Tuesday, December 3, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : विरोधक शेंबड्यासारखे रडताहेत

Nitesh Rane : विरोधक शेंबड्यासारखे रडताहेत

भाजपच्या विजयानंतर संजय राऊतसह विरोधकांचं ईव्हीएमच्या नावाने रडगाणं सुरु

आमदार नितेश राणे यांचा सणसणीत टोला

मुंबई : लोकसभेसाठी सेमीफायनल झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. एक्झिट पोलचे दावे साफ खोटे ठरवत तीन राज्यांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. यावरुन विरोधकांकडून टीकासत्र सुरु झाले आहे. मात्र, याचा चांगलाच समाचार आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपल्या पत्रकार परिषदेत घेतला. ‘काल चार राज्याचे निकाल लागल्यानंतर भारत देशात मोदींची गॅरंटी चालते यावर भारतातल्या नागरिकांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे आणि अपेक्षेप्रमाणे आमचे विरोधक शेंबड्या सारखे रडत आहेत’, असा सणसणीत टोला नितेश राणे यांनी लगावला.

नितेश राणे म्हणाले, आज संजय राऊतने (Sanjay Raut) ईव्हीएमचा उल्लेख केला. चार राज्यांचे निकाल ही ईव्हीएमची कमाल आहे, असं तो म्हणाला. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे लोक जिंकले तर ईव्हीएमबद्दल काहीच आवाज करणार नाहीत, पण हरले तर सगळ्या कोपर्‍यातून ईव्हीएमच्या विरोधात भुंकण्याचं काम करणार. त्यांना आलेली पूर्वकल्पना खरीच ठरली. तिकडे दिग्विजय भुंकत आहेत. इकडे राऊत भुंकतोय. मग तेलंगणामध्ये पण ईव्हीएमची कमाल आहे का? तेलंगणामध्ये रेवंथ रेड्डी यांनी काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मग तिथे पण ईव्हीएमची कमाल आहे का? अशी टीका नितेश राणे यांनी केली.

उद्धव ठाकरेंना दिलं ओपन चॅलेंज

इंडिया अलायन्सच्या मल्लिकार्जुन खरगे यांच्या बैठकीसाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जातील असं राऊत बोलत आहे. पण मला काल रात्री मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे भाजपच्या आमच्या विविध नेत्यांजवळ पायघड्या घालत आहेत, की मला कोणत्याही परिस्थितीत तुमच्या युतीमध्ये घ्या, मी कोणतीही अपेक्षा ठेवणार नाही. हे मला उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या माणसाने काल रात्री फोन करुन सांगितलं आहे. असं नसेल तर, इंडिया अलायन्सच्या बैठकीत सगळ्यांसमोर आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं की, भाजपा सोबत युती करण्यासाठी मी प्रयत्न करत नाही, असं ओपन चॅलेंज नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

उद्धव ठाकरेंचा दुतोंडी कारभार

एका बाजूला भाजपवर टीका करायची, नावं ठेवायची, दुसर्‍या बाजूला काँग्रेसचं गुणगान गायचं, खरगेंच्या घरी जाऊन नाश्ता खायचा आणि मग आतमधून गुपचूप पद्धतीने भाजपबरोबर युती करण्यासाठी लोटांगण घालायचं, असं जर तुमचा मालक करत असेल तर त्याचंही स्पष्टीकरण इंडिया अलायन्सच्या बैठकीत तुमच्या मित्रपक्षांना द्या, असं नितेश राणे यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे.

महिलांचा अपमान हीच उबाठाची भूमिका आहे का?

काल पत्रकार परिषदेत महिलांना पैसे देऊन मते विकत घेतली, असं संजय राऊतने महिलांबाबात वक्तव्य केलं. त्यामुळे त्या चारही राज्यातील माताभगिनींचा फार मोठा अपमान त्याने केला आहे. मला उद्धव ठाकरेंना विचारायचंय की जे मत संजय राऊतचं आमच्या माताभगिनींबद्दल आहे, तेच तुमचं मत आहे का? तीच तुमच्या उबाठाची भूमिका आहे का? कारण संजय राऊत महिलांना किती सन्मान देतो हे त्याच्या घरच्या महिला किंवा माताभगिनी चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. अजून खोलात जायचं असेल तर आमची जी डॉक्टर बहीण आहे ती आणखी सविस्तर सांगू शकते. त्यामुळे त्याच्यासोबत अख्ख्या उबाठाचीही तीच भूमिका आहे का हे सांगा, असं नितेश राणे म्हणाले.

तुझा मालक रसातळाला गेलेला आहे…

आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, अजितदादा असो आणि त्यांच्यासोबतचे सगळे समर्थक आमदार यांना आमच्या आदरणीय पंतप्रधानांवर पूर्णपणे विश्वास आहे. जसं देशाच्या जनतेला मोदींच्या गॅरंटीवर विश्वास आहे, तसंच आमच्या मित्र पक्षांचा मोदींवर विश्वास आहे. मोदींच्या गॅरंटीमुळेच तुझ्या मालकाचे २०१४ आणि २०१९ ला १८ खासदार निवडून आले होते. तुझा मालक सत्तेत गेला पण जेव्हा मोदीजींची गॅरंटी तुझ्या मालकावरुन निघून गेली तेव्हा तुझा मालक रसातळाला गेला.

उद्धव मॅजिक मातोश्रीवर तरी चालेल का?

महाराष्ट्रात आता उद्धव मॅजिक चालणार असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. त्यावर चोख प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, उद्धव मॅजिक मातोश्रीवर तरी चालेल का? असा आता प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आता आदित्य ठाकरे आणि त्याच्या नाईटक्लब गँगलादेखील विश्वास राहिलेला नाही आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे जसलोकमध्ये असताना संजय राऊत मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करत होता, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -