Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखनिकालानंतर इंडिया आघाडीत धुसफुस

निकालानंतर इंडिया आघाडीत धुसफुस

पाच राज्यांचा विधानसभेचा निकाल लागला आणि मस्तीत वावरणाऱ्या काँग्रेसचे पाय जमिनीवर आले. छत्तीसगड आणि राजस्थानमधील काँग्रेसच्या हातातील सत्ता खेचून भाजपाने मध्य प्रदेश राज्यातील सत्ता कायम राखल्याने हिंदी पट्ट्यात काँग्रेसचे नामोनिशाण मिटल्यातच जमा आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या काँग्रेसला आता पुन्हा इंडिया आघाडीची आठवण झाली आणि तीन राज्यांत भाजपा जिंकल्यानंतर आता आपले कसे होणार? या चिंतेत असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी

६ डिसेंबरला दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली होती; परंतु बैठकीआधीच इंडिया आघाडीत रुसवे-फुगवे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही बैठक आता तातडीने रद्द करण्याची वेळ काँग्रेसवर आली. केंद्रातील मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी विविध राज्यांतील भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला. बिहार, बेंगलोर, मुंबई येथे ‘हम सब एक है’ असा आव आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला. खरंतर इंडियामध्ये सामील झालेल्या एकूण पक्षातील प्रमुख नेत्यांकडे नजर मारली, तर बहुतांश नेत्यांभोवती ईडीच्या कारवाईचा फास आवळला गेल्याने, सर्व समदुखी एकत्र आल्याचे चित्र उभे राहिले होते. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व घमेंडिया एकत्र आले आहेत. यांना देशाच्या प्रगतीबद्दल काही पडलेले नाही.

पंतप्रधान मोदी जे बोलतात तेच जनतेला पटते, हे पुन्हा एकदा तीन राज्यांच्या विजयानंतर स्पष्ट झाले आहे. आता राहिला प्रश्न मिझोराम आणि तेलंगणाचा. पूर्वकडील मिझोराममध्ये स्थानिक पातळीवरील आघाडींना तेथील जनता जास्त महत्त्व देत असल्याने भाजपा आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना त्या ठिकाणी म्हणावेसे तसे यश मिळवता आले नाही. तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यात भाजपाच्या मताचा टक्का वाढला आहे, ही जमेची बाजू आहे.

या पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसला इंडिया आघाडीबद्दल सोयरसुतक नव्हते. इंडिया आघाडीबद्दल काँग्रेसला एवढाच कळवळा होता, तर मध्य प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्याकडून समाजवादी पार्टीकडून काही जागा सोडा असा आग्रह धरला होता. तेव्हा कोण अखिलेश असे काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले कमलनाथ म्हणाले होते. इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा इतका अपमान केल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून कमलनाथाच्या घमेंडी वृत्तीकडून दुर्लक्ष केले गेले होते. हीच बाब जाट समाजातील प्राबल्य असलेल्या मतदारसंघावर जयंत चौधरी यांनी काही जागा सोडाव्यात म्हणून काँग्रेसला आग्रह केला होता; परंतु त्यांनाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या.

इंडिया आघाडीतील आणखी एक पक्ष आप यांचे दोन मुख्यमंत्री तीन राज्यांत प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत इंडिया आघाडीतील पक्ष ऐकमेंकाविरुद्ध गरळ ओकत होते. मात्र निकाल भाजपाच्या बाजूने गेल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाला इंडिया म्हणून एकत्र यायला हवे असे पुन्हा वाटू लागले आहे. तसे मध्य प्रदेश, राजस्थानमधील मतांची टक्केवारी पाहता समाजवादी आणि अन्य इंडियातील घटक पक्षांना जागा सोडल्या असत्या तरी फरक पडला नसता. मात्र, यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीत काय घडणार आहे याचा क्लायमॅक्स आता समोर येत आहे.

कर्नाटक आणि हिमाचलमध्ये मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसच्या डोक्यात हवा होती. पाचपैकी चार राज्य जिंकू असा फाजील आत्मविश्वास त्यांच्या नेत्यांनी खासगीत बोलून दाखवला होता. त्यातून आता विधानसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसने इंडिया आघाडीची बैठक घेण्यास टाळाटाळ केली होती. निकालानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जाग आली आणि त्यांनी बैठक बोलावली होती. मात्र, दिल्लीतील घमेंडियाची ही बैठकच रद्द करण्याची नामुष्कीही काँग्रेसवर ओढवली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या बैठकीपासून दूर राहणे पसंत केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत बैठकीला येण्यास नकार दिला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन हेही बैठकीला हजर राहणार नव्हते. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीबाबत दिलेल्या उत्तरानंतर इंडिया आघाडीत समन्वय नसल्याचे समोर आले आहे. ममतांच्या म्हणण्यानुसार आपल्याला बैठकीबद्दल कल्पनाच नव्हती. या बैठकीबाबत मला कोणीही सांगितले नाही किंवा मला फोन करूनही या संदर्भात माहिती देण्यात आली नाही. अचानक बैठकीसाठी बोलावले असते तरी माझे कार्यक्रम कसे बदलता येतील?, असा प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीपासून सुरक्षित अंतर ठेवण्यास सुरुवात केली आहे, असे वाटते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत करिष्मा दाखवणार याचे भास आतापासून इंडिया आघाडीतील घटक पक्षांना वाटू लागल्याने, काँग्रेसच्या नादाला लागून राज्यात अस्तित्व दाखविणाऱ्या पार्टीचे नुकसान करून घेण्यात यापुढे कोण तयार होतील असे वाटत नाही. त्यामुळे, रुसवे-फुगव्यांसह नाना कारणे देऊन इंडिया आघाडीची स्वत:ला वेगळे कसे करता येईल? याचा द्राविडी प्राणायाम आता इंडिया आघाडीत होत असताना दिसत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -