Thursday, October 10, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यभारताचा खलनायक

भारताचा खलनायक

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचे निधन झाले. त्यांची ओळख एक अत्यंत अभ्यासपूर्ण स्कॉलर नेता, परराष्ट्र खात्याचा जाणकार आणि नाझी जर्मनीतून आलेला निर्वासित अशी असली तरीही भारतासाठी मात्र त्याची ओळख भारत-पाकिस्तान युद्धात खलनायकी चाली रचणारा आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाणारा नेता अशीच आहे. गोष्ट भारत-पाकिस्तान युद्धाची. हे युद्ध होऊ नये म्हणून तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी जंगजंग पछाडले होते. पण पाकिस्तानी अध्य़क्ष याह्या खान यांना चुचकारूनही ते युद्धावर ठाम होते. त्यासाठी अमेरिका आणि रशिया यांना यात मध्ये पडावे लागले. इंदिरा गांधी निक्सन याना भेटण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांची संभावना अत्यंत गलिच्छ शब्दांत करणारे हेच निक्सन महाशय होते. भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यावर या किसिंजर महाशयांनी अध्यक्ष निक्सन यांना सल्ला दिला की, चीनने सीमेवर सैन्य तैनात करण्यासाठी दबाव आणावा. त्यामुळे भारताची एक बाजू कमजोर होऊन भारत युद्ध थांबवेल. किसिंजर हे निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. त्यानंतर ते जिराल्ड फोर्ड यांच्या काळातही याच पदावर होते. पण त्यांची भूमिका भारत-पाक युद्धात आणि नंतर काही काळ चर्चेत राहिली. वादग्रस्त अशीच त्यांची भूमिका होती आणि ते संपूर्ण भारतविरोधी होते.

निक्सन आणि किसिंजर हे दोघेही भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत होते. आधुनिक अमेरिकन इतिहासात किसिंजर हे सर्वात महत्त्वाची व्यक्ती होते. त्यांनीच व्हिएतनाम युद्धाला अमेरिकेला उभे केले. त्यातून त्यांना बदनामीचा सामना करावा लागला. पण त्यांचे खरे काळे कारस्थान भारत पाकिस्तान युद्धात समोर आले. भारताच्या कल्याणाची भाषा करणारा हा माणूस आतून किती खलनायकी आहे, हे त्यावेळी जगाने पाहिले. व्हिएतनाम युद्ध थांबवण्यात प्रमुख भूमिका निभावणारा हा खलनायक भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताच्या संपूर्ण विरोधी होता. त्याला हे युद्ध होणे नको होते. त्यासाठी अमेरिकेने वाट्टेल त्या मार्गाने याह्या खानचे लांगूलचालन करावे या मताचा तो होता. किसिंजर आणि निक्सन या दोघांनीही त्यावेळेला भारताला धमकावण्याचा एकत्रित प्रयत्न केला होता. जेव्हा इंदिरा गांधी अमेरिकेला भेटण्यास गेल्या, तेव्हा त्यांना बराच काळ ताटकळत ठेवण्यात आले. पण त्यापेक्षा हे महत्त्वाचे आहे की, किसिंजर यांनी निक्सन यांना सल्ला दिला की, चिनी सैन्य सीमेवर तैनात करण्यासाठी अमेरिकेने दबाव आणावा. हा काळ होता शीतयुद्धाचा. अमेरिका आणि रशिया सारखेच ताकदवान देश होते. पण किसिंजर यांचा हा कुटिल डाव चीननेच उधळला. चीनने सीमेवर सैन्य तैनात करण्यास साफ नकार दिला. परिणामी भारताने पाकिस्तानचे तुकडेच पाडले आणि बांगलादेश नावाचा देश अस्तित्वात आला.

किसिंजर यांनी चीनच्या नकारानंतरही एक डाव रचला होता. त्यांनी चिनी अधिकारी हुआंग हुआ यांच्याशी एक गुप्त बैठक ठरवली होती. किसिंजर यांना भारतद्वेषाने इतके पछाडले होते की, त्यांनी रशियाने जर चिनी सीमेवर सैन्य तैनात केले, तर चिनी उपग्रहांवरून आलेली माहिती ते लगेच रशियाला देतील. तोही डाव उधळला गेल्यानंतर किसिंजर या खलनायकाने नवा डाव खेळला. त्यांनी निक्सन यांना बोलून एक भयंकर सल्ला दिला. त्यासाठी त्यांना इतिहास कधीही क्षमा करणार नाही. त्यांनी निक्सन यांना सांगितले की, आपल्या युद्धनौका बंगालच्या खाडीत आणून ठेवाव्यात. हा सारा आटापिटा पाकिस्तानला भारताने हरवू नये म्हणून चालला होता. निक्सन तर संतप्तच होते. त्यांची भाषा भारतीय नेत्यांबद्दल अत्यंत गलिच्छ होती.

१५ डिसेंबर १९७१ हा तो काळा दिवस होता. त्यादिवशी निक्सन यांच्या आदेशावरून अमेरिकेचे सातवे आरमार बंगालच्या खाडीत दाखल झाले. अमेरिकन आरमार निश्चितच भारताच्या दिशने, पण अत्यंत हळू वेगाने सरकत होते. ते पाहिल्यावर रशियाने आपल्या सैन्याला खाडीत जमा होण्याचा आदेश दिला. त्यानंतर अमेरिकेन आरमाराने माघार घेतली. हा धोका टळला, पण अमेरिकेची मनीषा चांगली दिसत नव्हती. पण यासाठी दुसरेही एक कारण दिले जाते. भारताचे राजनीतीज्ञ अरूंधती घोष यांनी सांगितले की, पाकिस्तानचे जनरल नियाझी यानी भारताला आम्हाला युद्धबंदी हवी आहे, असा संदेश पाठवला. त्यानंतर अमेरिकन आरमार परतले. जग आज सर्वात विद्वान आणि परराष्ट्र धोरणाचा गाढा अभ्यासक म्हणून ओळखते. किसिंजर यांच्या नावाने अनेक फेलोशिप दिल्या जातात. पण त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धाचा खरा खलनायक इतकीच ओळख भारतासाठी आहे. नाझी जर्मनीतून आलेला हा विद्वान माणूस राष्ट्राध्यक्षाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पोहोचला. पण त्याने भारतविरोधी भूमिका का घेतली आणि पाकिस्तानचे लांगूलचालन का केले? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

निक्सन यांना जगातील युद्ध थांबवण्यासाठी शांतता दूत म्हणून समोर यावे असे वाटत होते. त्यातून त्यांनी भारतविरोधात जाऊन भारत-पाकिस्तान युद्धात खलनायकाची भूमिका बजावली. पण खरा खलनायक हेन्री किसिंजर हेच होते. असो. आता ते या जगात नाहीत. पण त्यांच्या दुष्कृत्यांची साक्ष देणारा इतिहास, तर पानापानांवर आहे. किसिंजर यांच्या निधनाने त्या काळातील एक दुवा निखळला आहे. किसिजर यांच्या आरमार पाठवण्याच्या भूमिकेनंतर आशियाई सत्ता समतोल बदलून गेला. त्यानंतर आज इतके पाणी पुलाखालून वाहून गेले. मोदी यांच्या सत्तातरांनंतर उपखंडातील स्थिती कमालीची बदलली. भारत महासत्ता म्हणून उदयास येत आहे आणि किसिंजर यांची अपेक्षा कधीही केली नसेल. आज पाकिस्तानला चुचकारण्याची अमेरिकेला गरज राहिली नाही. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला सर्व प्रकारची मदत बंद केली. पाकिस्तान आज कंगाल झाला आहे. आणि त्यात आता अमेरिका पाकिस्तानकडे ढुंकूनही पाहत नाही.

किसिंजर यांच्या पाकिस्तानवादी धोरणाचे कमालीचे हे अपयश आहे. किसिंजर आणि निक्सन या जोडीने जितका म्हणून भारताचा अपमान केला, त्या प्रत्येक अपमानाचा बदला त्यांना चुकवावा लागला. हा नियतीने उगवलेला सूड होता. म्हणून किसिंजर शंभराव्या वर्षी गेले असले तरीही त्यांना आपण भारताच्या बाबतीत का अपयशी ठरलो, याची खंत वाटत असली पाहिजे. भारताचा उदय झालेला किसिंजर यांना पहावे लागले. जे भारत बांगलादेश युद्ध टाळण्यासाठी निक्सन आणि किसिंजर जोडीने जंगजंग पछाडले, ते तर त्यांना पाहावेच लागले. पण पाकिस्तानचे तुकडेही झालेले पाहावे लागले. अमेरिकेच्या जगभरातील वर्चस्वाला इथूनच धक्का बसायला सुरुवात झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात नंतर तीन युद्धे झाली आणि त्या त्या प्रत्येक वेळेस पाकिस्तानचा पराभव झाला. अमेरिकेसारखा बलाढ्य देश पाठीशी असूनही पाकिस्तानला पराभव सहन करावा लागला. भारतीय लष्कराचे सामर्थ्य अमेरिकेला आणि त्यांच्या तमाम नेत्यांना पाहावे लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -