मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांत ज्या दणदणीतपणे भाजपाचा विजय झाला आहे, त्यावरून देशात केवळ ‘मोदी की गॅरंटी’च काम करते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तीनही राज्यांत भाजपा दणदणीत विजयासह परतला आहे आणि मोदी यांना २०२४ मध्ये टक्कर देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीचे स्वप्न भंगले. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी तेलंगणापासून सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेपासून स्वतःबद्दल माध्यमांच्या मदतीने विश्वास निर्माण केला होता, त्याचा चक्काचूर झाला आहे.
भारतात केवळ एकच गॅरंटी काम करते आणि ती ‘मोदी की गॅरंटी’ आहे, यावर जनतेचा विश्वास बसला आहे. याचीच परिणती म्हणजे तीन राज्यांतील निकाल आहेत. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे सारेच नेते स्वतःला मोदी यांना पर्याय म्हणून समोर आणण्याच्या तयारीत होते. त्यांचा पार सफाया झाला आहे. तेलंगणाने थोडी फार साथ दिली नसती, तर काँग्रेसला तोंड काढणे मुश्कील झाले असते. ‘मोदी की गॅरंटी’मुळे राहुल आणि कंपनीच्या अस्तित्वावरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेसला राहुल आणि प्रियंका या विजय मिळवून देऊ शकत नाहीत, हे अजून किती काळ काँग्रेसला समजणार नाही, हा एक प्रश्न आहे. राहुल आणि प्रियंका तसेच गांधी घराण्याचे भूत आपल्या मानगुटीवरून फेकून दिल्याशिवाय काँग्रेसला चांगले दिवस येणे अवघड आहे, हे काँग्रेसच्या लक्षात कधी येणार, हा सवाल उपस्थित झाला आहे.
या निकालामुळे लोकसभा निवडणुकीतही मोदी यांच्या विजयाची हॅटट्रिक साध्य केली जाणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, ही बाब अधोरेखित झाली आहे. काँग्रेसची अवस्था फारच नाजूक झाली आहे आणि आता त्यांना लोकसभेच्या जागावाटपात पूर्वीचे स्थान तर राहिले नाही. उलट इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष काँग्रेसच्या वाट्याला जितक्या जागा देतील, तितक्यावर समाधान मानण्याशिवाय काँग्रेसला गत्यंतर नाही. काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर प्रचंड घटली आहे. संपूर्ण निवडणूक प्रचारात मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केले. पण त्यापेक्षाही मोदी यांच्या ताब्यात देश सुरक्षित आहे, यावर जनतेचा जास्त विश्वास होता आणि तो आणखी दृढ झाल्याचे दिसले. तिन्ही राज्यांत भाजपाला जो लक्षणीय विजय मिळाला, त्यासाठी काही बाबी कारण ठरल्या. म्हणजे मप्रमध्ये ‘लाडली’ योजना अत्यंत यशस्वी झाल्याचे दिसले. तसेच मोदी यांच्यावर टीका करणारे हे विसरतात की, मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जी ‘शेतकरी सन्मान निधी’ योजना सुरू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होत आहे.
जनधन खात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नोटाबंदीसंबंधी मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणारे विसरतात की, याच निर्णयामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश आज कंगाल झाले आहेत. पाकिस्तानातून खोट्या नोटा येत होत्या आणि त्या आता चलनातून बाद झाल्या आहेत, हे करणे अत्यंत आवश्यक होते. या निवडणुकीत भाजपाने मात्र शिवराज चौहान आणि वसुंधरा राजे यांच्यासारखे दिग्गज असूनही आपला फोकस मोदी की गॅरंटीवर ठेवला आणि त्याचे चांगले फलित भाजपाला मिळाले.
कोणत्याही गोष्टीची गॅरंटी नसते पण ‘मोदी की गॅरंटी’ हीच तेवढी खरी असते, यावर जनतेनेच शिक्कामोर्तब केले. भाजपाने मोदी की गॅरंटीवर प्रचाराचा भर ठेवला होता आणि त्याचे परिणाम आज तीन राज्ये काँग्रेसच्या ताब्यातून गेली आहेत. तिन्ही राज्यांत एखादा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणता आला असता. पण मोदी यांनी मास्टरस्ट्रोक खेळला आणि कुणालाच दावेदार म्हणून समोर केले नाही. परिणामी गटबाजीला काही संधीच राहिली नाही. आता या निकालामुळे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांसमोर काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मोदी आणि शहा यांच्या दुर्दम्य सामर्थ्याशी मुकाबला कसा करायचा, याचा विचार करून आता काँग्रेस नेत्यांना झोप येणार नाही.
राहुल गांधी यांनी आमचा पक्ष ‘मोहब्बत की दुकान’ चालवतो, यावर प्रचारात जोर दिला होता. पण जनतेने राहुल यांच्या बोगस पोपटपंचीला बंद करून टाकले आहे. जनतेच्या मनात काय असते, हे कुणीच सांगू शकत नाही. जनतेने मूक राहून बोलघेवड्या पक्षांना आणि यांच्या ऊठवळ नेत्यांना चोख उत्तर दिले आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटप बोलण्यात आता प्रादेशिक पक्षांची दादागिरी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसला या आघाडीचे नेतृत्व करण्याची खुमखुमी होती. पण आता राहुल यांच्याकडे विरोधी आघाडीच्या नेतृत्वाची संधी देणे तर सोडूनच द्या पण काँग्रेसला इंडिया आघाडीत स्थान राहिले तरी पुष्कळ झाले, असे म्हणण्याची पाळी आली आहे.
भाजपाविरोधी माध्यमे इतकी क्षुद्र आहेत की, भाजपाच्या विजयाचे श्रेयही मोदी यांना देण्यास ते तयार नाहीत. पण मोदी मॅजिक ही तीन राज्यांत चालली, हे कुणी नाकबूल केले तरीही ती वस्तुस्थिती आहे. तीन राज्यांत वाईट प्रकारे पराभवास समोरे जावे लागल्यावर आता काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण आली आहे. काँग्रेस नेहमीच कुणाशी आघाडी करण्यास तयार नव्हती. पंचमढी ठरावात काँग्रेसने तेच म्हटले होते. पण आता काँग्रेसची अवस्था इतकी खराब झाली आहे की, काँग्रेसबरोबर जाणे म्हणजे आत्महत्या करणे, असे इतर पक्षांना वाटू लागले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर आपलाच सर्वात मोठा पक्ष आहे, असे म्हणत काँग्रेसला खिजवण्यास सुरुवात केली आहे. मोदी की गॅरंटीने हा चमत्कार घडवला आहे. लोकसभा निवडणुकीत हेच चित्र दिसणार आहे, यात काही शंका नाही. जनतेच्या मनात तरी तेच आहे.