीवरुन टीका करत होते, ती गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शक्य करुन दाखवली. दरम्यान, या सोहळ्यासाठी मीरा भाईंदर येथील रामसेना फाउंडेशनचे ३०० प्रभू श्रीराम भक्त कार्यकर्ते आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या पुढाकाराने मीरा भाईंदर ते अयोध्या हा प्रवास पायी करण्यासाठी आज मार्गस्थ झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) उपस्थित होते. यावेळी संवाद साधताना राम मंदिराच्या तारखेवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता निशाणा साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, “काही जणांनी नरेंद्र मोदी यांच्यावर मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नही बताएंगे म्हणत टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण अयोध्येत मंदिरही बनले आणि तारीखही ठरली आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांचे दात घशात घालून दाखवण्याचे काम मोदी यांनी केले,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न आता पूर्ण होत असून येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असून अभूतपूर्व असा क्षण अनुभवण्यासाठी मीरा भाईंदर ते अयोध्या अशी पदयात्रा ४१ दिवसात पूर्ण करून २१ जानेवारी रोजी हे सारे अयोध्येत पोहोचणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी प्रत्येक हिंदूच्या मनातील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण करून दाखवले असून आधी हर घर मोदी हा नारा आता मन मन मोदी असा बदलला आहे,” असे पंतप्रधानांबद्दल मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले.
“पायी निघालेल्या ३०० रामभक्तांना प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये याची सर्व खबरदारी घेण्यात आली असून, जागोजागी त्यांची जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जमेल तिथे शिवसैनिकांनीही त्यांचे स्वागत करून त्यांना जमेल ते सहकार्य करावं,” असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. तसंच २२ जानेवारी रोजी आपल्या साऱ्यांना अयोध्येत नक्की भेटू, असा शब्दही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, विक्रम प्रताप सिंह तसेच शिवसेनेचे मीरा भाईंदर येथील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.