लवकरच राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारणार
पुणे : काळानुरुप बदल स्विकारावे लागत असले तरी काही बदल स्विकारणं कठीण होऊन बसतं. आपल्या राज्यात अशा अनेक ऐतिहासिक वास्तू (Historical buildings) आहेत, ज्यांमध्ये आता काळानुरुप आपल्याला बदल करावे लागणार आहेत. त्यातील एक म्हणजे पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा (Pune Bhidewada). महात्मा फुले (Mahatma Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी १ जानेवारी १८४८ रोजी ज्या बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा (First Scool for girls in India) सुरू केली, त्या वाड्यावर काल रात्री बुल्डोझर चालवण्यात आला.
पुण्यातील भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक (National Monument) व्हावे, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शवली. येथील स्थानिक दुकानदारांचा मात्र त्याला विरोध होता. जवळपास २०१० पासून वाडा पाडण्यासाठीच्या प्रक्रिया सुरु होत्या. पुणे महापालिकेकडून वाड्याच्या आसपास असणार्या दुकानांना वेळोवेळी नोटीस देण्यात आली होती. पण हे प्रकरण न्यायालयात गेलं.
गेल्याच महिन्यात सर्व भाडेकरुंची याचिका सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) फेटाळून लावली आणि महापालिकेच्या बाजूने निर्णय देत भिडेवाडा पालिकेने ताब्यात घेण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार पुणे महापालिकेने भिडेवाडा ताब्यात घेत अखेर काल रातोरात वाडा पाडण्याची मोहिम फत्ते केली. रात्री सर्व दुकाने बंद झाल्यानंतर या दुकांनांची कुलुपे तोडून आतील सामान बाहेर काढून हा वाडा पाडण्याची कारवाई करण्यात आली.
भिडेवाडा हा शहराच्या मध्यवस्तीत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून महापालिकेने रात्री ११ वाजेनंतर वाडा पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात वाडा पाडल्याने अखेर भिडेवाडा इतिहासजमा झाला आहे. त्या ठिकाणी आता लवकरच राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्मारक कसे असणार?
राष्ट्रीय स्मारकामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी असणार आहेत. पहिली म्हणजे पुणे महापालिकेतर्फे या ठिकाणी शाळा चालवण्यात येणार आहे आणि दुसरी म्हणजे ज्याप्रमाणे १ जानेवारी १९४८ या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याप्रमाणे त्या दिवशीच्या घटना चित्ररुपात किंवा पुतळ्यांच्या स्वरुपात या ठिकाणी लावण्यात येणार आहेत.
पुणे महापालिकेची लागली नोटीस
या जागेवर आता पुणे महापालिकेने नोटीस लावली आहे. सदर मिळकती पुणे महानगरपालिकेच्या मालकीचे असून मिळकतीवर कोणतेही अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई जाईल अशी नोटीस महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून या ठिकाणी लावण्यात आली आहे.