याच कुत्र्याने हल्ला केल्याची ही तिसरी घटना
मुंबई : अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील लोढा एटर्निस सोसायटीमधील (Lodha Eternis Society) एका जर्मन शेफर्ड कुत्र्याने (German Shepherd Dog) तेथील १० वर्षांच्या मुलीवर चीवघेणा हल्ला केला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर हिरानंदानी रुग्णालयात दोन तास ऑपरेशन करुन तिला तब्बल ४५ टाके घालावे लागले. विशेष म्हणजे याच कुत्र्याने परिसरातील रहिवाशांवर हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे. मात्र तरीही कुत्र्याचा मालक बेफीकीर असल्याने येथील रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डिंगच्या खाली कुत्र्याने मुलीवर हल्ला करत चावा घेतला. शेजाऱ्यांनी पालक झिंगिंग कुमार यांना हल्ल्याची माहिती दिली. तेव्हा मुलीला तात्काळ हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले.
चेतावणी देऊनही वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सोसायटीचे सचिव गुरप्रीत सिंग उप्पल यांनी कुमार यांच्या वतीने ३० नोव्हेंबर रोजी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५४ नुसार एफआयआर दाखल केला आहे.
इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही कुत्र्याच्या मालकाने मुलीच्या कुटुंबियांची साधी माफी देखिल मागितली नाही. उलट प्रति-एफआयआर करण्याची धमकीही दिली आहे.
दरम्यान, उप्पल यांनी निवासी संकुलांमध्ये पाळीव प्राण्यांमुळे सोसायटीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला दोन आंतरशालेय स्पर्धा आणि दोन आठवडे शाळेला मुकावे लागले. पीडित मुलगी ही राज्यस्तरीय तायक्वांदो खेळाडू असल्याचे उप्पल यांनी सांगितले.