
पुढचे दहा दिवस राजकीय उलथापालथींचे...
नागपूर : महाराष्ट्रात गेले काही दिवस राज्याचे वातावरण तापवणार्या अनेक घटना घडल्या आहेत. मराठा आरक्षण हा त्यातील पेटलेला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. याशिवाय अवकाळी पाऊस, शेतकर्यांचं नुकसान, वाढलेली गुन्हेगारी, ड्रग्ज कारवाया आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची वेळ आली आहे. आजपासून नागपुरात (Nagpur) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जुंपण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात विरोधकांकडून प्राधान्याने शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात सरकारकडे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. तसेच आरोग्य विभागातील असुविधा, ड्रग्ज कारखाने व त्यांवरील कारवाया यासंबंधी विरोधक प्रश्न उपस्थित करु शकतात. या प्रश्नांना सत्ताधारी काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी अनेक मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काही घोषणा करतं का? आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काही निर्णय घेतं का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
कसं असेल पहिल्या दिवसाचं कामकाज?
सुरुवातीला अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील -
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश २०२३ (दुसरी सुधारणा) (वित्त विभाग)
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२३ ( उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग)
महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक २०२३(गृहनिर्माण विभाग)
सन २०२३-२४ च्या पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील - शासकीय कामकाज
त्यानंतर शोकप्रस्ताव सादर केला जाईल.