Friday, October 17, 2025
Happy Diwali

पंतप्रधान मोदी उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पंतप्रधान करणार अनावरण

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात कोकण दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी ४.१५ च्या सुमारास सिंधुदूर्ग इथे ते पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग येथे 'नौदल दिन २०२३' कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील. यावेळी ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर देखील जातील. त्याचप्रमाणे तिथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार आहेत. यानिमित्ताने ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्गातील पर्यटन देखील पूर्णपणे बंद राहणार आहे. दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. मालवण येथे नौदल दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी सर्व पातळीवर सुधारणा करण्यात आल्या आहे. स्वच्छता, सुभोभिकरण यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे देखील उपस्थित राहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ डिसेंबर रोजी अंदाजे दुपारी ३ वाजता गोव्यातील मोपा विमानतळावर उतरतील. त्यानंतर ते राजकोट किल्ल्याकडे रवाना होतील. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ते अनावरण करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत. तिथे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली इथं नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना हजर राहतील. याठिकाणी पंतप्रधान मोदी हे जनतेला संबोधित करतील. प्रात्यक्षिक सुरू झाल्यानंतर काही वेळ थांबून ते पुन्हा एकदा गोवा विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होतील. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment