इंदिरानगर पोलिसांची कत्तलखान्यावर कारवाई; ११ गोवंशांना जीवदान
नाशिक : नाशिक येथील वडाळा गाव परिसरातील मुमताज नगर येथे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर ठिकाणी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकत ११ गोवंशाची सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू कुरेशी व इमरान शहा या दोन संशयितांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळा गाव परिसरातील मुमताज नगर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध कत्तलखाना सुरू असल्याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र सदर ठिकाणी पोलीस गेल्यास कुठलाही अवैध प्रकार आढळत नसल्याने पोलिसांना देखील प्रश्न पडत होता की सदर ठिकाणी कत्तलखाना असल्याबाबत माहिती तर मिळते परंतु प्रत्यक्षात काही आढळत नाही. यामागचे रहस्य अधिक गडद होत असतांना या कारवाईदरम्यान प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. ज्यामुळे ॲक्शन प्लॅन यशस्वी झाला व दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत ११ गोवंशाची सुटका करण्यात इंदिरानगर पोलिसांना यश आले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार, पोलीस हवालदार पारणकर, शेख, खान, पोलीस नाईक परदेशी, जाधव, पाठक, नागरे, आदींनी ही कारवाई केली आहे.
कारभारी बदलले अन कारवाई झाली..!
नाशिक शहरात गोवंशाची सर्रास बेकायदेशीर कत्तल होत असल्याची खात्रीशीर माहिती एसीपी डीसीपी यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊनही कारवाई होत नव्हती. इतकेच नाही तर तत्कालीन पोलिस आयुक्तांना देखील याबाबत अवगत केल्यानंतरही मिळालेल्या माहितीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत होते तथापी संदीप कर्णिक यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गोवंश संरक्षण करण्याच्या उद्देश्याने गेली बरीच वर्ष दुर्लक्षित ठेवले गेलेल्या वडाळा गावातील मुमताज नगर मधील या कत्तलखान्यावर कारवाई करून ११ गोवंशांना जीवदान मिळाल्याने गो वंश प्रेमी समाधान व्यक्त करीत आहेत. भविष्यातही ही गती कायम राखली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.