Wednesday, April 16, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखसावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, कौशल्य विकास विभाग

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, कौशल्य विकास विभाग

सेवाव्रती: शिबानी जोशी

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या कामाचे संभाजीनगर जिल्ह्यात तसेच आसपासच्या भागात समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून अक्षरशः जाळे निर्माण झाले आहे. महिलेचे सबलीकरण म्हणजेच तिच्या संपूर्ण कुटुंबाचं सक्षमीकरण. ते करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन या कामाची व्याप्ती १९८९ पासून संस्थेने वेगवेगळ्या क्षेत्रांत वाढवली आणि महिलेसह तिच्या संपूर्ण कुटुंबाला सक्षम, आत्मनिर्भर बनवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुरुवात अर्थातच आरोग्य क्षेत्रापासून झाली. आरोग्य क्षेत्रात काम करता करताच समाजातील दुर्बल घटकांच्या समस्या प्रत्यक्ष दिसून आल्या आणि त्या समस्यांची उकल करण्याकरिता वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले. या कामाला संस्थेचे संचालक मंडळ त्यांचे कार्यकर्ते तसेच समाजातील सढळ हाताने मदत करणाऱ्या लोकांचं सहकार्य लाभलं आणि त्यातून मंडळाच्या कामाची नुसती उंची नाही, तर रुंदीदेखील वाढत गेली. केवळ उंची न वाढता कामे फोफावत गेली. गेल्या दोन भागांत आपण आरोग्य आणि शाश्वत विकास विभागाचं काम पाहिलं. या भागात कौशल्य विकास विभागाचं काम पाहणार आहोत.

२००८ पर्यंत आरोग्य, शिक्षण आणि महिला सबलीकरणाचे काम चांगलंच स्थिरावलं होतं. महिला बचत गटांचे जाळं निर्माण झालं होतं. त्यातूनच कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की, महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. सुरुवातीला एल अॅण्ड टी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या कंपनीने आर्थिक सहकार्याचा हात पुढे केल्यामुळे बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या महिला तसेच पुरुषांना प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलं. हे काम संभाजीनगर शहरातल्या सेवा वस्त्यांमध्ये जिथे आरोग्य केंद्राची जागा उपलब्ध होती, त्या ठिकाणी सुरू झालं. त्यापूर्वी २००० साली संगणक प्रशिक्षण सुरू झालं होतं. सेवावस्तीतील मुलांना संगणकाचं ज्ञान मिळणं दुरापास्त होतं. त्यांना संगणक प्रशिक्षण सहज उपलब्ध व्हावं यासाठी अद्ययावत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू झाले, केंद्रात कमीत कमी शुल्कात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व अभ्यासक्रम आणि एमएससीआयटीचे (MKCL)चे अथोराईज सेंटर परीक्षेसाठी सुरू झाले ते आजतागायत सुरू आहे. एमएससीआयटीसह हार्डवेअर नेटवर्किंग, ॲडव्हान्स टॅलीमधील प्रशिक्षण आणि आता तर वेब डिझायनिंग, डिजीटल मार्केटिंगसारखं प्रगत प्रशिक्षण देणंही सुरू झालं आहे. त्यानंतर लगेचच महिलांना बालवाडी प्रशिक्षण उपक्रम सुरू केला. यातल्या अनेक महिलांना हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महानगरपालिकेतील बालवाड्यांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या. ते सुरू असतानाच शिवणकामाचे प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात आले.

सुरुवातीला बेसिक कोर्स होता. त्यानंतर ॲडव्हान्स टेलरिंगचा कोर्सही सुरू करण्यात आला. त्यानंतर ज्या महिलांकडे शिक्षण कमी आहे, पण सहज सुरू करता येईल, अशा ब्युटिशियनचे कोर्सही सुरू केले गेले. हे सर्व कोर्सेस तीन महिन्याच प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. यासाठी (NSDC- National Skill Development Corporation) शासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची गुणवत्ता लक्षात आल्यानंतर तसंच त्यामुळे रोजगार उपलब्ध होत आहे, हे दिसल्यानंतर वीस वीस किलोमीटर अंतरावरून महिला हे कोर्स करण्यासाठी येऊ लागल्या. या दोन्ही कोर्सेसमध्ये जवळजवळ ७५ ते ८० टक्के महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यापैकी अनेक महिलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर एका शिवण यंत्रावर काम सुरू केलं. नंतर त्यांची पाच-पाच शिवणयंत्रे झाली आहेत. काही महिला ब्यूटिपार्लरमध्ये नोकरीला लागतात आणि अनुभव घेतल्यावर स्वतःची ब्यूटिपार्लर सुरू करतात अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यानंतर महिलांसाठी “फुडटेक प्रकल्प” (अन्नपूर्णा हा प्रशिक्षण अभ्यासक्रम) सुरू करण्यात आलाय. यासोबतच इलेक्ट्रेशियन हा कोर्समधील युवकांसाठी सुरू करण्यात आला. यामध्ये युवकांना वालफिटिंग, मोटार दुरुस्ती, कुलर दुरुस्ती, घरगुती उपकरण दुरुस्ती या कामातून रोजगार उपलब्ध झालाय.

पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सर्व अभ्यासक्रमांचा मूळ उद्देश म्हणजे स्वविकासातून आत्मनिर्भरता महिलांमध्ये निर्माण करणे हा आहे. तो या सर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमांतून पूर्ण होताना दिसत आहे. २००८ सालापासून आत्तापर्यंत १५ हजार ५०० ते १५ हजार ८०० महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊन त्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. यातल्या ११ हजार महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. यापैकी प्रत्येक महिला कमीत कमी ६ हजार रुपये ते जास्तीत-जास्त सव्वा लाख रुपयांपर्यंत अर्थार्जन करत आहे.
आज शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांच्या अनेक यशोगाथा आहेत. एका महिलेचं केवळ नववीपर्यंत शिक्षण झालं होतं. तिने ब्यूटिशियनचा कोर्स पूर्ण केला आणि तिला तिचं कौशल्य पाहून रामा हॉटेलसारख्या फाइव स्टार हॉटेलमध्ये असिस्टंट ब्यूटिशियनची नोकरी मिळाली. ५ वर्षे तिथे काम केल्यानंतर तिने स्वतःचे ब्यूटिपार्लर उघडलं, ते उत्तम चालू लागल्यावर तिने आता दुसऱ्या ठिकाणी आणखी एक ब्यूटिपार्लर उघडलं असून आता ती तिच्यासारख्याच १० ते १५ महिलांना रोजगार देत आहे.

महिलांना हे प्रशिक्षण अभ्यासक्रम संभाजीनगर शहरातल्या चार मुख्य केंद्रात तसंच ग्रामीण भागातल्या तीन केंद्रात शिकवले जातात. हे सर्व उपक्रम राबवण्यासाठी आज कौशल्य विकास विभागाकडे ५० जणांची टीम आहे. संभाजीनगर शहरातील चार सेवावस्त्या व जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. वर्षा पाटील या कौशल्य विकास विभागाचे उत्तम नेतृत्व करत आहेत. दहा कार्यकर्त्यांपासून सुरू झालेला हा प्रवास ५० कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. यापुढे मोबाइल, टेलरिंग सेंटर सुरू करण्याचा मंडळाचा विचार आहे. एक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती मोटरसायकलवरून प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन तिथून काम घेऊन येईल, यामुळे ग्रामीण भागातील महिलांना चांगले कपडे शिवून मिळतील आणि इतर महिलांना रोजगार उपलब्ध होईल, अशी योजना आखली जात आहे.

याशिवाय कॉम्प्युटर प्रशिक्षण मोबाइल व्हॅनच्या मार्फत गावांमध्ये पोहोचवण्याचा विचार आहे. म्हणजे एक व्हॅन ज्यामध्ये दहा संगणक उपलब्ध असतील, ही व्हॅन गावात जाईल, तिथे गावातील मुलं दोन तास प्रति दिवस येऊन शिकतील आणि त्यानंतर परीक्षाही देतील असा एक उपक्रम हाती घ्यायचा आहे. त्याशिवाय सध्या सुरू असलेले सर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम आणखी गावांमध्ये पोहोचवण्याचाही विभागाचा मानस आहे. अशा रीतीने एक सामाजिक संस्था दूरदृष्टी असेल, तर एखाद्या मोठ्या भौगोलिक भागाचा सर्वांगीण विकास कसा करू शकते? याचे उत्तम उदाहरण म्हणून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाकडे पाहता येईल.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -