Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडी'मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान'

‘मोहब्बतच्या दुकानातील शटरमागे काँग्रेसच्या करप्शनचे काळेकुट्ट दुकान’

मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींकडून नेहमीच प्रेमभावना आणि एकतेचा संदेश दिला जातो. भारत जोडो यात्रेतून हा संदेश घेऊन आपण काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा केल्याचे ते म्हणतात. म्हणूनच काँग्रेसकडून त्यांचे उदाहरण देताना, मोहब्बत की दुकान ही टॅगलाईन दिली जाते. आता, याच टॅगलाईनला धरुन भाजपाने काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काँग्रेस खासदार धीर साहू यांच्याकडे सापडलेल्या २२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड आणि संपत्तीच्या प्रकरणावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

‘गरीब हटाओ’चे नारे देत, जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकत, गरिबीचे सोंग आणत कसे दौलतजादे बनतात काँग्रेसी? याचे जितेजागते उदाहरण म्हणजे खासदार धीरज साहू!. आयकर बुडवून बेहिशेबी पैसा इतका दडवून ठेवला की मोजता मोजता मशिन्स बंद पडल्या. जनतेला सांगायचे ‘धीरज रखो, भला होगा’ आणि स्वतः गरिबांच्या पैशावर डोळा ठेवून गब्बर व्हायचे. गरिबांच्या योजनांसाठी वापरला करोडो रुपयांचा आयकर बुडवायचा हाच या मद्यसम्राटाचा धंदा!. भ्रष्टाचाराने बरबटलेले काँग्रेस राजवटीतील गरिबांचे लुटारू आता जनतेला पुराव्यासह दिसू लागले, असे म्हणत बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

मोहोब्बतच्या दुकानाच्या शटरमागे गरिबांना लुटणारे काँग्रेसचे असे ‘करप्शनचे काळीकुट्ट दुकान’ आहे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवरच टीका केली आहे.

आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशातील अनेक ठिकाणी मद्य उत्पादक कंपनीविरुद्धच्या करचुकवेगिरी प्रकरणी छापेमारी केली. आज शनिवारी चौथ्या दिवशीही ही छापेमारी सुरूच आहे. याप्रकरणात आयकर अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत रोख भरलेल्या १५६ बॅग जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये २२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड सापडली. संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर अधिकाऱ्यांचे पथक शनिवारी सकाळी तीन बॅगांसह रांची येथील काँग्रेस राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या निवासस्थानातून निघाले. धीरज साहू यांच्या घरातून जप्त केलेल्या बॅग या दागिन्यांनी भरल्या होत्या, असे सांगण्यात आले आहे. ही छापेमारी खासदार साहू यांच्याशी निगडीत कंपन्यांवर करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -