Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिककोलाजजागतिक दिव्यांग दिन

जागतिक दिव्यांग दिन

गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी

शारीरिक आणि मानसिक अपंग असलेल्या मुलांच्या ५० मीटर धावण्याच्या शर्यतीत दहा अपंग मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धा सुरू होताच दहाही जणांनी ईर्षेने धावायला सुरुवात केली. मुळातच पायांनी अपंग असलेल्या मुलीचा तोल गेला आणि ती जोरात जमिनीवर आदळली. तिच्या रडण्याच्या आवाजाने इतर नऊजण मागे फिरून तिच्याजवळ गेले. एकाने तिला उभे केले. कोणीही न सांगता दहाही जण एकमेकांचा हात हातात धरून अंतिम सीमारेषेपर्यंत चालत पोहोचले. स्पर्धा संपली. सगळेच जिंकले. प्रथम क्रमांकाच्या चढा-ओढीच्या जमान्यात, शरीरानं आणि बुद्धीनं सक्षम असणाऱ्यांना उपस्थितांना ही स्पर्धा बरेच काही शिकवून गेली. येथे खरा विजय होता माणुसकीचा, मैत्रीचा आणि सहकार्याचा!

उत्तर प्रदेशातील गुलशनकुमारला अवघा नऊ महिन्यांचा असताना डॉक्टरांच्या चुकीच्या औषधाने कायमचे अपंगत्व आले. व्हीलचेअरशिवाय चालता न येणाऱ्या गुलशनकुमारकडे इतर सहनुभूतीने पाहत, तेव्हा त्याला राग येत असे. पाशा सरांनी तू व्हीलचेअरवर बसून कथ्थक, भरतनाट्यम व सुफीही नृत्य करू शकतो हे सांगून गुलशनकुमारमध्ये आत्मविश्वास जागा केला. अहोरात्र मेहनत घेत २००६ मध्ये अमेरिकेत नंतर कॅनडा व इतर देशांतही व्हीलचेअरवर बसून गुलशनकुमारने नृत्याचे कार्यक्रम सादर केले. प्रत्येक अाविष्काराआधी ‘माझी कला आवडल्यास दाद द्या, मी अपंग आहे म्हणून नाही.’ हे प्रेक्षकांना सांगायचा. २०११मध्ये एका मिनिटांत ६३वेळा व्हीलचेअर फिरविण्याचा विश्वविक्रम केला. व्हीलचेअर हे शरीराचे वहन करणारे साधन नसून गुणांना व्यक्त करणारे साध्य आहे हे दाखवून दिले.

अपंगांना ‘सहानुभूती नको, विश्वास हवा.’
‘अपंग म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये कोणत्याही शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे तो सामान्य लोकांप्रमाणे काम करू शकत नाही.’ २०१६ पासून अपंग शब्दाऐवजी ‘दिव्यांग’ शब्द वापरतात.

दिव्यांग दिनाचा इतिहास – २० सप्टेंबर १९५९ रोजी बेल्जीयम येथील कोळशाच्या खाणीत अचानक झालेल्या स्फोटामुळे अनेकजण मृत्युमुखी पडले, जखमी झाले, जमिनीत गाडले गेले, धुरामुळे आंधळे झाले, आवाजाने कर्णबधिर झाले, हातपाय निकामी झाले. मुख्यतः कायमचे अपंगत्व आलेल्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यांचा रोजगार गेला. यातून निर्माण झालेल्या आंदोलनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. या एका घटनेने जगातले सर्व दिव्यांग बांधव एकत्र आले. स्वतःच्या हक्कासाठी, उद्धारासाठी संघटना बांधल्या. या दिवसाची आठवण म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने मार्च महिन्यातील तिसरा रविवार दिव्यांग दिन ठरविला होता.

१९८३ ते १९९२ हे दशक दिव्यांगांसाठी अर्पण करण्यात आले होते. सर्वसामान्य जनतेत दिव्यांगांविषयी जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांच्या, त्याच्या पालकांच्या समस्या समजाव्यात, दिव्यांगांचा सत्कार व्हावा, या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघातर्फे एकाच स्थिर तारखेसाठी १९९२पासून ३ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक दिव्यांग दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. अपंग दिनी विविध ठिकाणी स्पर्धा, खेळ, करमणुकीचे कार्यंक्रम, प्रेरणादायी व्याख्याने आयोजित केली जातात. दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, रोजगार, त्यांच्यातील सुप्त कलांना वाव देण्यासाठी, कल्याणकारी योजना राबविण्यासाठी, समान संधीसाठी भारत देशातील पहिले ‘महाराष्ट्र राज्य’, त्यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय विभाग स्थापन केला.

हेलन केलर, लुईस ब्रेल, स्टिफन हॉकिंग अशा अनेक महान व्यक्तींसह अनेक सामान्यही आपल्या दिव्यांगांवर मात करत पॅरालिम्पिक व इतर क्षेत्रांतही आपला ठसा उमटवत आहेत. गरज आहे फक्त प्रोत्साहनाची! सुधा चंद्रन यांनी एका दुर्दैवी अपघातात पाय गमावल्यानंतर शास्त्रीय नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर जागतिक कीर्ती संपादन केली. कुलाब्याच्या नौदल शाळेत शिकणारी रिया लहानपणापासून स्वमग्न होती. मानसिक स्थिती स्थिर राहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जलतरण सुरू केले. आज एलिफंटा ते गेट वे(१४ कि. मी.), अर्नाळा ते वसईचा किल्ला (२२ कि. मी.), बांद्रा सी लिंक ते गेट वे (३५ कि. मी.) अशा अनेक विक्रमानंतर रियाला केंद्र सरकारचा ‘श्रेष्ठ दिव्यांग बालिका’ हा ‘किताब मिळाला.

२०१८ मध्ये एका वृत्तप्रत्रात ‘अपूर्णांक’ या सदरात पालकांनी आपल्या अपंग मुलाला कसे घडविले याची उदा. होती. – श्रीहरी टाकळकर हा स्वमग्नता असलेला मुलगा, हायपर ॲक्टिव्ह होता. स्वतः आई त्या थॅरेपी शिकल्या. आज श्रीहरी पूर्णतः स्वावलंबी आहे. आईच्या ऑटिझम सेंटरमध्ये मदतनीस म्हणून काम करतो. बालपणीच वडिलांनी शिक्षणात पीएच. डी. करायची हे स्वप्न पेरलेल्या कल्पनाला १३व्या वर्षीच अंधत्व आले. रशियात उपचारासाठी १२ वर्षे राहिल्याने, रशियातच पीएच. डी. केले. आज पीएच.डी. गाईड असून सोमय्या कॉलेजात उपप्राचार्य, व्हाईस चॅन्सलर असलेल्या डॉ. कल्पना खराडे, संगणकावर स्वतःला अपडेट ठेवतात. त्या म्हणतात, अपंगांचा बाऊ न करता जगायला शिका. समाजात संधी खूप आहेत.

एका श्रीमंत उच्चभ्रू कुटुंबात बाळाचा जन्म झाला. बाळबाळंतिणीच्या कोडकौतुकात मुलाला अमेरिकेत शिकवू, माझ्यासारखा ग्लोबल उद्योजक बनविणार… तो मुलगा मतिमंद आहे हे समजले. वास्तव स्वीकारत पालक सावरले. आपल्या मतिमंद मुलाला वाढविताना, घडविताना पालकांना अन्य दिव्यांगांच्या वेगळ्या जगाची ओळख झाली. त्यापुढे धडधाकट माणसांची गोजिरी दुःखे किती फिकी आहेत हे समजले. आमच्या या मतिमंद मुलाला देण्यापेक्षा आमचे या जगात मिळविणेच अधिक झाले.

ज्याचे कुणीही नाहीत, जे गरीब, दिव्यांग, अनाथ आहेत अशा मुलांसाठी यजुर्वेद महाजन यांची जळगाव येथे ‘दीपस्तंभ फाऊंडेशन’ ही संस्था काम करते. या संस्थेच्या तीन उपशाखा असून अनुभवी शिक्षकांची फळी तयार आहे. मुलांकडून काहीही न घेता, जे आयुष्याकडे पाहू शकत नाहीत, अशा दीड हजार मुलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पाच हजारांच्या वर मुले ट्रेनिंग घेऊन बाहेर आपला ठसा उमटवत आहेत. कमरेच्या खाली जीवच नसलेली नांदेडच्या चेतालीला शाळेत, घराबाहेर पाठवू नका, असे सांगून चेतालीच्या आई-वडिलांना घाबरवले होते. तीच चेताली छोट्या तीनचाकी सायकलवर बसून, ‘दीपस्तंभ संस्थेत येऊन बी.ए. झाली. तिला अधिकारी व्हायचं आहे. ‘दीपस्तंभा’ संस्थेतील अनेक दिव्यांग तेथे राहून पंखाविना भरारी घेत आहेत. मनाने खंबीर असलेल्या दिव्यांगांना आधाराचा एक हात द्या. धडपणाऱ्या दिव्यांगांच्या कहाण्या वाचताना आपल्याकडे सर्व अवयव असूनही आपण स्वप्न पाहत नाही हे खरे आपले अपंगत्व! ‘आयुष्यात शारीरिक अपंगत्वापेक्षा विचारांचं अपंगत्व अधिक धोकादायक असते.’
mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -