नीलम गोऱ्हे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
नागपूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमीच बेताल वक्तव्ये करत असतात. त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून कायम टीका होत असते. अशातच काही महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाला रामराम ठोकून मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत सामील झालेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनीदेखील संजय राऊतांवर टीका केली आहे. त्याचसोबत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या ‘मीट द प्रेस’मध्ये त्या बोलत होत्या. मविआच्या काळात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जेव्हा आजारी होते, तेव्हा संजय राऊत टोकाची भूमिका घ्यायचे. त्यांना मी अनेकदा समजावलं पण पक्षश्रेष्ठींनीच त्यांच्याकडून हवं तसं वदवून घेतलं आणि त्यांचा बळीचा बकरा केला, असा खुलासा नीलम गोऱ्हे यांनी केला.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आजारी पडले आणि त्यावेळी तब्बल दोन ते तीन आठवड्यांसाठी सर्वांचा संवाद थांबला. त्या मधल्या काळात पक्षात नेमकं काय सुरू आहे, नेमकं कोण काय करतंय? अशा बऱ्याच गोष्टी कळेनाशा झाल्या. आमदारांना निधी दिला जात नव्हता, यावरुन त्यांची नाराजी होतीच. तसेच, त्यांची दखल कोणीच घेत नाही, ही खंतही आमदारांच्या मनात होती. सगळंच विस्कळीत होतं. काय सुरू आहे काहीच कळत नव्हतं.”
पुढे त्या म्हणाल्या, “मी संजय राऊतांशी स्वतः बोलले. त्यांना आता आठवतंय की नाही, मला माहीत नाही. मला त्यांच्याबाबत मनात आदरच होता, तेव्हाही होता आणि आजही आहे. मतभेद आहेत, वैचारिक मतभेद भरपूर आहेत, त्यांचे काही शब्द मला पटत नाहीत. पण मी त्यांना म्हटलं की, राऊत तुम्ही आत्ताच जेलमधून आला आहात. एवढी टोकाची भूमिका घेत आहात, त्याऐवजी थोडंसं शांतपणे बोला. १०० टक्के आक्रमक बोलण्यापेक्षा, वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीने मांडले जातात तसा तुम्ही याबाबत विचार करा.
यावर ते मला म्हणाले की, माझं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे आणि मी असाच बोलणार. आता त्यांनीच असं बोलल्यावर पुढे काय बोलणार? शेवटी असं आहे की, आपण सांगण्याचं काम करू शकतो. त्यांचं बोलणं पक्षश्रेष्ठींना आवडणारं होतं, पटणारं होतं. पक्षश्रेष्ठींना स्वतः जे बोलायचं होतं, ते त्यांच्याकडून बोलून घेत होते. त्यामुळे त्यांना पक्षाने बळीचा बकरा केलं, असं माझं मत आहे”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.