अंधेरीतल्या हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी केली १२ वर्षाच्या मुलीची सुटका
मुंबई : अंधेरी परिसरातील सिल्व्हर क्लाऊड हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपींनी वेश्या व्यवसायासाठी एका अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याचे निदर्शनास आले असून पोलिसांनी त्या पीडित मुलीची सुटका केली आहे. हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी ही धक्कादायक आणि तितकीच गंभीर बाब उघडकीस आणल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील सिल्व्हर क्लाऊड हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचे रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १० ला मिळाली. या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर छापा टाकल्यानंतर ही सर्व माहिती उघडकीस आली.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दुर्गा सिंग (३४) नावाच्या महिला दलाल आणि हॉटेल व्यवस्थापक मोहम्मद नावेद (२४) यांचा समावेश आहे. सिंग ही अल्पवयीन मुलींची विक्री करायची, अशी माहिती हाती लागली आहे.
दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पोलिसांनी सात हजार रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
आरोपींविरुद्ध कलम ३६३ (ए), ३७० (ए) (१), ३७२ आणि ३४, तसेच महिला आणि अनैतिक वर्तनाशी संबंधित कलम ४ आणि ५ आणि कलम १६, १७ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.