ओळखीची लोकं, अनोळखी क्षेत्र!

Share

असं म्हटलं जातं की, यश हेच यशाचं उगमस्थान असतं. व्यक्ती एखाद्या क्षेत्रात प्रचंड यशस्वी झाली की, बाकी सर्व क्षेत्रांतलं यश तिच्यामागे धावत येत असतं. जणू काही ती क्षेत्रे यशस्वी व्यक्तीला सांगत असतात, ‘अरे बाबा आम्ही पण आहोत बरं का! आम्हालाही तुझ्या यशासोबत जोडून घे ना!’ बिचारी यशस्वी व्यक्ती करणार तरी काय! ही व्यक्ती तेच करते, जे आधीच्या यशवंतांनी केलं आहे ते! म्हणजे अजून एका नव्या क्षेत्रात यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न! यशस्वी होता आलं तर उत्तमच, नाही तर आपण अमुक एका क्षेत्रात यशस्वी आहोतच; असा विचार ती व्यक्ती करत असते! अशी अनेक उदाहरणे सांगता येतील की, ज्यांनी आपल्या क्षेत्राशिवायही इतर ठिकाणी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातली काही नावं तुम्हालाही आठवत असतील. या ठिकाणी मूळ क्षेत्र वेगळं असलेल्या, पण इतर क्षेत्रात या कलावंतांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेतलेला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सलामीचा तंत्रशुद्ध फलंदाज ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्कर ऊर्फ सनी. सनीभाईंनी भारतीय क्रिकेटसाठी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. क्रिकेट खेळाच्या इतिहासात त्यांचं नाव कायमचं कोरलं गेलं आहे, एवढी देदीप्यमान कामगिरी त्यांनी करून ठेवली आहे. त्यांचे अनेक विक्रम बरेच वर्षे अबाधित होते. नंतर सचिन तेंडुलकरने त्यांच्या काही विक्रमांशी बरोबरी केली, तर काही विक्रम तोडून सचिनने ते स्वत:च्या नावावर केले आहेत. सुनील आणि सचिन दोघेही मराठी. त्यातही मुंबईकर. त्यामुळे त्यांचे विक्रम तोडल्यावर सुनील गावस्करांनी सचिनचं नेहमीच कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिलं आहे. पण सनी यांचा (क्रिकेट विश्वाबाहेरचा) एक विक्रम मात्र सचिनने तोडलेला नाहीये. सुनील गावस्करांच्या त्याच विक्रमाची (?) माहिती जाणून घेऊ या… सुमारे ४४ वर्षांपूर्वी म्हणजे १९७९ मध्ये कोलकाता इथल्या ‘इंडियन रेकॉर्ड manufacturing company’ ने एक ध्वनिमुद्रिका (Long Play Record) काढली होती. या ध्वनिमुद्रिकेचं नाव होतं – ‘जीवन म्हणजे क्रिकेट.’ याच्या एका बाजूला सुनील गावस्कर यांच्या आवाजात स्वरबद्ध केलेली दोन गाणी आहेत. पहिल्या गाण्याचे शब्द आहेत – “या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला”. दुसऱ्या गाण्याचे बोल आहेत – “मित्रा, तुला हे जग आहे फुलवायचे, जीवनाच्या क्रीडांगणी स्वैर तू रे खेळायचे.” ही गाणी मराठीतले प्रख्यात गीतकार आणि कवी शांताराम नांदगावकर यांच्या लेखणीतून उतरली आहेत.

ध्वनिमुद्रिकेच्या दुसऱ्या बाजूला सुनील गावस्करांचे मित्र आणि समकालीन मुंबईकर क्रिकेटपटू पद्माकर काशिनाथ शिवलकर यांनी गायलेली दोन गाणी आहेत. या ठिकाणी मुद्दाम नमूद करायला हवं की, शिवलकर त्या काळातले उत्कृष्ट आणि अत्यंत प्रतिभावंत डावखुरे फिरकी गोलंदाज होते. पण त्यांचं दुर्दैव असं की, त्यांना भारतीय क्रिकेट संघातून खेळण्याची संधी कधी मिळाली नाही! मुंबईकडून आणि पश्चिम विभागाकडून जवळपास सव्वाशे प्रथम श्रेणी सामने खेळून त्यांनी तब्बल ५८९ बळी घेतले आहेत. शिवलकर यांच्याप्रमाणेच राजेंद्र गोयल नामक फिरकीपटूलाही भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे कधीच उघडले नाहीत. याचं कारण म्हणजे त्यावेळी उत्कृष्ट डावखुरे गोलंदाज बिशनसिंह बेदी भारतीय संघात होते. दस्तुरखुद्द बेदीदेखील या वास्तवतेशी सहमत होते.

शिवलकर यांनी गायलेली दोन गाणी पुढीलप्रमाणे. पहिलं गाणं – “कशासाठी वेड्या काळजी उद्याची, काळ चालला रे तमा ना कुणाची”. जीवनाचं सत्य गीतकार शांताराम नांदगावकरांनी समर्पक शब्दांत चितारलं आहे. काळ कोणाचीही कसलीही तमा न बाळगता, कोणतीही फिकीर न करता पुढे चालेला आहे. दुसरं गाणंदेखील अर्थपूर्ण असून जणू काय त्यांचीच व्यथा शिवलकर यांनी गाऊन सांगितली आहे, असं वाटतं! या गाण्याचे शब्द पुढीलप्रमाणे – “हा चेंडू दैवगतीचा फिरतसे असा उसळून, कोणाचं जीवन उधळी… दे कुणास उजळून.” ही गाणी संगीतकार जोडी गौतम-गिरीष यांनी सुरेल चालीत बांधली आहेत. नंतर ही जोडी कुठे अदृश्य झाली याची माहिती नाही.

पद्माकर शिवलकर यांनी गायलेली गाणी गावस्करांच्या गाण्यांपेक्षा सरस आहेत. शिवलकर यांना छान गळा लाभला असल्याचं जाणवतं. शिवाय त्यांना सुरांचीही जाण असल्याचं दिसून येतं. गावस्करांचा आवाज गाण्यासाठी जराही अनुकूल नसल्याचं स्पष्टपणे जाणवतं. ही गाणी बेसुरी वाटतात. सुनील गावस्करांच्या या गायन कामगिरी(?)वर ज्येष्ठ क्रिकेट आणि सिनेपत्रकार शिरीष कणेकर यांनी सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, गावस्कर मॉडेलिंग करतात, इथंपर्यंत ठीक आहे. पण ‘तू गाऊ नकोस रे माझ्या राजा!’ अशा शब्दांत कणेकरांनी त्यांच्या गाण्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सुनील गावस्करांचे समकालीन क्रिकेटपटू संदीप पाटील आणि सय्यद किरमाणी यांनी हिंदी चित्रपट दुनियेत अभिनेता म्हणून नशीब आजमावून पाहिलं, पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या दोघांनी ‘कभी अजनबी थे’ या चित्रपटातून हिंदी सिनेविश्वात पदार्पण केलं. संदीप पाटील नायकाच्या भूमिकेत, तर किरमाणी सहाय्यक कलावंताच्या भूमिकेत झळकले. हा चित्रपट दिनांक १ मार्च १९८५ रोजी प्रदर्शित झाला होता. ही एक संगीतमय प्रेमकहाणी होती. पण प्रेक्षकांच्या पसंतीस मात्र उतरली नाही. गाणी अर्थातच श्रवणीय होती. यात तेव्हाची आघाडीची नटी पूनम धिल्लो आणि बंगाली अभिनेत्री देवश्री रॉय या नायिकेच्या भूमिकेत होत्या. यानंतर पाटील आणि किरमाणी यांनी अभिनय केल्याचं आढळत नाही.

अभिनेत्री शबाना आझमी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठी, अभिनयासाठी आणि सामाजिक कार्य नि भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अभिनयाशिवाय अजून एका क्षेत्रात काम केलंय. ते म्हणजे पार्श्वगायन. गमन, उमराव जान, झूनी फेम दिग्दर्शक मुझफ्फर अली यांचा ‘अंजुमन’ हा चित्रपट १९८६ मध्ये आला होता. यात शबानासोबत फारुख शेख, रोहिणी हट्टंगडी यांच्या मुख्य भूमिका होत्या. उर्दूतले श्रेष्ठ शायर शहरयार यांच्या शब्दांना संगीतकार खय्याम यांनी यातल्या गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. मैं राह कब से नई जिंदगी की तकती हूं/हर इक कदम पे, हर इक मोड पे सम्भलती हूं…, तुझसे होती भी तो क्या शिकायत मुझको/तेरे मिलने से मिली दर्द की दौलत मुझको…, ऐसा नही की किसको नही जानते हो तुम/आंखो मे मेरी खाव्ब की सूरत बसे हो तुम …, गुलाब जिस्म का यू ही नही खिला होगा/हवा ने पहले तुझे फिर मुझे छुआ होगा… (सोबत भूपेंद्रसिंह) ही गाणी शबाना आझमी यांनी गायली आहेत. उच्च दर्जाची शायरी, त्याला साजेसं दर्जेदार संगीत यामुळे ही गाणी खूप खास बनली आहेत. विशेष म्हणजे शबाना यांचा आवाजदेखील खूप छान आहे. ही गाणी ऐकून असं वाटतं की, त्यांनी अजून पार्श्वगायन करायला हवं होतं! याच सिनेमात दस्तुरखुद्द संगीतकार खय्याम यांनी आपली पत्नी गायिका जगजीतकौर समवेत ‘कब याद मे तेरा साथ नहीं/कब हाथ मे तेरा हाथ नहीं…’ ही गझल गायली आहे. यानिमित्ताने गायक खय्याम ही नवी ओळख श्रोत्यांना त्यांनी करून दिलीय.

हिंदी चित्रपटसृष्टीत १९५८ ते २००२ अशी प्रदीर्घ खेळी करणारे लोकप्रिय गीतकार म्हणजे आनंद बक्षी. यांनाही गायनाची आवड होती. त्यांना ‘मोम की गुडिया’ (१९७२) या चित्रपटात पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली. ‘बागो मे बहार आई, होठों पे पुकार आई…’ हे गाणं त्यांनी लता मंगेशकरसमवेत गायलं. तसेच ‘मै ढूंढ रहा था सपनो में…’ हे सोलो गीतही गायलं. जी. पी. सिप्पी यांच्या गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटातही त्यांनी ‘चांदसा कोई चेहरा’ ही कव्वाली मन्ना डे, किशोरकुमार व भूपेंद्रसिंह यांच्यासोबत गायली. हे गाणं मात्र चित्रपटात नसल्यामुळे श्रोत्यांपर्यंत पोहोचलं नाही.

पंजाबी सिनेमाचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे छायाचित्रकार म्हणजे मनमोहनसिंह. त्यांनीही काही चित्रपटगीतं गायली आहेत. गीतो से सरगम कलियो शबनम दूर रहे तो दूर रहे …, साथ जियेंगे साथ मरेंगे हम तुम दोनों… (लता/लैला/१९८४), जिने दे ये दुनिया चाहे मार डाले लोग हम निराले प्यार करनेवाले… (आशा भोसले/लावा/१९८५), मेरे प्यार की उमर हो इतनी सनम तेरे नाम से शुरू नाम पे खतम… (लता/वारीस/१९८८) ही मनमोहनसिंह यांनी गायलेली गाणी बऱ्यापैकी लोकप्रिय झाली होती.

याशिवाय अनेक अभिनेते, अभिनेत्री आणि संगीतकार यांनीही पार्श्वगायन केलेलं आहे. ही परंपरा थेट कुंदनलाल सैगल, दादामुनी अशोककुमारपासून ते रणवीरसिंह आणि अभिनेत्री नूतन-रेखा-श्रीदेवी ते परिणीती चोप्रा-आलिया भटपर्यंत सांगता येते. तसेच अमिताभ-अनिल कपूर-गोविंदा-आमीर खान-सलमान खान-संजय दत्त (मराठीत दादा कोंडके-अरुण सरनाईक-सचिन पिळगावकर-दिलीप प्रभावळकर-अशोक सराफ-डॉ. श्रीराम लागू) अशा अनेकांनी प्रसंगानुरूप पार्श्वगायन केलं आहे. ४०-५०च्या दशकांत बहुतेक नट-नट्या पार्श्वगायनही करायचे. उदा. कुंदनलाल सैगल-सी. एच.आत्मा-नूरजहाँ-सुरैय्या-गीता दत्त-किशोरकुमार. निर्माता-दिग्दर्शक मनोजकुमार, सावनकुमार आणि प्रकाश मेहरा यांनी आपल्या स्वत:च्या चित्रपटांसाठी गाणीही लिहिली आहेत. संगीतकारांमध्ये तर अशी अनेक उदाहरणे दिसून येतात. पंकज मलिक- हुस्नलाल व भगतराम- सी. रामचंद्र- सचिनदेव बर्मन- हेमंतकुमार- मदन मोहन – राहुलदेव बर्मन- बप्पी लाहिरी- उषा खन्ना- अन्नू मलिक – ए. आर. रेहमान – विशाल दादलानी (मराठीमध्ये राम कदम- विठ्ठल शिंदे- अजय गोगावले- अशोक पत्की- सुधीर व श्रीधर फडके- हृदयनाथ मंगेशकर- अच्युत ठाकूर) अशा अनेक संगीत दिग्दर्शकांनी चित्रपटांत गाणी गायलेली आहेत. यातल्या काही कलावंतावर स्वतंत्रपणे लिहिता येईल, इतकं त्यांचं काम आहे. सध्याच्या काळात गीतकार स्वानंद किरकिरे हेदेखील अधून-मधून पार्श्वगायन करतात.

थोडक्यात काय तर एका ठरावीक क्षेत्रातल्या कलाकारांनी कधी मिळत्या-जुळत्या, तर कशी सर्वस्वी भिन्न क्षेत्रांत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. यात सर्वच कलावंत यशस्वी झाले नसले तरी त्यांची कामगिरी दखलपात्र नक्कीच आहे, असं म्हणायला हरकत नाही! (लेखक चित्रपट, संगीताचे अभ्यासक आहेत.)

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

5 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

5 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

6 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

7 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

8 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 hours ago