वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : सोनी टीव्हीवरील (Sony TV) सीआयडीसारख्या (CID Crime Show) लोकप्रिय मालिकेतून गेली २० वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे फ्रेडरिक्स म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते दिनेश फडणीस (Dinesh Fadnis) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर काल रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दिनेश फडणीस हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना यकृत, हृदय आणि किडनीचा त्रास होता आणि त्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. दिनेश फडणीस हे ३० नोव्हेंबरपासून कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, काल रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
सीआयडी या प्रदीर्घ काळ चालणार्या शोची संपूर्ण स्टारकास्ट त्यांच्या निवासस्थानी पोहचली आहे. दिनेश फडणीस यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते आणि कलाकार पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
दिनेश फडणीस १९९८ मध्ये सीआयडी शो सुरू झाल्यापासून या शोसोबत जोडले गेले होते आणि सीआयडीच्या दोन दशकांच्या प्रवासात ते नेहमीच शोमध्ये दिसले. या २० वर्षांत आपल्या व्यक्तिरेखेने त्यांनी लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्ये काम केले आहे. टीव्ही शो व्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केल्याची माहिती आहे. ते आमिर खानच्या चित्रपट ‘सरफरोश’ आणि हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’मध्येही दिसले.