क्राइम: ॲड. रिया करंजकर
स्वातंत्र्य काळानंतर कायद्यामध्ये सतत अनेक बदल होत गेले. तसाच एक बदल म्हणजे आई-वडिलांच्या मालमत्तेमध्ये भावासारखाच बहिणीचाही अधिकार. विवाहित बहिणीचा आपल्या वडिलांच्या मालमत्तेतील अधिकार नाकारला गेलेला होता. पण सुधारित कायद्यानुसार आता समान किंवा वडिलांच्या इच्छेनुसार आपल्या मुलीला मालमत्तेमध्ये हक्क अधिकार मिळत आहेत. काही राज्यांमध्ये दागिने, रक्कम यामध्ये किंवा एखादी प्रॉपर्टी म्हणजेच घर असेल, तर त्यामध्ये बहिणीला अधिकार मिळतो. पण जमीन जर असेल त्यामध्ये बहिणींना अधिकार मिळत नाही, हे फक्त अपवादात्मक राज्यांमध्येच केलेले आहे.
आपल्या आई-वडिलांच्या नंतर भावाला जर एखादी प्रॉपर्टी विकायची असेल किंवा स्वतःच्या नावावर करायची असेल, तर बहिणीची एनओसी लागते. ती नसेल, तर भावाला आपल्या वडिलांची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर किंवा ताब्यात घ्यायला अनेक अडचणी निर्माण होतात. कायद्याचे सुधारित किंवा जुने नियम सर्वांनाच आता परिचयाचे झाले आहेत. यामधूनही काही लोक पळवाटा काढून किंवा आपल्या बहिणींची फसवणूक करून मालमत्ता स्वतः हस्तगत करत आहेत. त्यापेक्षा असं म्हटलं तर योग्य होईल की बहिणींना अंधारात ठेवून सगळे व्यवहार केले जात आहेत.
राजाराम यांना सुषमा व सुभाष अशी दोनच अपत्य होती. राजाराम यांनी दोन्ही मुलं वयात आल्यानंतर त्यांची नातेवाइकांमध्ये लग्नं लावून दिली. सुषमा ही मोठी होती. त्यामुळे तिचं आपल्या भावाच्या अगोदर लग्न झालेलं होतं. तिचा नवरा हा व्यवसायाने टेलर होता आणि त्याचे त्याच्या एरियामध्ये व्यवस्थित असं टेलरिंगचा व्यवसाय चालत होता. त्यामुळे सुषमा आपल्या पतीसोबत महिलांच्या येणाऱ्या साड्यांना फॉल लावणे व ब्लाऊजचे पिनअप किंवा बटण करणे ही छोटी-मोठी कामं करून ती आपल्या नवऱ्याला मदत करत होती व त्यामधूनही ती आपली थोडीफार कमाई करत असे. दोन मुलं होती. भाऊ सुभाष यालाही एक मुलगा होता. दोन्ही मुलांची लग्न केल्यानंतर राजाराम यांचे निधन झालेलं होतं. राजाराम यांची दोन घरं आणि काही गावाला जमीन होती. त्याच्यातील एक घर त्यांच्या पत्नीच्या नावे व दुसरे घर त्यांच्या स्वतःच्या नावे होतं. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी अगोदर निधन झालेलं होतं. पण ती दोन्ही घरं तशी त्यांच्या नावावर होती.
राजाराम गेल्यानंतर सुभाष याने ती बहिणीच्या साह्याने एक बहिणीला व एक स्वतःला नावावर करायचं असं ठरवलं होतं आणि जमिनीचे बहिणीमध्ये वाटप करायचे अशी त्याची इच्छा होती. पण काही कारणास्तव त्या गोष्टी तशाच राहिल्या होत्या आणि अचानक एक दिवस सुभाष याला हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्याचं निधन झालं. ही गोष्ट घरातील लोकांना धक्कादायक अशीच होती कारण तरुण वयामध्ये सुभाष गेलेला होता. सुषमा हिला आई-वडील नव्हते आणि आता भाऊही नाही. तिला माहेरचा असा आधार उरलाच नव्हता. सुभाष याची बायको आणि एक-दोन वर्षांचा मुलगा तेवढेच फक्त तिच्या माहेरचे नातेवाईक होते. सुभाषला जाऊन सहा महिने झाले नाही, तोपर्यंत सुभाषची पत्नी सुनंदा ही आपली नणंद सुषमाकडे आली आणि “प्रॉपर्टीचं काय करायचं?” असं तिने सुषमाला विचारलं. “कारण अगोदरच ही प्रॉपर्टी सासू-सासऱ्यांच्या नावावर आहे आणि ती सुभाष व तुमच्या नावावर होतात. सुभाष गेला, त्यामुळे आता त्याचं योग्य ते हस्तांतर केलं पाहिजे, त्यामुळे तुमच्या काही कागदपत्रावर सह्या हव्या आहेत”, असं सुनंदा हिने आपली नणंद सुषमाला सांगितलं.
सुषमाने विचार केला की, आपल्या आई-वडिलांनंतर व भावानंतर भावजयला कुठलीही अडचण नको म्हणून तिने आपल्या भावजयीने आणलेल्या काही कागदपत्रांवर सही केली. आपलं व्यवस्थित चाललेले आहे. आपली मुलं आता मोठी झालेली आहे आणि आपल्या पतीचाही टेलरिंगचा व्यवसाय व्यवस्थित आहे, असा विचार सुषमाने केला आणि आपल्या भावाचा मुलगा खूपच लहान आहे. हा विचार करून तिने दोन रूमपैकी एक रूम आपल्या स्वतःच्या वहिनीच्या नावावर व्हावी यासाठी सही दिली.
या सर्व गोष्टी होऊन गेल्यानंतर दोन महिने होत नाहीत, तोपर्यंत सुनंदा हिने दुसरे लग्न केल्याचे सुषमा हिच्या कानावर आले. याचा जाब विचारण्यासाठी ती आपली भावजय सुनंदा हिच्याकडे गेली असता, खरोखरच तिच्या भावजयने दुसरं लग्न केलेलं होतं आणि एवढंच नाही तर तिने जे सुषमाच्या हिश्श्यात येणारं घर होतं, तेही घर आपल्या नावावर करून घेतलेलं होतं. सुषमा हिने फक्त एकच घर तिच्या नावावर व्हावं म्हणून सही दिलेली होत, तर त्या कागदपत्रांसोबत तिने दुसऱ्याही घराचे कागदपत्रं जोडले होते. एवढेच नाही तर तिने पूर्ण जमीनही आपल्या नावावर करून घेतलेली होती. तसेच त्या दोन घरांपैकी एक घर स्वतःच्या नावावर आणि एक घर ज्या माणसाशी तिने दुसरे लग्न केलेलं होतं, त्याच्या नावावर केलेले होतं. या गोष्टी सुनंदा हिने एवढ्या लवकर केल्या की त्याची खबर सुषमाला मिळाली नाही.
सुषमाने आपल्या आई-वडिलांच्या व भावाच्या प्रेमाखातर व लहान भाच्यासाठी एक रूम सुनंदाला मिळावा म्हणून सही केली होती. पण त्याच्या बदल्यात सुनंदाने सुषमाच्या आयुष्यातलाही रूम बळकवला होता. एवढेच नाही तर गावची जमीनही स्वतःच्या नावावर तिने करून घेतली होती. सुषमा हिने विचार केला होता की, आपला तरुण भाऊ गेलेला आहे. त्याच्या बायकोचं पुढील आयुष्य व्यवस्थित व्हावं आणि त्याचा मुलगा स्वतःच्या हक्काच्या घरात राहावा, या विचाराने तिने सह्या केलेल्या होत्या. पण तिच्या भावजयने म्हणजे सुनंदाने तिला फसवून तिच्या सह्या घेऊन प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून दुसरेही लग्न करून मोकळी झाली होती. सुषमा हिने भावनेपोटी येऊन सह्या केलेल्या होत्या. पण तिचीच फसवणूक झालेली होती. एका सहीमुळे तिच्या हातातल्या सगळ्या गोष्टी निसटून गेलेल्या होत्या.
आता न्यायालयीन लढाई लढताना वेळ आणि पैसा खर्च होणार याची जाणीव सुषमाला आहे. तरी पण ती माझ्या भावजयीने प्रॉपर्टी घेतली त्याच्याबद्दल काही हरकत नाही. पण तिने न सांगता दुसरे लग्न केले, याचे दुःख सुषमाला आहे आणि आपल्या भावजयीने आपल्याला फसवलं आहे, आपल्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून ती न्यायालयीन लढाई लढत आहे. (सत्यघटनेवर आधारित)