आज वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : देशभरात सध्या अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळत आहे. याचं एक कारण म्हणजे बंगाल उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं मिचाँग चक्रीवादळ (Cyclone Michaung). हे चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळाचा परिणाम भारतीय रेल्वेवरही (Indian Railway) झाला असून १४४ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच अनेक ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
चक्रीवादळामुळे चेन्नई, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशसह आसपासच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील ४८ तासांत या भागात वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. चेन्नई, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने १४४ गाड्या रद्द केल्या आहेत.
कसं असणार हवामान?
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि चेन्नईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात ९० ते ११० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. तर उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मिचाँग चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ पोहोचलं आहे. या काळात ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान मिचाँग चक्रीवादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदी घेत आहेत आढावा
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सरकार सतत संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मिचाँग वादळाच्या संदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.