पुणे : पुण्यातील (Pune) वाघोली येथे आज सकाळच्या सुमारास एका स्कूलबसचा भीषण अपघात (Wagholi School Bus Accident) झाला. रायझिंग स्टार या शाळेच्या बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळली आणि हा अपघात घडला. यामुळे स्कूलबसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाघोलीत रायझिंग स्टार नावाची शाळा आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी बसमधून निघाले होते. त्याचवेळी सकाळी आठच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला. आजूबाजूच्या लोकांनी ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेत मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. या बसच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज(CCTV Footage) समोर आलं आहे. यामध्ये ही बस रस्ता सोडून थेट बाजूला असल्याच्या झाडावर आदळली असल्याचं दिसतंय. सीसीटीव्ही फुटेजवरून या अपघातासाठी बसचा ड्रायव्हर जबाबदार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे आरटीओने या बस ड्रायव्हरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे या स्कूलबसवरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.