कोकणी बाणा: सतीश पाटणकर
दापोली तालुक्याच्या कोळबांद्रे गावात शंकराची पिंडी एका ढिगातून वर आली. ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला. त्यामुळेच त्या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले. ब्रिटिशकालीन या मंदिराचा २०१५ साली जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात असलेला नक्षीदार घुमट, मंदिरासमोरील त्रिपूर यामुळे मंदिराभोवतीचे वातावरण तेजोमय वाटते.
दापोली तालुक्याच्या कोळबांद्रे गावात शंकराचे ‘डिगेश्वर मंदिर’ हे प्राचीन देवस्थान आहे. दापोली तालुक्यातील कोळबांद्रे या गावात माड-पोफळी, बारमाही वाहणारी नदी, विरळ लोकवस्ती यांच्या साक्षीने वसलेलं स्वयंभू श्री भगवान शंकराचं ‘डिगेश्वर मंदिर’. हे एक प्राचीन देवस्थान असून पूर्वी या मंदिराच्या जागेत शेती केली जात असे. ही शेती दाभोळमधील लोखंडे यांची असल्याने ते या ठिकाणी शेती करीत असायचे. एकदा या जमिनीत नांगरणी सुरू असताना नांगराचा फाळ जमिनीत एका ढिगामध्ये खोलवर रुतून बसला. ज्या ठिकाणी फाळ रुतला गेला तिथून पाण्याचा प्रवाह सुरू झाला. हा प्रवाह वाहत जाऊन नजीकच्या तळीला जाऊन मिळाला व त्या तळीतील पाणी कधीही आटलेले नाही. ज्या ढिगात नांगराचा फाळ रुतला व प्रवाह सुरू झाला अगदी तिथेच शंकराची पिंडी वर आली. ही चमत्कारिक गोष्ट संपूर्ण गावात पसरली. काही दिवसांतच या पिंडीची मंत्रपठण करून शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आली, त्याचसोबत सन १८११ साली मंदिराची स्थापना करण्यात आली.
ही शंकराची पिंडी एका ढिगातून वर आल्याने ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला असावा व त्यामुळेच या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले, अशी आख्यायिका गावकरी सांगतात. काही काळानंतर गावकऱ्यांनी इतर देव-देवतांच्या म्हणजे गणपती, नंदी, चंडीका देवी, कोटेश्वरी देवी, झोलाईदेवी, काळकाई देवी, भैरी भवानी देवी, वाघजाई देवी, मानाई देवी इत्यादी देवदेवतांची स्थापना करण्यात आली. डिगेश्वरासह सर्व देवदेवतांची पूजा गावाचे ‘पाटील’ करत होते; परंतु इथे शंकराची स्वयंभू पिंडी असल्याने शंकराच्या पिंडीची स्थापना करण्यासाठी लिंगायत ब्राह्मण असतात असे तेथील ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे येथे मंत्रपठण, होमहवन करून मूर्त्यांचे शुद्धीकरण करून तेव्हापासून ते आजपर्यंत गुरवच पूजा करीत आहेत. हा गुरवांचा पूजेचा कालावधी एक एक वर्षाचा असतो. दुसऱ्या वर्षी दुसरा गुरव पूजा करतो आणि डिगेश्वराच्या गाभाऱ्यात फक्त गुरवांनाच प्रवेश दिला जातो, असे गावकरी सांगतात.
देवस्थान ब्रिटिश काळातील असून पूर्वी या मंदिराच्या भिंती पूर्णतः मातीच्या होत्या. काही काळानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला. या डिगेश्वराच्या बाजूला दोन मंदिरे असून इतर स्थापित देवदेवतांचे उत्सवही साजरे होतात. महाशिवरात्रीला डिगेश्वरावर दुधाचा अभिषेक वाहिला जातो. रात्री लहान मुलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. तसेच भजन, कीर्तन सादर होत असते. नवरात्रीत चंडीका देवी, कोटेश्वरी देवी, झोलाई देवी, काळकाई देवी, भैरी भवानी देवी, वाघजाई देवी, मानाई देवी या देवींचे उत्सव साजरे होत असतात.
दर तीन वर्षांनी अधिक महिन्यात देवी कोटेश्वरी – कोळबांद्रे व देवी कोटेश्वरी – सडवली या दोन देव्यांच्या पालख्यांचे मीलन सडवली – कोळबांद्रे येथील नदीवर होते. याचे कारण कोळबांद्रे येथील कोटेश्वरी देवी व सडवली येथील कोटेश्वरी देवी या एकमेकींच्या सख्ख्या भगिनी आहेत, अशी आख्यायिका आहे. फुलांचा हार करून पालख्या सजवतात, देवींना रूपे चढवली जातात, दोन्ही गावचे मानकरी पालखीसह नदीवर जातात. देवींची खणा-नारळाने ओटी भरली जाते, गुरव नैवेद्य दाखवतात, नदीच्या काठावर पालख्यांचे नाचवणे – खेळवणे होते. हे सर्व उत्सव कोळबांद्रे गावातील बारा वाड्यांतील ग्रामस्थ साजरे करतात.
कोळथरे स्थित श्री कोळेश्वर महादेव अनेक “कोकणस्थ ब्राह्मणांचे” कुलस्वामी व ग्रामदैवत आहे. कोळथरे गाव दापोली-दाभोळ या मुख्य रस्त्यापासून आत समुद्रकिनाऱ्यावर वसलेला आहे. श्री कोळेश्वर बर्वे, माईल, छत्रे, भावे, वाड, कोल्हटकर, बापये, बोरकर, पिंपळखरे, महाजन, लोणकर, वर्तक, लाटे, शेठे, शोचे, शेंड्ये, जोशी, लागू, दातीर, सोमण, गोमरकर, बाम, पेठे, जोगदंड, दातार, भागवत, अग्निहोत्री, खंगले, खंडाजे, खाजणे, बाळ, जोगदेव, गानू, पर्वते, विनोद, कर्वे, डोंगरे, माटे, जोगदंड, गद्रे, मोडक, कुंटे अशा कोकणस्थ ब्राह्मण घराण्यांचा कुलस्वामी आहे. मंदिर गावाच्या मध्यभागी असून या मंदिराला असलेले नक्षीदार घुमट, मंदिरासमोर असलेले डोळे दीपवून टाकणारे त्रिपूर यामुळे या मंदिराभोवतीचे वातावरण अजूनच तेजमय झाले आहे.(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)