प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
प्रत्येक माणसाची दुसऱ्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते; परंतु माझ्या बाबतीत मला सांगायला आवडेल की, मला माणूस भेटला की मी त्या माणसातले गुण शोधू लागते. प्रत्येकात अनेक गुण सामावलेले आहेत, हे लक्षात येते. अशी नामवंत, कीर्तिवंत माणसे समाजात खूप आहेत. आपल्या ओळखीची तर असतात. पण अगदी सहज ट्रेन, बसमध्ये भेटलेली माणसे जी काही क्षणांसाठी आपल्यासोबत असतात त्यांच्यातलेही गुण छोट्याशा संवादातून लक्षात येतात. त्यांच्याकडूनही खूप काही शिकता येते.
आयुष्यात अनेकांशी संवाद साधण्याची मला संधी लाभली. कधी त्यांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यांच्या कलेविषयी, कार्याविषयी, एकंदरीतच जगण्याविषयी जाणून घेताना, असामान्य माणसाचे, सामान्य माणसांसारखे जगणे जवळून अनुभवले. या संवादानंतर अनेकांशी व्यक्तिगत संबंध दृढ इााले. या माणसांचे कष्ट, तप, साधना, दुःख, आनंद, चुकांची प्रांजळ कबुली, चौफेर नजर, वेगळेपणा यामुळे कोणत्याही साहित्याकडे, कलेकडे पाहण्याची नवी दृष्टी मला लाभली, तर कधी माझ्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ झाल्या. कोणत्याही माणसाचे आयुष्य कधीच पूर्णपणे कागदावर उतरवणे शक्य नाही, याची जाणीव आहेच. त्यामुळे कोणत्याही दिग्गजांचे मुलाखतीद्वारे केलेले व्यक्तिचित्रण अपूर्ण आहे, असेच वाटत
राहिले आहे.
साधारण १५ वर्षांपूर्वी मी नव्याने लिहू लागले होते. केवळ काव्यस्पर्धत भाग घेत होते. मात्र एका व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ‘योग’ या विषयावर तरुणांना मार्गदर्शन करत होते. त्यातील एका विद्यार्थ्याने माझ्या भाषणातील काही भाग मला लिहून देण्यास सांगितला. तो एका प्रसिद्ध या वर्तमानपत्रात छापून आणला. तो लेख वाचून एका व्यक्तीने माझा दूरध्वनी क्रमांक मिळवला. एका दिवाळी अंकासाठी मी ‘शं. ना. नवरे’ या साहित्यिकाची मुलाखत घ्यावी, अशी विनंती केली. गंमत अशी की, आम्ही दोघे एकमेकांना अजिबात ओळखत नव्हतो. मी त्यांना ‘मलाच फोन करण्याचे प्रयोजन काय?’ असे विचारल्यावर त्यांनी मला, ‘माझा वर्तमानपत्रामधला लेख आवडला आणि तो वाचून मी शन्नांची मुलाखत घ्यावी असे वाटले, कारण २-३ वर्षे शन्नांनी त्यांना मुलाखात देण्यास नकार दिला होता, असे सांगितले.
एक सुसंधी समजून मी होकार दिला. शन्नांना फोन केला, तर ते म्हणाले, “माझ्याविषयी असं काहीच नाही, जे आतापर्यंत छापून आलं नाही.” खरं तर विषय इथेच संपला होता. पण त्यांनीच आपुलकीने विचारले, “नाव काय? कुठे राहता? काय करता? कोणता दिवाळी अंक… मी उत्तरे देत असताना मध्येच थांबवत म्हणाले, “तुम्ही नोकरी करता ना, म्हणजे बहुधा रविवारी मुलाखत घ्यायला भेटणार असाल, तर रविवारी मी घराबाहेर पडत नाही.”
केवळ मुलाखत टाळण्यासाठी ते हे म्हणाले असतील किंवा सहज पटण्यासारखे हे सबळ कारण आहे असे त्यांना वाटले असेल; परंतु त्यावर मी तत्परतेने उत्तरले, “सर… रविवारी तुम्ही प्रत्येक मराठी माणसाच्या घरात तर जाताच पण मनामनांतही जाता!” हे उत्तर मला कसे सुचले याचे आजही मला आश्चर्य वाटते. माझ्या उत्तराने ते अवाक् झाले आणि मुलाखत द्यायला तयारही झाले. त्या माझ्या उत्तराचे पार्श्वभूमी अशी की, त्या काळात एका वर्तमानपत्रात त्यांचे ‘ओलीसुकी’ नावाचे सदर रविवार पुरवणीत चालू होते. असो.
त्या दिवाळी अंकाचे नाव : लीलाई आणि त्या संपादकाचे नाव : अनिलराज रोकडे. या दिवाळी अंकात दोन मुलाखती होत्या. एक मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुलाखतकार : प्रदीप भिडे; दुसरी माननीय शं. ना. नवरे, मुलाखतकार : प्रतिभा सराफ. ही गोष्ट मला खूप आनंद देऊन गेली. गंमत म्हणजे या मुलाखतीसाठी मी रोकडेंच्या फोननंतर शन्नांना ४-५ दिवसांत भेटले, तर रोकडेंना ४-५ वर्षानंतर!
प्रत्येक मुलाखतीची एक वेगळीच कथा आहे. प्रत्येक मुलाखतीचा प्रकारही वेगळा आहे. त्यांची शब्दसंख्या कमी-जास्त आहे. कारण ज्या मासिकांच्या, दिवाळी अंकाच्या, वर्तमानपत्राच्या संपादकांनी, ज्या विषयावर मुलाखत घ्यायला सांगितली आणि जितकी शब्दमर्यादा घालून दिली, ती पाळावी लागलेली आहे. आता या मुलाखती वाचताना जाणवते. त्या मुलाखतीनंतरचीही एक गंमत आहे. ती अशी की, पुढच्या त्यांच्या ‘ओलीसुकी’ या सदरातील लेखात त्यांनी मुलाखत घेणारीचे जे वर्णन केले होते ज्यात शारीरिक हावभाव, स्वभाव, मुलाखत घेण्याची पद्धत यावरचाच लेख होता. माझे नाव जरी त्या लेखात अधोरेखित केलेले नव्हते तरी माझ्याबद्दलचे वेगळ्या कोनातून त्यांनी जे निरीक्षण केले होते, त्याची खूप गंमत वाटली आणि एक परिपाठ मिळाला की कोणताही प्रसंग असो त्यातून लेखक म्हणून आपल्याला काहीतरी टिपता आले पाहिजे, समृद्ध होता आले पाहिजे!
[email protected]