Saturday, May 17, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

PM Modi : आता तरी सुधरा, नाहीतर..!

PM Modi : आता तरी सुधरा, नाहीतर..!

पराभवाचा राग संसदेत काढू नका, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा


नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session) आज सकाळी सुरुवात झाली. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पराभवाचा राग संसदेत (Parliament) काढू नका, या निकालातून काही बोध घ्या आणि सुधरा, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.


पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले की, शिवीगाळ, निराशा आणि नकारात्मकता घमंडिया आघाडीसाठी हेडलाईन्स बनू शकतात, पण जनतेच्या मनात स्थान देऊ शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना इशारा देत म्हटले आहे की, ''सुधरा, नाहीतर जनताच तुम्हाला साफ करेल. हा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीसाठी मोठा धडा आहे. काही घराणेशाहीचे लोक एकत्र एका मंचावर आल्याने फक्त चांगला फोटो येऊ शकतो, पण देशाचा विश्वास जिंकू शकत नाही. देशातील जनतेचे मन जिंकण्यासाठी राष्ट्रसेवा करणे गरजेचे आहे.''


चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात दमदार विजय मिळवला. तर काँग्रेसला केवळ तेलंगणा जिंकता आले. या दारुण पराभवामुळे चिडलेल्या विरोधकांवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला आहे, त्यांनी संसदेत त्यांचा राग दाखवू नये. लोकशाहीमध्ये पक्ष आणि विपक्ष समान आहे. राजकारणात जनतेचे हित विसरू नका. तसेच हा निवडणुकीचा निकाल सकारात्मक पद्धतीने जनतेसमोर आणा, असे आवाहन पंतप्रधानांनी राजकीय विश्लेषकांना केले आहे.


पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, ''काही लोक याला सरकार समर्थक सुशासन किंवा पारदर्शकता म्हणतात, हे देशात दिसून येत आहे. देशाने नकारात्मकता नाकारली आहे. लोकांच्या आकांक्षा बळकट करण्यासाठी लोकशाहीचे मंदिर महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मी सर्व सदस्यांना विनंती करतो की, त्यांनी योग्य तो अभ्यास करुन आणि विषयाची माहिती घेऊन संसदेत मांडलेल्या विधेयकांवर सखोल चर्चा करावी.''


''देशातील वातावरणात हळूहळू थंडी वाढत असली तरी राजकीय वातावरण मात्र तापले आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उत्साह दाखवणारे आणि देशाचे भविष्य निश्चित करणारे आहेत. चांगल्या जनादेशानंतर आम्ही संसदेच्या मंदिरात भेटत आहोत. मी सर्व खासदारांना सकारात्मक विचार घेऊन संसदेत यावे, असे आवाहन करतो. बाहेरच्या पराभवाचा राग संसदेत आणू नका. लोकशाहीच्या मंदिराला स्टेज बनवू नका. देशाला सकारात्मकतेचा संदेश द्या,'' असा मोलाचा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या सदस्यांना दिला आहे.

Comments
Add Comment