Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजउंदीर निघाला शाळेत!

उंदीर निघाला शाळेत!

कथा: रमेश तांबे

एक होता उंदीर. त्याचे नाव काळू. काळू होता खूप चपळ आणि हुशार! राहायचा तो एका बिळात. रमायचा आपल्या मित्रात. मित्रांची होती टोळी मोठी, एकत्रच शोधायचे धान्याची कोठी! खूप खूप मजा करायचे इकडे तिकडे धावायचे. एकदा काळूच्या आले मनात, जाऊया आपण शाळेत!

काळूने केला विचार, शाळेत जायचे तर कपडे हवेच. मग काळू गेला बाजारात, शिरला एका कपड्यांच्या दुकानात आणि शेठजीला म्हणाला, “शेठजी, शेठजी कापड द्या.” शेठजीला काही कळलेच नाही. पण उंदीर दिसतात शेठजीने मारली हातातली वही फेकून. काळूने ती पकडली अलगद आणि गेला लांब पळून! आता काळूच्या हातात होती एक वही…!

धावता धावता काळू पोहोचला शिंप्याच्या दुकानात. तिथे टांगले होते छोटे छोटे कपडे. काळू म्हणाला, “शिंपी काका शिंपी काका त्यातले एक शर्ट द्या ना मला!” शिंप्याला काही कळलेच नाही. पण उंदीर दिसतात त्याने मारली पट्टी फेकून, काळूने पट्टी पकडली अलगद आणि गेला लांब पळून! आता काळूच्या हातात होती एक वही आणि एक पट्टी…!

पळता पळता काळू आला चौकात, उभा राहिला माणसात. एकाच्या अंगात होते शर्ट आणि धोतर आणि डोक्यावर होती पांढरी टोपी! त्या माणसाला काळू म्हणाला, “ओ बाबा, ओ बाबा तुमचे शर्ट द्या ना मला!” त्या माणसाला काहीच कळले नाही. पण समोरच उंदीर दिसला म्हणून त्याने डोक्यावरची टोपी मारली फेकून! काळूने टोपी पकडली अलगद आणि गेला लांब पळून! आता काळूच्या हातात होती एक वही, एक पट्टी आणि एक टोपी…!

पळता पळता काळू पोहोचला बुटाच्या दुकानात! दुकानातला माणूस पुसत होता बूट, अंगात त्याच्या होता पांढरा सूट. काळू म्हणाला, “काका काका तुमचे शर्ट द्या ना मला!” त्या माणसाला काही कळलेच नाही. पण उंदराला बघताच त्याने हातातला बूट मारला फेकून! काळूने बूट पकडला अलगद आणि गेला लांब पळून! आता काळूच्या हातात होती एक वही, एक पट्टी, एक टोपी आणि एक बूट…!

पळता पळता काळू पोहोचला एका घरात. तिथे एका मुलाचा अभ्यास चालला होता जोरात. काळू म्हणाला, “मुला, मुला; तुझं शाळेचं शर्ट दे ना मला!” मुलाला काही कळलेच नाही. पण उंदीर दिसताच त्यांने हातातला पेन मारला फेकून! काळूने पेन पकडला अलगद आणि गेला पळून! आता काळूच्या हातात होती एक वही, एक पट्टी, एक टोपी, एक बूट आणि एक पेन…!

पळता पळता काळूला एक मुलगी दिसली. मांडीवर होती तिच्या बाहुली. काळू म्हणाला, “ए मुली, ए मुली, तुझ्या बाहुलीचे कपडे दे ना मला!” मुलीला काही कळलेच नाही. पण उंदीर दिसताच घाबरून तिने हातातली बाहुली मारली फेकून!. काळूने बाहुली पकडली अलगद आणि गेला पळून! आता काळूच्या हातात होती एक वही, एक पट्टी, एक टोपी, एक बूट, एक पेन आणि एक बाहुली!

आता काळूने बाहुलीचे कपडे स्वतः घातले, डोक्यावर टोपी आणि एका पायात बूट घातला. कानावर ऐटीत पेन लावला. वही आणि पट्टी हातात घेऊन काळू निघाला शाळेला! काळू पोहोचला शाळेच्या दारात, शिपाई तिथं होता घोरत! दाराच्या फटीतून काळू शिरला अन् वर्गात जाऊन पुढेच बसला! उंदराला बघताच पोरी घाबरल्या, वर्गाच्या बाहेर सगळ्या पळाल्या. मग वर्गातला बाळू गेला लपून छपून. त्याने उंदराला मारली पुस्तके फेकून! काळूने पुस्तके अलगद पकडली आणि गेला लांब पळून…! वही, पट्टी, टोपी, बूट आणि पेन सगळेच आला शाळेत टाकून…!

आता काळूला मिळाली पुस्तके खास! वाचत बसतो तासनतास! त्यातल्याच गोष्टी मित्रांना सांगतो अन् खूप खूप शाबासकी त्यांच्याकडून मिळवतो!
मग काळूला बघून झाली बोंब…
उंदराच्या हाती पुस्तके दोन…!
उंदराच्या हाती पुस्तके दोन…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -