Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनधार्मिक स्थळे म्हणजे पर्यटनस्थळे नव्हे हे सांगणारी ‘वस्त्र संहिता’!

धार्मिक स्थळे म्हणजे पर्यटनस्थळे नव्हे हे सांगणारी ‘वस्त्र संहिता’!

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

मनुष्य जसजसा माणूस बनू लागला, तसतसा त्याने स्वतःची प्रगती करण्यास सुरुवात केली. अन्न आणि निवाऱ्यासोबत त्याने वस्त्र ही आपली मूलभूत गरज बनवली. अन्नाचे रूपांतर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये झाले, वेगवेगळ्या चवींचा शोध लागला. दगडांची गुहा एक सुंदर आलिशान घरात रूपांतरित झाली, तर झाडांची पाने, फांद्यांची वस्त्रे ताग्यापासून बनलेले कपडे बनले. या वेशभूषेत सुद्धा बदल झाले. त्यावर पृथ्वीवरील त्या त्या भागातील लोकसंस्कृती, पर्यावरणीय परिस्थिती, हवामान याचा परिणाम दिसून येऊ लागला. बर्फ पडणारे देश आणि कडक उन्हाचे वाळवंटी प्रदेश, मुसळधार पावसाचा परिसर या प्रत्येक ठिकाणी तेथील गरजेप्रमाणे वेशभूषा बनवली गेली. माणूस जसजसा प्रगत होऊ लागला, दळणवळण, संपर्क यात आमूलाग्र बदल झाला. तसतसा वेगवेगळ्या प्रदेशांनी विकसित केलेल्या वेगवेगळ्या कला, संस्कृती यांच्यात आदान-प्रदान होऊ लागले.

आजच्या आधुनिक बोलीभाषेत ते कॉपी होऊ लागले. कॉपी केलेल्या या कला संस्कृतीवर मग स्थानिक कला संस्कृतीचा प्रभाव पडला आणि वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ घडत गेला. या आदान-प्रदान केलेल्या संस्कृतीचा समाजातील अनेक क्षेत्रांवर प्रभाव झालेला दिसून आला. तसा तो वेशभूषेवरही झालेला दिसून आला. पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा होतोच. गेल्या काही शतकांमध्ये आधुनिकीकरणाच्या नावाखाली संस्कृती संवर्धनाऐवजी संस्कृतीवर कुरघोडी होताना दिसत आहे. अनेक पिढ्या जपलेली संस्कृती नष्ट होताना दिसत आहे आणि त्यात सर्वात मोठे आक्रमण झाले आहे ते वेशभूषेवर, परिधान केलेल्या कपड्यांवर. पाश्चात्त्यांचे अनुकरण या नावाखाली माणूस पुन्हा नग्नतेच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.

हे सगळ लिहिण्यामागचे कारण म्हणजे सध्या ‘वस्त्र संहिता’ हा विषय संपूर्ण राज्यात गाजत आहे. मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास’ परिषदेने गेल्या वर्षापासून या उपक्रमाला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये जशी आचारसंहिता लागू केली जाते, तशीच राज्यातील सर्व मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर न्यास महासंघ प्रयत्नशील असून त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. खरं तर मंदिरे ही माणसाच्या अाध्यात्मिक श्रीमंतीची प्रतीके आहेत. मनुष्य जगासाठी, स्वतःसाठी जगताना अनके अडीअडचणींचा सामना करत असतो. वेगवेगळ्या प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी त्याचे भरकटलेले चित्त स्थिर करण्यासठी, मानसिक शांततेसाठी, आध्यात्मिक भावनेसाठी ही मंदिरे शक्तिस्थाने आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मंदिरे यांच्याकडे धार्मिक स्थळे होण्यापेक्षा पर्यटन स्थळे म्हणून बघितले जाऊ लागले आहे.

पर्यटनाला जाणारा माणूस हा त्याची अनेक बंधने झुगारून, मोकळा-ढाकळा जातो, काही सामाजिक नियम बाजूला ठेवून रिलॅक्स होऊ पाहतो. पण मंदिरांमध्ये हा मोकळेपणा उपयोगी नसतो. धार्मिक स्थळांना भेट देताना काही नियम हे आवश्यक आहेतच. त्यामध्ये जसं आर्वाच्च स्वरातील संभाषणे नको, गोंधळ नको, डीजे-पार्ट्या नको तसेच पेहराव सुद्धा साधा असावा, त्याकडे पाहताना अन्य लोकांचे मन आणि चित्त भरकटू नये इतकी माफक अपेक्षा असते. धार्मिक स्थळामध्ये आपल्या दैवतेसमोर नतमस्तक होण्यासाठी आपण जातो, अशी ढोबळ समजूत आहे.

पण धार्मिक स्थळांकडे सुद्धा पर्यटनस्थळ म्हणून पाहू लागल्याने हा सगळ्याच गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. देवळे, मंदिरांमध्ये जातानाही अपूर्ण, अयोग्य कपडे घालण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे. “असे चालते” ही समजूत प्रबळ होत आहे आणि त्यामुळेच धार्मिक स्थळांचे पावित्र्य, उद्देश दूर होत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र मंदिर न्यास महासंघाने मंदिरांमध्ये ‘वस्त्र संहिता’ लागू करण्यासठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी राज्यातील लहान-मोठ्या मंदिर विश्वस्तांकडे जाऊन, प्रमुखांकडे जाऊन या वस्त्र संहितेचे महत्त्व पटवत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर एकीकडे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणल्याची ओरड केली जात आहे.

मात्र ‘देश तसा वेष’ ही उक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांकडे पर्यटनस्थळ म्हणून न बघता त्यांचे महत्त्व आणि पावित्र्य अबाधित ठेवलेच पाहिजे, यासाठी परिषद आग्रही आहे. कुठल्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा न आणता याचे अनुकरण व्हावे यासाठी मंदिरांनी आग्रही राहावे, असे आवाहन केले जात आहे. शाळा, पोलीस, रुग्णालयांसह अनेक ठिकाणी वस्त्र संहिता लागू आहे, ही स्थळे जशी महत्त्वाची तशीच धार्मिक स्थळे महत्त्वाची असल्याने तेथेही योग्य वस्त्राचा नियम महत्त्वाचा आहे, असे महाराष्ट्र मंदिर न्यास महासंघाडून सांगितले जात आहे.

मंदिरे ही हिंदू धर्माची आधारशीला आहेत. त्यातून मिळणाऱ्या ईश्वरी चैतन्यामुळेच आधुनिक काळातही समाज मंदिरांकडे आकर्षित होतो. त्यामुळे मंदिरांतील पावित्र्याचे रक्षण करणे, हे हिंदू समाजाचे दायित्व आहे. मंदिरातील देवतातत्त्व टिकवण्यासाठी मंदिरांत विधिवत पूजा-अर्चा करणे, प्राचीन मंदिर-संस्कृतीचे संवर्धन करणे, मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यासाठी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. त्यासाठी श्री विघ्नहर गणपती मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपती मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ आणि ३ डिसेंबर २०२३ यादिवशी श्री विघ्नहर सभागृह, ओझर, जिल्हा पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळीही ‘वस्त्र संहिता’ हा मुद्दा पुढे येणार असून त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -