वसुंधरा राजेंना दिल्लीत बोलावले; पुन्हा कमान मिळणार!
नवी दिल्ली : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. परंतु अद्यापही मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार यावर भाजपने शिक्कामोर्तब केलेले नाही. बाबा बालकनाथ ते राज्यवर्धनसिंग राठोड यांच्यापर्यंतच्या नावांची चर्चा जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे वसुंधरा राजे यांना पुन्हा दिल्लीत बोलावले आहे. राजस्थानमध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
वसुंधरा राजे भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. २००३ ते २००८ आणि २०१३ ते २०१८ अशा दोन वेळा त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्या मुख्यमंत्री चेहरा होत्या, या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते.
याआधी वसुंधरा राजे यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटीची वेळ मागितली होती. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे या मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. राजे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सोमवारी त्यांच्या निवासस्थानी त्यांची आणि भाजपच्या ६० हून अधिक नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. मंगळवारी, आमदारांनी याचे वर्णन शिष्टाचार भेट म्हणून केले आणि पक्ष नेतृत्वाने राजे यांना राज्यातील सर्वोच्च पदासाठी निवडल्यास ते त्यांना पाठिंबा देतील असे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, वसुंधरा राजे यांनी आमदारांच्या भेटीनंतर पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केली होती आणि त्या पक्षाच्या शिस्तप्रिय कार्यकर्त्या असल्याचे सांगितले होते.
वसुंधरा राजे झालरापाटन मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुन मेघवाल आणि पक्षाचे खासदार बाबा बालकनाथ आणि दिया कुमारी हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये आहेत.