Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यजगाच्या नकाशावर नव्या दृष्टीतला कोकण...

जगाच्या नकाशावर नव्या दृष्टीतला कोकण…

माझे कोकण: संतोष वायंगणकर

पन्नास वर्षांपूर्वी काँग्रेसी सत्ताकाळात निवडणूक प्रचारात कोकणचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही, अशीच सर्व नेत्या, पुढाऱ्यांची भाषणाची थिम होती. शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्यांना कॅलिफोर्निया होणार म्हणजे कोकणचं नेमकं काय होणार? असा प्रश्न पडायचा. हा प्रश्न डोक्यात घेऊनच आज पन्नाशीत-साठीत असलेले कोकणात लहानाचे मोठे झाले. त्यातच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे एकदा एका जाहीरसभेत बोलले, “अरे, कोकणचा कॅलिफोर्निया काय करायचा आहे? कोकण प्रांत हा साक्षात स्वर्गच आहे.” कॅलिफोर्नियाच्या घोषणा, चर्चा खूप झाल्या; परंतु कोकण हे कोकणच राहिलं.

इथला निसर्ग, जैवविविधता, सृष्टी सौंदर्य, समुद्र ज्यांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेली ही कोकणभूमी ते हिंदुहृदयातील अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारा सिंधुदुर्गची साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारणी झाली. हा जलदुर्ग आजही साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. ४ डिसेंबरला भारतीय नौसेना दिन मालवणच्या समुद्रकिनारी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच तारकर्ली येथे साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, तसेच दीपक केसरकर, गिरीष महाजन, उदय सामंत अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नेत्रदीपक आणि तितकाच ऐतिहासिक ठरणारा हा सोहळा पार पडला. आपल्या देशातील नौदलाशी संबंधित वरिष्ठ तर उपस्थित होतेच; परंतु त्याचबरोबर जगातील अनेक देशांतील नौदलाचे प्रमुख अधिकारीही या सोहळ्यास उपस्थित होते.

भारत देशाचा या वर्षाचा नौदल दिन कुठे साजरा झाला, याची उत्सुकता जगभरात होतीच. यामुळेच कोकणातील मालवणचे नाव नौदल दिनानिमित्ताने पुन्हा एकदा जगभरात पोहोचले आहे. कोकणातील या नौदल दिनाच्या निमित्ताने हा सोहळा काहींना प्रत्यक्ष, तर अनेकांना आपल्या घरी बसून हा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा सोहळा त्यातील नौसेनेच्या कमांडोंच्या कसरती याची देही पाहता आला ते क्षण डोळ्यांत साठवता आले. तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने, हेलिकॉप्टर विशेष दलांची थरारक प्रात्यक्षिके मंत्रमुग्ध करणारी होती. हा सारा अनुभवाबरोबरच कोकण गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटन नकाशावर आले होते. मात्र त्याची व्याप्ती मर्यादित होती. ती या नौदल दिनानिमित्ताने निश्चितच वाढली आहे. कोकणात पर्यटनस्थळांची कमी नाही. अनेक पर्यटनस्थळे काहीशी दुर्लक्षितही आहेत. या दुर्लक्षित पर्यटनस्थळांनाही विकासाच्या प्रवाहात आणले पाहिजे. जी सौंदर्यस्थळे आहेत त्यांनाही लोकांसमोर आणावं लागेल.

४ डिसेंबरच्या नौदल दिन सोहळ्यानंतर कोकणला काय मिळाले, असा प्रश्न कदाचित काहींना पडलेला असेल, तर कोकण जगाच्या नकाशावर आले आहे. कोकणातील या पर्यटनस्थळांचे मार्केटिंग कसं करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मालवणातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. राजकोटही आता नव्याने जगासमोर आला आहे. कोकणातील अनेक पर्यटनस्थळे ही लोकचर्चेत आहेतच. तारकर्लीचं नाव तर सर्वदूर पसरलेले आहे. आज बाहेरून आम्हाला तारकर्लीला जायचं आहे असं म्हणतो. मग त्याला आपणाला सांगावं लागतं की, तारकर्ली सर्वांग सुंदर आहेच; परंतु त्याचबरोबर सिंधुदुर्गात आणि कोकणात अनेक पर्यटनस्थळे आहेत. कोकणात यानंतरच्या काळात कोणते बदल घडू शकतात, विकासात कोकण कशा पद्धतीने अग्रेसर होऊ शकते, यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातही त्यांनी उल्लेख केला.

देशाचा विकास कशा पद्धतीने होत आहे आणि भविष्यात काय घडू शकेल, यासंबंधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. कोकणाची आर्थिक समृद्धी पर्यटन व्यवसायातूनच होणारी आहे. त्यामुळे कोकणच्या पर्यटन विकासाला चालना देऊन समृद्धीची द्वारे उघडली पाहिजेत. जे कोकणात आहे, ते कुठेच नाही; परंतु दुर्दैवाने कस्तुरी मृगासारखी अवस्था कोकणवासीयांची आहे. कस्तुरी कुपित असून मृगाला त्याची माहितीच नसते. तसेच कोकणवासीयांचे आहे. त्यांच्याकडे असलेल्या निसर्गसंपत्तीबद्दल कोकणवासीयच कोसो मैल दूर आहेत. यापुढच्या काळात मतभेदांपेक्षा ‘कोकणचा विकास’ या एकाच मुद्द्याला महत्त्व देऊन काम केले पाहिजे. ४ डिसेंबरचा नौदल दिन मालवणला साजरा झाल्याने कोकणवासीयांसाठी जसा हा सुवर्णक्षण आहे तसाच या नौदल दिनाने कोकणचे भवितव्य उज्ज्वल केले आहे असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांनी, जलदुर्ग निर्मितीने जो इतिहास अजरामर करण्यात आला आहे, या इतिहासाला यानिमित्ताने उजाळा मिळाला आहे. नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांना, सिंधुदुर्गला अभिवादन केले आहे. नौदल दिनानिमित्ताने जो नेत्रदिपक सोहळा पार पडला. त्यामुळे निश्चितच कोकणचे भाग्य उजळले आहे. विकासाला चालना मिळेल. यानंतरच्या काळात कोकण विकासाचा एक नवा दृष्टिकोन प्राप्त झाला आहे. या सर्वासाठी कोकणवासीयांनी आपला दृष्टिकोन बदलायला हवा आहे. नकारात्मकता आणि नको त्या गोष्टीमध्ये असलेली नको तितका चिकित्सकपणा बाजूला ठेवण्याची गरज आहे. आतापर्यंत या नकारात्मकतेनेच आपल्या कोकणचे नुकसान झाले आहे. नौसेना दिन कोकणात आपल्या मालवणमध्ये झाला, तो आपल्या भाग्याचा क्षण असतानाही जेव्हा समाजमाध्यमांवर त्यावरही नकारात्मक चर्चा होते. तेव्हा विचारांचे किती दारिद्र्य घेऊन वावरतो, ते निश्चितच समोर येते. यानिमित्ताने झालेला बदल आपण स्विकारणार नसू, तर मग विकासावर काय बोलणार?

या वर्षीचा वर्षअखेर आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वाधिक पसंती ही कोकणलाच असेल. कोकणवासीयांनी नौदल दिनानिमित्ताने होणाऱ्या बदलाचे मार्केटिंग कसे करता येईल, हे पाहिले पाहिजे. जो एक वर्ग केवळ नकारात्मकतेने विचार करतो, चुकीचे नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातो अशांपासून कोकणवासीयांनी सावध असायला पाहिजे. वैचारिक गोंधळ होऊ न देता कोकणच्या पर्यटन विकासाला, अर्थव्यवस्थेला चालना कशामुळे मिळेल, याचा विचार आपण केला पाहिजे. भविष्यात कोकणात येणाऱ्या पर्यटकांसोबत ‘अतिथी देवो भव’ याप्रमाणेच आपण वागलं, बोललं पाहिजे. कोकणात पर्यटन व्यवसाय वाढवून आर्थिक समृद्धी कशी आणि कशाने येईल, यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -