गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
स्वप्नांतही परदेशात जाण्याचा विचार केला नसताना ऑक्टोबर १४ मध्ये मला पहिला विमान व परदेश प्रवास घडला. एसएसआर विमानतळावरून मॉरिशसच्या घरी जाताना उसाची शेते पाहताच आपल्या देशाची आठवण झाली. माझ्या मिस्टरांच्या व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून मॉरिशस विद्यापीठातील सहा महिन्यांच्या वास्तव्यांत मी दोन महिने तेथे होते. क्वात्रे बार्नेस या मध्यम वर्गीय शहरांत, एका कुटुंबाने त्यांची वरची जागा आम्हाला भाड्याने दिली.
मॉरिशस हे उष्ण कटिबंधात वसलेले हिंद महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला मुंबई एव्हढा लहान देश आहे. हजारो वर्षांपूर्वी हिंद महासागरातील पठारावर झालेल्या ज्वालामुखींतून निर्माण झालेल्या द्वीप समूहातील मॉरिशस हे सर्वात प्रमुख बेट. निळ्याशार समुद्रातील ही हिरवीगार बेटे विमानातून पाचूसारखी दिसतात म्हणून हा पाचूचा देश. पांढरा वालुकामय किनारा असलेले अनेक किनारे, स्फटिकासारखे नितळ पारदर्शक निळे पाणी, अगणित पाम वृक्ष, हिरवीगार जंगले, अनेक विस्तीर्ण उद्यानांत दुर्मीळ वनस्पती प्राणी, डोंगराळ भागातून वाहणाऱ्या नद्या, कोसळणारे धबधबे, समुद्र किनाऱ्याजवळ दिसत असलेली प्रवाळांची विविधता आणि कोरल रिफने खुल्या महासागरातील संरक्षित केलेली सरोवरे! जैवविविधतेचे केंद्र बनलेले, चोहोबाजूने नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले, पर्यटकांचे आवडते ठिकाण मॉरिशस बेट!
अनेक खलाशांनी पाहिलेल्या या निर्मनुष्य बेटाचा डचानी १५९८मध्ये शोध लावल्याने नासाऊ देशाच्या प्रिन्सच्या सन्मानार्थ या बेटाला मॉरिशस हे नाव दिले. या बेटावर फ्रेंच, नंतर इंग्रजांनी बरेच वर्ष राज्य केल्याने इंग्रजी मॉरिशसची राष्ट्रीय भाषा ठरली. क्रियोल ही त्यांची बोली भाषा! १२ मार्च १९६८ला मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले. १९९२मध्ये प्रजासत्ताक झाले. केवळ व्यापार आणि लष्करीदृष्ट्या महत्त्व असलेले मॉरिशस उसाचे मळे व साखर निर्मितीचे प्रमुख केंद्र बनले. आफ्रिकन लोकांनी माळ्यावर काम करण्यास नकार दिल्यानंतर बहुसंख्य भारतीय मजुरांना बोलवले गेले. भारतीय मजुरांचे केंद्र बनलेले, ते स्वागतबिंदूचे ठिकाण, ‘अप्रवासी घाट’ म्हणून ओळखले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा तो एक भाग आहे.
गेलेले भारतीय मजूर तेथेच राहिल्याने, हिंदू धर्म, संस्कृती, मराठी भाषा आजही तेथे टिकून आहे. मॉरिशसचा धर्म हिंदू. हिंद महासागराचाच किनारा लाभलेला मॉरिशस, भारताची छोटी आकृती आहे. भारतीयांना मॉरिशसमध्ये येण्यासाठी व्हिसा लागत नाही. मॉरिशसमध्ये सर्व धर्मियांची पवित्र स्थळे असून हिंदी, तामिळ, फ्रेंच याही भाषा बोलल्या जातात. अनेकांच्या स्थलांतरणामुळे मॉरिशस देशाची संस्कृती, खाणे बहुसांस्कृतिक आहे. न उडणारा डोडो हा मॉरिशसचा राष्ट्रीय पक्षी आहे. मॉरिशसच्या देशाच्या ध्वजातील लाल रंग स्वातंत्र लढ्याचा, निळा हिंद महासागराचा, पिवळा स्वातंत्र्याच्या नव्या प्रकाशाचा आणि वर्षभरातील हिरवा अशी ध्वजातील रंगाची प्रतीक आहेत.
क्वात्रे बोर्नस येथील म्युनिसिपल भाजी फळ मार्केट आणि कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रविवारच्या बाजारालाही भेट दिली. संध्याकाळी जवळच्या मैदानाला चालत फेरी मारताना एका बाजूने चढण्यासाठी टेकडी, मुलांना खेळण्यासाठी, मैदानाचे केलेले भाग, मध्यम उंचीचा आडवा डोंगर, जिमची साधने, ओपनजीम असा त्या मैदानात सर्व वयोगटाचा विचार केला होता. एक नवल वाटले संध्याकाळी पाच/सहा वाजल्यानंतर सर्व दुकाने तसेच रविवारी एक नंतर मॉल बंद. मॉरिशसमध्ये बसचे जाळे चांगले आहे. आम्ही बसनेच फिरलो. मॉरिशसमध्ये खाणे, कपडे बाहेरून येतात. मॉरिशसच्या कोस्टल रोडच्या राईडमध्ये बेल रोड ओम्बरे या जागी, समुद्राने वेढलेला रस्त्याच्या टोकाला उभा असलेला डोंगर. डोगराला वळसा घालून गाडी पुढे जाते. या डोंगरच्या टोकांवर एकच जण उभा राहू शकतो. तोही अविस्मरणीय अनुभव घेतला.
प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे वैशिट्य वेगळे. सूर्योदयासाठी ‘बेले मारे पलंगे’; सावली देणारी झाडे खूप असल्याने विश्रान्तीसाठी, सुरक्षित पोहण्यासाठी ‘ला क्यूवेट’ हा छोटा, त्याच्याजवळचा‘ग्रँड बे’हा मोठा लोकप्रिय समुद्रकिनारा; मासेमारी, पाण्यातील साहसी खेळ, कोरल रिफ, स्नॉर्केलिंगसाठी ‘ईले ऑक्स सर्फ्स’सार्वजनिक मोठा समुद्रकिनारा; ‘तामरीन’ हा अस्सल समुद्रकिनारा, सर्फिंग, बॉडी बोर्डिंग, डॉल्फिन सोबत पोहणे, फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम !
तामारिन समुद्राच्या मध्यभागी आम्ही दोन बोटीच्या मदतीने आलो. भर समुद्रात हे डॉल्फिनसोबत बराच वेळ पोहले आणि याच बोटीतून मी समुद्रात उडी मारली. क्षणार्धात झपकन इतक्या वेगाने खोलवर खाली गेले. चेहऱ्यावरचा मास निघाला. जोरजोरात हातपाय हलवत वर आले नि हेल्प हेल्प म्हणून ओरडले. मार्गदर्शकाच्या मदतीने बोटीत चढले. ‘ब्लू बे मारिन पार्क’ एक अपवादात्मक संरक्षित सागरी उद्यान. काचपट्टीच्या बोटीतून समुद्राच्या आतील अद्भुत जीवसृष्टी, रंगीबेरंगी प्रवाळ खडक, कोरल ऑस्ट्रलियापेक्षा येथे खूप असून स्पष्ट व सुंदर दिसते.
काही प्रसिद्ध ठिकाणे –
१. रंगीत पृथ्वी – एक अद्वितीय युनिक भूवैज्ञानिक वैशिट्य, एका छोट्या भागांत वर्षभर वाळूच्या ढिगाऱ्यावर सात रंगाचे पट्टे पाहतो.
२. जवळच १०० मीटर उंचीवरून पडणारा ‘चामरेलाच धबधबा’.
३. तमारीन नदीतून उगम पावलेला सात मोतीबिंदूची मालिका असलेला ‘टॅमरिंड फॉल्स किंवा सेव्हन कॅस्केड’. या धबधब्याभोवती जंगल असल्याने लोकप्रिय हायकिंग डेस्टिनेशन.
४. ब्लॅक रिव्हर गॉर्जेस- लुप्त होणाऱ्या वनस्पती प्राण्यांच्या दुर्मीळ प्रजाती वाचविण्यासाठी डोंगराळ भागात, घनदाट जंगलात बांधलेले राष्ट्रीय उद्यान.
५. ‘पाम्पलेमोसेस’ उद्यानातील महाकाय वॉटर लीली.
६. ‘पर्यावरणीय प्राणी उद्यानांत’ शेंकड्यानी मगरी असून हिरव्यागार पाम आणि बांबूच्या झाडाखाली जन्मजात कासवापासून अतिविशाल कासवाच्या हालचाली पाहतो.
७. ‘कसेला ॲडव्हेचर उद्यानात’ साहसी खेळ, आफ्रिन सफारी, मार्गदर्शकाच्या मदतीने सिंहाशी भेट.
८. ‘गंगा तलाव (ग्रँड बेसिन)’ मॉरिशसमधील सर्वात लोकप्रिय हिंदूंचे पवित्र स्थान. गंगा तलावाच्या प्रवेश द्वाराजवळ हातातील त्रिशुलासह भगवान शंकराची कास्य मूर्ती. तळ्यासभोवतालचा आणि बाजूचा सर्वच परिसरात इतर देवांची देवळे.
१. ‘मोका’ येथे मॉरिशसच्या विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस असून मॉरिशसमध्ये सर्व स्तरावर उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळते.
२. ‘पोर्ट लुईस’ ही मॉरिशसची राजधानी, सर्वात मोठे गजबजलेले चैतन्यशील शहर. आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रमुख केंद्र. येथे मॉरिशसच्या मिश्र संस्कृतीचे दर्शन घडते.
३. ‘महेरबर्ग’ मॉरिशसच्या प्रमुख शहर. ऐतिहासिक नौदल संग्रहालय व स्थानिक व्यापाराचे गजबजलेले. वॉटरफ्रंटवरील बोटींच्या स्पर्धा.
मॉरिशच्या अर्थ व्यवस्थेला पर्यटनाचे बळ आहे. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या मॉरिशसला भेट द्या.!!