Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीDnyaneshwari : ‘ज्ञान’ज्योत!

Dnyaneshwari : ‘ज्ञान’ज्योत!

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

ज्ञानदेव सुंदर दाखल्यांनी या भगवद्गीतेतील वचनांचा अर्थ समजावतात! ते वाचून आपण आतून ‘जागे’ होतो, जीवनाविषयी जागरूक होतो. त्यातून शरीराची ओढ, बाह्य गोष्टींची हाव कमी होत जाते. मनामनांत ‘ज्ञान’ज्योत उजळत राहते..

आपलं शरीर आहे नाशवंत! याउलट परमात्मा आहे अविनाशी, अविकारी! भगवद्गीतेतील हे महावचन आपण ऐकलं आहे. या वचनाचा अर्थ उलगडून दाखवला आहे ‘ज्ञानेश्वरी’त. सुंदर दाखल्यांनी या दोन्हींतला संबंध समजावतात ज्ञानदेव! ते वाचून आपण आतून ‘जागे’ होतो, जीवनाविषयी जागरूक होतो. तेराव्या अध्यायात आलेले हे अप्रतिम दाखले आपण पाहूया.

यातील एक दाखला सूर्य आणि त्याच्या प्रतिबिंबाचा. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं. पण त्यापूर्वी सूर्य होता व नंतरही असणार आहे. सूर्याप्रमाणे परमात्मा आहे. जो शरीर निर्माण होण्यापूर्वी असतो आणि शरीर गेल्यावरही राहतो. पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे शरीर आहे भासमान, क्षणिक! याउलट आत्मा हा सूर्यासारखा स्वयंभू, तेजस्वी, अविनाशी! पुढे ज्ञानदेव म्हणतात, ‘ज्याप्रमाणे आरशात आपले स्वरूप आहे असा भास होतो, त्याप्रमाणे आत्मा देहात वास करतो हे म्हणणे मिथ्या (खोटे) होय. ओवी क्र. १०९७.

या साध्याशा दाखल्यातून देहाची भासमयता किती चांगल्या प्रकारे जाणवून देतात ज्ञानदेव! नंतर ते म्हणतात, ‘अग्नी आणि कापूस ही दोन्ही दोऱ्यांत कशी ओवता येतील? आणि आकाश व पाषाण यांची जोड कशी करता येईल?

ती ओवी अशी –
‘आगी आणि कापुसा।
दोरा सुवावा कैसा।
केउता खांदा आकाशा। पाषाणेंसी॥’ ओवी क्र. १०९९.

यातून काय सुचवतात ज्ञानदेव? अग्नीप्रमाणे व्यापक, तेजस्वी आहे आत्मा, तर कापसाप्रमाणे नाशवंत आहे शरीर. यानंतरचा दाखला आहे आकाश आणि पाषाण यांचा! आकाश हे तत्त्व संपूर्ण जगाला व्यापून टाकणारं, अनंत, कशानेही लिप्त न होणारं. त्याप्रमाणे आहे आत्मा. याउलट पाषाणाप्रमाणे जड, नाशवंत आहे शरीर. पुढे ते श्रीकृष्णमुखाने अर्जुनाशी बोलतात,
‘उजेड आणि अंधार, मेलेला आणि जिवंत मनुष्य यांचा ज्याप्रमाणे एकमेकांशी संबंध नाही, त्याचप्रमाणे आत्मा आणि शरीर यांचा संबंध नाही. ओवी क्र. ११००.

उजेड म्हणजे प्रकाश, या उजेडासारखा प्रकाशित आहे आत्मा, तर अंधाराप्रमाणे आहे देह.’
किती दाखले मांडून ज्ञानदेव सहजपणे सांगतात एक तत्त्व! कोणतं तत्त्व? तर शरीर क्षणिक आणि आत्मा अमर आहे. या दोहोंत कोणताही संबंध नाही. हे सांगण्यासाठी ज्ञानदेव एवढी दृष्टान्तमालिका उभी करतात. का? कारण चांगला गुरू हा विद्यार्थ्याला एक उदाहरण देऊन थांबत नाही. शिष्याच्या बुद्धीला पटावं, मनाला उमगावं यासाठी गुरू असंख्य उदाहरणं देतो. ज्ञानदेव इथे तेच करतात. पुन्हा हे दाखले किती साधे, सोपे, व्यवहारातील किंवा निसर्गातील आहेत. जसे की सूर्य, वारा, पाणी, आरसा इ. यात चित्रमयता आहे. विशेष म्हणजे त्यात नवीनतासुद्धा आहे. जसं की, ‘वारा आणि वाळू यांची कधी गाठ मारता येईल काय? हा दृष्टान्त पाहावा. त्याप्रमाणे आत्मा आणि शरीर यांचा संबंध आहे, हे म्हणणं व्यर्थ आहे हे यातून सांगितलं आहे.

या दाखल्यांचा अजून एक विशेष म्हणजे यात विरोधी गोष्टींची छान उदाहरणं दिली आहेत, जसे की उजेड व अंधार, अग्नी आणि कापूस हे दृष्टान्त. यातून आत्मा आणि शरीर या गोष्टी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत हे उमगतं. अशा परस्परविरोधी दाखल्यातून काय साधतं? एक तर जी शिकवण द्यायची आहे, ती मनामध्ये ठसते, अधिक स्पष्ट होते ज्याप्रमाणे चित्रकार हिरव्या रंगाच्या बाजूला लाल रंग देतो, तेव्हा ते चित्र अधिक आकर्षक वाटतं, मनात भरतं. त्याप्रमाणे हे विरोधी दाखले काम करतात.

या दृष्टान्तामुळे गीतेच्या मौलिक तत्त्वज्ञानाला सुंदरतेची, सुगमतेची जोड मिळते. हेच तर ज्ञानदेवांचे अजरामर कार्य!
तेणें कारणें मी बोलेन।
बोलीं अरूपाचे रूप दावीन।
अतींद्रिय परि भोगवीन। इंद्रियांकरवीं॥

आत्मा, आत्म्याचं स्वरूप या खरं तर निराकार, अमूर्त गोष्टी! ज्ञानदेवांच्या शैलीने त्या आपल्याला अशा सुंदर स्वरूपात समजतात. त्यातून शरीराची ओढ, बाह्य गोष्टींची हाव कमी होत जाते. मनामनांत ‘ज्ञान’ज्योत उजळत राहाते.

म्हणून ‘ज्ञानेश्वरी’ घराघरांत वाचली जाते. आज सातशे पंचवीस वर्षं झाली तरीही…

manisharaorane196@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -