Tuesday, July 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशाळेच्या वेळा बदलणार!

शाळेच्या वेळा बदलणार!

राज्यपालांच्या सूचनेला पालकांचाही पाठिंबा

नागपूर : मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यानंतर, त्याला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा मिळत आहे. काही शैक्षणिक संस्थांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या सकाळच्या सत्रातील शाळा सात वाजताच्या आसपास भरत असून, ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल. पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी राज्यपाल बैस यांनी सकाळच्या सत्राच्या शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या. बदलत्या जीवनशैलीनुसार प्रामुख्याने शहरी भागांतील पालकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या असून, अनेक पालक रात्रपाळी आणि कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे असतात. त्यामुळे मुलेही रात्री उशिरापर्यंत जागी असतात. त्यातही मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढला आहे. अनेक मुले रात्री मोबाइल किंवा कम्प्युटर पाहतात. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या (पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक) शाळा सकाळी सातच्या आसपास भरतात. त्यासाठी मुलांना पहाटे सहा वाजल्यापासून, तर पालकांना जेवणाचा डबा आणि मुलांची तयारी करण्यासाठी पहाटे पाच वाजताच उठावे लागते. या सर्वांत मुलांची झोप पूर्ण होत नाहीच; शिवाय पालकांनाही धावपळ करावी लागते. या पार्श्वभूमीवर शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याबाबत अधूनमधून चर्चा होते. मात्र, राज्यपाल बैस यांनी सरकारला सूचना दिल्यामुळे, आता पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकार सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळा बदलणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

‘झोपेच्या गणितानुसार शाळेच्या वेळा बदलण्याबाबत सकारात्मक विचार व्हायला हवा. टीव्ही आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. आई-वडील नोकरी करणारे असल्याने, त्यांच्या कामावरून घरी परतण्याच्या वेळाही रात्री उशिराच्या असतात. अशा वेळी स्वाभाविकपणेच सर्व कुटुंबाला झोपायला उशीर होतो. फक्त शहरातच नाही, तर खेड्यापाड्यातसुद्धा रात्री ११ किंवा त्यानंतर झोपणे अगदी स्वाभाविक मानले जाते. शाळेत जाण्यासाठी म्हणून मुलांना सकाळी लवकर उठवले जाते. अशा वेळी मुले शाळेत पेंगतात, झोपतात. त्यामुळे शिक्षकांच्या शिकवण्याकडे त्या मुलांचे लक्ष नसते.

राज्यातील जवळपास सर्वच शहरांमधील विद्यार्थ्यांची शाळेची वेळ सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान आहे. यामुळे मुलांमध्ये प्रचंड तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्यपाल महोदयांनी संवेदनशिलपणे विचार करून शाळेच्या वेळा बदलण्याचे निर्देश दिले आहेत.

दप्तराचा भार हलका करा

राजभवनामध्ये राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिलेल्या भाषणात राज्यपालांनी शालेय विद्यार्थ्यांवर ताण दूर करण्याच्या दृष्टीने आपली मतं मांडली. राज्यपाल बैस यांनी शिक्षण विभागाला शाळांच्या वेळेसंदर्भात सूचना केल्या आहे. “ई-वर्गांना चालना देणं गरजेचं आहे. यामध्यमातून मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकविहीन शाळेचा विचार करता येईल. गुणवत्तेनुसार शाळांना श्रेणी द्याव्यात आणि यापैकी सर्वोत्तम शाळांना बक्षिसे द्यावीत. या माध्यमातून शाळांमध्ये सुधारणेसाठी स्पर्धा निर्माण होईल,’ असे बैस यांनी नमूद केले.

राज्यातील अनेक शाळा दोन सत्रांत सुरू आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रातील वेळ बदलण्याबाबत निर्णय तातडीने घेणे सोयीचे ठरणार नाही. मुलांच्या झोपेचा आणि शिकण्याचा संबंधांचा शास्त्रशुद्ध अभ्यास अजून झालेला नाही. सरकार प्रायोगिक तत्त्वावर काही शाळांत हा प्रयोग करू शकते. त्यानंतर राज्यभर शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याबाबत विचार करता येईल. – महेंद्र गणपुले, प्रवक्ते, मुख्याध्यापक महामंडळ

मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक मधील बहुसंख्य मुलांच्या शाळा सकाळच्या सत्रात आहे. शाळांचा पहिला तास सात वाजता किंवा आठ वाजता सुरू होतो. त्यामुळे मुलांना पहाटे साडेपाच किंवा सहा वाजता घाईगडबडीत उठून अर्धपोटी किंवा नाश्ता न करताच शाळेत जावे लागते. परिणामी आवश्यक असणारी सात ते आठ तासांची झोप व पुरेसा आहार मुलांना मिळत नाही. यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासावर याचा विपरित परिणाम होतो. सर्वसाधारणपणे कोणत्याही विद्यार्थ्यांची झोप केवळ सहा-सात तासच होते. याचा परिणाम पालकांवर देखील होत असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते विद्यार्थ्यांची पुरेशी झोप न झाल्यास विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होते. तसेच अपूर्ण झोपेमुळे विद्यार्थी दशेतच आजार जडण्याचे प्रमाण वाढत आहे. तरूण पणात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारासारखे गंभीर आजार सुरू झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या भवितव्यासाठी सरकारने संवेदनशिलपणे विचार करून कार्यवाही करावी – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -