
मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही टी२० मालिका ४-१ अशी आपल्या नावे केली. या विजयासह भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाचा बदला घेतला. भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर आयसीसीने टी-२० रँकिंग जाहीर(icc t-20 ranking) केली आहे. यात भारतीय खेळाडूंचा जलवा पाहायला मिळत आहे.
भारताचा लेग स्पिनर रवी बिश्नोई आता जगातील नंबर १ टी-२० गोलंदाज बनला आहे. रवी बिश्नोईने रशीद खानला मागे टाकले. बिश्नोई पहिल्या स्थानावर पोहोचल्याने रशीद खान दुसऱ्या, आदिल रशीद संयुक्त तिसरा आणि वानिंदु हसरंगा संयुक्त तिसरा आणि महेश तीक्ष्णा पाचव्या स्थानावर आला आहे. दुसरीकडे भारताचा स्पिनर अक्षर पटेलनेही ११ स्थानांनी झेप घेत १६व्या स्थानावर पोहोचला आहे.
सूर्या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वलस्थानी
दुसरीकडे सूर्यकुमार यादव टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. यासोबतच ऋतुराज गायकवाडही टी-२०च्या फलंदाजीत रँकिंगमध्ये टॉप १०मध्ये सामील आहेत. दरम्यान, ऋतुराज एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर आला आहे. तर युवा फलंदाज यशस्वी जायसवाल १६ स्थानांनी झेप घेत १९व्या स्थानावर आला आहे.दुसरीकडे हार्दिक पांड्या टी-२० ऑलराऊंडर्समध्ये रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर कायम आहे. हार्दिक क्रिकेट विश्वचषक २०२३मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर क्रिकेटबाहेर आहे.
ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल केली. ऋतुराज त्या मालिकेत सर्वाधिक धावा कऱणारा फलंदाज ठरला होता. त्याने ५ सामन्यात २२३ धावा केल्या. गायकवाडने टी-२० मालिकेत एक शतकही ठोकेले होते. तर विकेट घेण्याच्या बाबतीत रवी बिश्नोई टॉपवर होता. बिश्नोईने ५ सामन्यात ८.२०च्या इकॉनॉमी रेटने एकूण ९ विकेट घेतले.
टी-२० विश्वचषकात मिळणार संधी
२३ वर्षीय रवी बिश्नोईने भारतासाठी आतापर्यंत १ वनडे आणि २१ टी-२० सामने खेळले आहेत. वनडे आंतरराष्ट्रीयमध्ये रवीने १ आणि टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३४ विकेट घेतल्या आहेत. आगामी टी-२० विश्वचषकाचे सामने वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार आहे. येथील पिच स्पिनर्ससाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. बिश्नोईने आपली कामगिरी अशीच दमदार ठेवली तर त्याला आगामी विश्वचषकात संधी मिळू शकते.