मुंबईतला पाणीपुरवठा प्रश्न तब्बल ५० तासांच्या प्रयत्नांनंतर सुटला!

  161

टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करणार, नागरिकांनी संयम राखावा


मुंबई : अंधेरीतल्या वेरावली सेवा जलाशयाच्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती आज जवळजवळ ५० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाली आहे. आता या जलवाहिनीत पाणी सोडून सेवा जलाशय भरण्यात येतील. त्यानंतर सर्व संबंधित परिसरांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे.


मेट्रोच्या ड्रिलिंगचे काम सुरू असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ १८०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गुरुवार, ३० नोव्हेंबरला गळती सुरू झाली. महानगरपालिकेने गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. शनिवार, २ डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते रविवार, ३ डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजेपर्यंत दुरूस्‍ती काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, दुरुस्ती काम सुरू झाल्यानंतर वेगवेगळी आव्हाने समोर आली.


ज्या ठिकाणी गळती लागली ती जलवाहिनी जमिनीत सुमारे सहा मीटर खोल होती. तसेच या परिसरात अलीकडे बांधकाम झाल्यानंतर जमिनीचा भराव पूर्ववत केलेला असल्याने तुलनेने त्याची भूगर्भीय पकड सैल होती. त्यामुळे अधूनमधून ती मातीदेखील गळती झालेल्या खड्ड्यात कोसळत होती. स्वाभाविकच मुख्य जलवाहिनी पूर्ण रिकामी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण पाण्याचा उपसा करणे आणि त्याचवेळी दुरुस्तीसाठी खोदकाम केलेल्या ठिकाणी भूस्खलन होऊ न देणे, हे अतिशय मोठे आव्हान पेलून दुरुस्तीविषयक कामे सुरू होती. एव्हढेच नव्हे तर या जलवाहिनीला वरून नव्हे तर आजूबाजूने आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी छिद्र होऊन गळती लागली होती. त्यामुळे जलवाहिनी पूर्ण रिती झाल्यानंतर आत शिरून ही सर्व छिद्र बंद केली जात होती.


या जलवाहिनीमध्ये भांडुप संकुलातून येणारे पाणी बंद करण्यात आले असले तरी, जलवाहिनीतील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यासाठी अन्यत्र कुठेही जागा नसल्याने गळतीच्या ठिकाणीच सर्व पाणी बाहेर काढून उपसा केला जात होता. प्रकल्प स्थळावरील या अडथळ्यांमुळे आणि आव्हानांमुळे दुरुस्तीकामाला एरव्हीपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत म्हणजे काल पूर्ण होऊ शकले नाही.


जलवाहिनीची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी), जल अभियंता यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार मिळून तब्बल शंभरपेक्षा जास्त कर्मचारी तळ ठोकून कार्यरत होते. या दुरूस्तीला आता यश आले आहे.


दरम्यान, पाणीपुरवठा बाधित झालेल्या भागांमध्ये पालिकेच्या वतीने स्वतःचे टँकर वापरून ३७ फेऱ्या आणि खासगी टँकरच्या ८१ फेऱ्या असे मिळून एकूण ११८ फेऱ्या करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. टँकरव्यवस्था केली असली तरी, पाणीपुरवठा बाधित झालेल्या परिसराची व्याप्ती लक्षात घेता, टँकर भरून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ पाहता प्रशासनावर मर्यादा येत होत्या.


जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार करून सेवा जलाशय भरले जातील आणि के पूर्व, के पश्चिम, एच पश्चिम, एन आणि एल विभागात लागलीच टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाईल. तोवर नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र