Gajanan Maharaj : करीत असावा परमेश्वरा। आठव वेड्या विसरू नको॥

Share
  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

शके अठराशे सोळाचे एक कथानक. श्री महाराज बाळापूर येथे असताना घडलेला हा प्रसंग आहे. बाळापुरात सुकलाल बन्सीलालाची बैठक होती. त्या बैठकीसमोरच महाराज आनंदात बसले होते. महाराज कधीही वस्त्र परिधान करीत नसत. हे सर्व भक्त मंडळींना विदितच आहे. महाराज दिगंबर अवस्थेत बसून होते. तो बाजारपेठेचा हमरस्ता होता. येणारे-जाणारे भाविक भक्त महाराजांना नमस्कार करून जात होते. त्या पंथाने एक हवालदार जात होता. त्याचे नाव नारायण आसराजी असे होते. समर्थ अशा अवस्थेत बसलेले पाहून त्या हवालदाराचे मस्तक फिरले. तो महाराजांना उद्देशून म्हणाला, “हा इथे रस्त्यात नंगा धुत बसला आहे. हा साधू नाही तर भोंदू आहे.” असे बोलून तो हवालदार महाराजांच्या जवळ गेला, अद्वातद्वा बोलू लागला, “तुला लाज कशी वाटत नाही. नंगा बसतोस रस्त्यावर. हे घे त्याचे प्रायश्चित्त देतो तुला मी.” असे बोलून तो हातातील छडीने स्वामींना मारू लागला. महाराजांच्या पाठीवर, पोटावर वळ उमटू लागले तरी या हवालदाराचे मारणे काही थांबत नव्हते.

हा प्रकार पाहून तेथील एक दुकानदार, हुंडीवाला असे ज्याचे नाव होते, तो आपल्या दुकानातून धावत तिथे आला व त्या हवालदारास म्हणाला, “हवालदार काही विचार कर. सत्पुरुषाच्या अंगावर हात टाकणे ही काही बरी गोष्ट नव्हे. कारण की श्रीहरी हाच संतांचा कैवारी आहे. किती मारतो आहेस, की तुझ्या मारण्याने यांच्या अंगावर वळ उमटलेले तुला दिसत नाहीत का? या तुझ्या कृत्याने तुझा अंत जवळ आला असावा असे वाटते. आजारी मनुष्य मुद्दाम मरण्याकरिता पथ्य मोडतो. तसेच तू आज केले आहेस, हे काही बरे झाले नाही. अजून तरी डोळे उघड. झालेल्या चुकीची क्षमा माग.”

हे बोलणे ऐकून हवालदार म्हणाला, “कावळ्याच्या शापाने ढोरे मरत नसतात. मला माफी मागण्याचे काहीच कारण नाही. हा नंगा धुत बाजारपेठ पाहून चावट गोष्टी करत इथे बसला आहे. अशा ढोंगी मनुष्याला मारणे जर ईश्वर गुन्हा मानत असेल, तर न्यायाला जागाच उरली नाही.

या घटनेनंतर हुंडीवाला जे बोलले होते, तेच खरे झाले. हवालदार पंचतत्त्वात विलीन झाले. एवढेच नव्हे तर त्यांचे सर्व आप्त भास्मिभूत झाले. हे सर्व अविचाराने एका साधूस मारल्यामुळे झाले.

इथे दासगणू महाराज बोध सांगतात,
म्हणून अवघ्या लोकांनी। साधुसमोर जपुनी।
वागावे प्रत्येकानी। खरे कळेपर्यंत॥२१६॥

अनेकदा त्या त्या साधूची साधना, तपश्चर्या माहीत नसताना त्यांची गंमत करणे, त्यांची परीक्षा घेणे, अपमान करणे असे वर्तन आपले हातून कधीही घडू नये. हा बोध फारच महत्त्वाचा आहे. एखादा साधू क्रोधायमान झाल्यास परिणाम फार गंभीर होऊ शकतात. या बाबतीत अत्यंत जागरूक आणि सावध असावे. पुढे नगर जिल्ह्यातील संगमनेर या गावातील हरी जाखड्याचा वृत्तान्त आला आहे. याच संगमनेर येथे अनंत फंदी नावाचे विद्वान कविवर्य होऊन गेले. हा हरी जाखडी यजुर्वेदी मध्यंदीन ब्राह्मण होता. गावोगावी भिक्षुकी करून हा आपला चरितार्थ चालवित असे. हा एकदा फिरत फिरत शेगाव येथे आला. दर्शन घेण्याकरिता मठात आला व महाराजांच्या पायाजवळ येऊन बसला. अनेक भाविक भक्त दर्शन करीत होते, कोणी ब्राह्मण भोजन घालीत होते, कोणी खडीसाखर वाटत होते, तर कोणी केलेला नवस फेडीत होते.

बसल्या बसल्या हरी जाखड्याच्या चित्तात विचार आला की, “श्री महाराज एवढे ज्ञानराशी, कृपाराशी आहेत आणि यांच्या पायाशी येऊन मला मात्र विन्मुख जाणे भाग आहे असे दिसते. कारण माझे दैव खडतर आहे. आज अन्न मिळाले, पण उद्याचे कोणी पाहिले? असे करत करत माझे आजवरचे दिवस संपलेत. माझ्याजवळ धन नाही, शेतमळा, घरदार संपत्ती तर नाहीच नाही, पण विद्वत्ता देखील नाही. असे असताना मला कन्या कोण देईल बरे?” असा विचार करून महाराजांना मनोमन प्रार्थना करू लागला, “हे स्वामी गजानना सच्चिदानंद दयाघना, मला देखील संसार करावासे वाटते. माझा देखील संसार असावा, मुलेबाळे असावी, माझी देखील पत्नी ही आज्ञाधारक तसेच कुलीन असावी, अशी माझी इच्छा आहे आणि आपण ती पूर्ण करावी.” अशी इच्छा हरी जाखड्याच्या मनात बलवत्तर झाली आणि त्याची इच्छा जाणून महाराज त्याच्या अंगावर थुंकले. म्हणाले, “या हरी जाखड्याने मजकडे बावंचा मागितला म्हणून या मूर्खाच्या अंगावर थुंकणे आले. लोक संसारातून सुटण्याकरिता मला भजतात आणि याने येथे येऊन संसारसुख मागितले :
या हरी जाखड्याने। बावंच्या मागला मजकारणे।
म्हणून आले थुंकणे। या मूर्खाच्या अंगावर।
संसरापासून सुटावया। लोक भजती माझ्या पाया।
याने येथे येऊनिया। संसारसुख मागितले।
पाहा जगाची रीत कैसी।
अवघेच इच्छिती संसारासी।
सच्चिदानंद श्रीहरिसी।
पाहण्या न कोणी तयार॥२३१॥

असे महाराज स्वतःशी बोलले आणि हरी जाखड्याला तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होतील, असा आशीर्वाद दिला. पण ईश्वराला विसरू नकोस, हे सांगितले. पुढे श्री गजानन महाराजांच्या कृपाप्रसादाने हा हरी जाखड्या संगमनेर येथे सुखासमाधानाने राहिला. भक्तांच्या मनामधील इच्छा अंतर्ज्ञानाने जाणून त्या पूर्ण करणे हे केवळ भक्तवत्सल संतच करू जाणेत.

क्रमशः

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

2 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

3 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

4 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

4 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

5 hours ago