Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजभू-माता अन्तं मा पश्यतु...

भू-माता अन्तं मा पश्यतु…

निसर्गवेद: डॉ. महालक्ष्मी वानखेडक

“माता भूमी: पुत्रो अहं पृथ्वीव्या:
पर्जन्य: पिता स उ न: पिपर्तु॥”
म्हणजेच भूमी माता आहे. आम्ही सर्व तिचे पुत्र आहोत. मेघ आपला पिता आहे. विपर्तु म्हणजेच पालन. हे माता-पिता मिळून आपले पालन करतात. अथर्ववेदात या भूमीचे असे वर्णन आहे. सृजनशील व्यक्तींनी (ज्ञानी, ऋषीमुनी, भूमिपूजक) भूमीचे पूजन करण्यासाठी यज्ञ करावा म्हणजे त्याद्वारे भूमी आणि मेघ पावसाच्या रूपात येऊन आपले पालन करतील. थोडक्यात काय तर भारतीय पुराणग्रंथ, वेद, पौराणिक कथा सर्वांत या धरती मातेचे संरक्षण व संवर्धन हे या प्रकृतीचे पूजन करूनच होईल. परमेश्वराच्या प्रत्येक स्वरूपाच्या पूजनात ही निसर्गाची पूजा असते.

“समुद्रवसने देवी, पर्वत-स्तन-मंडीते
विष्णुपत्नी नमोस्तुभ्यं पाद-स्पर्श क्षमश्वमेव्॥”
समुद्र वस्त्र धारण करणाऱ्या पर्वतरूपी स्तन असणाऱ्या आणि श्री विष्णूची पत्नी म्हणजेच पृथ्वीमाता तुला माझा पदस्पर्श होणार आहे तरी मला क्षमा करावी. माता समान या भूमीवर पदस्पर्श केल्याची क्षमा मागणारा हा मंत्र. आपल्या ग्रंथपुराणानुसार अनेक मंत्र या भूमी मातेसाठी अर्पण आहेत. आज आपण या भूमातेवरील एक घटक पर्वत याबद्दल समजून घेऊया.

पर्वत म्हणजे निसर्ग+पंचतत्त्वाची सजीव सृष्टीसाठी असलेली रचना. या पृथ्वीला या धरतीला या भूमीला माता आणि पर्वतांना स्तन का म्हटले हे समजून घ्या. माता आपल्या मुलाला परिपूर्ण आहार तिच्या दुधातूनच देत असते. ही धरती माता सुद्धा आपल्याला परिपूर्ण आहार या पर्वतांमधूनच देत असते. आपल्या बाळासाठी मातेचा अमृततुल्य दुग्ध आहार हा संजीवनीसारखा असतो. तसेच धरती मातेचे हे पर्वत सर्व जीवसृष्टीला परिपूर्ण करण्यासाठी संजीवनीच आहे. या पर्वतीय प्रदेशांची रचना एका ऊर्जात्मक परिपूर्णतेची आहे. यांची उंची, चढ-उतार, मैदानी प्रदेश, मृदेचे विविध प्रकार-गाळाची मृदा, तांबडी-काळी मृदा, दलदलीची पीट मृदा, खडकाळ मृदा, निक्षेप मृदा, धोंडे+ माती+हिममिश्रीय जलोढीय मृदा, अपरिपक्व मृदा, आयुर्वेदिक वनस्पती मिश्रित मृदा अशा सर्व प्रकारच्या वातावरणामुळे निर्मित झालेल्या अनेक मृदांचे प्रकार, वैविध्यपूर्ण आयुर्वेदिक संजीवनी वनोच्छादन यामुळे झालेली खनिज निर्मिती. अशा सर्व परिपूर्ण सुदृढतेचे म्हणजेच हे संजीवनी पर्वत.

ऑक्सिजनपासून ते औषधांपर्यंत सर्व काही औक्षवंत होण्यासाठी आशीर्वादाच्या रूपात मिळालेली एक रचना म्हणजे हे पर्वत. महाभारतातील वर्णनानुसार अरावली, हिमालय, कृष्णगिरी, धौलगिरी, सह्याद्री, विंध्याचल, गिरनार, शिवराय, पालनी, शिवालिंग, हिंदकुश अशा अनेक पर्वत शृंखला भारतात आहेत. तरीही सर्वात पुराण पर्वत शृंखला कोणती हे मात्र निश्चित नाही. पण गुजरात ते दिल्लीपर्यंत ६९२ किमीपर्यंतची अरावली पर्वत शृंखला ही प्राचीन असावी. असं म्हणतात की, श्रीकृष्णाने वैकुंठ नगरी येथेच वसवली होती. प्राकृतिक संपत्तीने परिपूर्ण असे हे पर्वत. पौराणिक मान्यतेनुसार जगातील सर्वात पुरातन असा मेरू पर्वत. ज्याला ‘सुमेरू’ म्हणूनही ओळखतात. हा पृथ्वीच्या मध्यावर म्हणजेच जम्बू बेटावर आहे जो कझाकिस्तान, रुस, मंगोलिया, चीन येथपर्यंत पसरलेला आहे आणि या स्थानाला इलावृत्त असे म्हणतात. (कैलास पर्वत) हिंदुस्तान, चीन, जावा, सुमात्रा, बांगलादेश, नेपाळ, इराक, इस्त्राईल, पाकिस्तान, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया हे सर्व क्षेत्र जम्बुद्वीप होते.

परमेश्वरी शक्तीने जीवसृष्टीतील प्रत्येक जीवासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा निसर्गनियमानुसारच मुळातच अगदी योग्य पद्धतीने दिलेल्या आहेत. पण आपण मानव दिशाहीन होऊन आपल्या गरजा विरुद्ध पद्धतीने नेत आहोत आणि त्याचे परिणाम आपण स्वतःवरच नाही, तर या सर्व जीवसृष्टीवर करत आहोत. या पृथ्वीवर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक जीवाला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आणि पंचतत्त्वाचे महत्त्व या धरती मातेला हानिकारक होणार नाही, असे सर्व शोध मुळातच आपल्या ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये लिहिले गेलेले आहेत. भारतीय संस्कृतीत न बसणाऱ्या आणि मुळात सर्व भारतीय संस्कृतीत असणाऱ्या प्रगती प्रकल्पांचा कोणताही विचार न करता, आपण न्यू टेक्नॉलॉजी आणि जागतिक प्रगती प्रकल्प यांच्या नावाखाली अक्षरशः पर्यावरणाचा विध्वंस करीत सुटलो आहोत.

सर्वच धर्मांची आपापली आस्था असते. त्याचप्रमाणे हिंदू धर्माचे महत्त्व हे पूर्वाकाळपासून प्रखरच आहे. ज्या जागेत नकारात्मकता आहे, तेथे वास्तुशास्त्र नियमानुसारच स्थान ठरवून त्या स्थानावर मंदिर बांधून पूजा होत असे. आध्यात्मिकदृष्ट्या मंदिराचे दर्शन घेतल्यामुळे आत्मविश्वास वाढून शांतपणे प्रवास होत असे शास्त्रीयदृष्ट्या जर रस्ते प्रवासायोग्य नसतील, तरी शांत मन असल्यामुळे अपघात होत नसत. प्रत्येक गावाची ग्रामदेवता असे, त्या ग्रामदेवतेची रोज पूजा होत असे. त्यामुळे तिथे सकारात्मकतेचे प्रमाण हे उच्च पातळीवर जात असे; परंतु नंतरच्या काळामध्ये प्रगतीची शिंग फुटलेल्या काही मोजक्या समाजकंटकांनी ही मंदिर पाडावयास सुरुवात केली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्या जागेचा उपयोग करून तिकडची सकारात्मकता नष्ट केली. परिणामी त्यांच्यामुळे त्या गोष्टीचा सर्वांनाच कळत-नकळत त्रास व्हायला लागला; परंतु समाजकंटकांनी अंधश्रद्धेचे स्वरूप त्यास दिले. आपण आपल्या स्वार्थासाठी पर्वत, डोंगर फोडत आहोत.

पर्वतांवर काही दगडी आकारांवर मातीचे आवरण येऊन त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती उगवलेल्या आहेत. ज्यातून येणारा आयुर्वेदिक वनस्पतींचा साठा खतांच्या स्वरूपात हा त्या पर्वतांना मजबूत करत असतो. त्यातून आतपर्यंत झिरपणाऱ्या जलाचा सुद्धा साठा होत असतो, जो पर्वतांवर उगवणाऱ्या वनस्पतींना उन्हाळ्यामध्ये थंडावा देतो आणि पूरक आहारही देतो. म्हणून येथे खनिज निर्मितीसुद्धा नैसर्गिकरीत्या होत असते. एकंदरीत काय तर नैसर्गिक संपत्तीचा ठेवा
म्हणजे हे पर्वत.

या पर्वतांवर अनेक जीवजंतू पूरक आहारामुळे राहतात आणि कुठेही हानी न पोहोचवता पूरक संतुलन करण्यासाठी कार्यरत असतात. गर्द जंगलातील उंच झाडे ही पालकांची भूमिका बजावत असतात. पण गर्द जंगलात सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचेलच असं नाही, त्यामुळे छोट्या-छोट्या रोपट्यांना मार्ग काढून प्रकाशाच्या दिशेने वाढावे लागते आणि तरच ती जगतात. आपलेसुद्धा आयुष्यात असेच आहे. आपल्याला यशाच्या प्रकाशाच्या दिशेने जर जायचे असेल, तर अंधाररूपी संकटांवर मात करून पुढे जावेच लागते. प्रत्येक झाडाला, पानांना, फुलांना आपली भाषा ही समजत असते, फक्त आपल्याला त्यांची भाषा समजत नाही. किंबहुना आपण समजून घेतच नाही. त्यांना सुद्धा संगीत आणि शांतता आवडते. त्याप्रमाणे ते प्रतिक्रिया सुद्धा देतात आणि हे संशोधनाअंतर्गत सिद्ध झालेले आहे. याचा अनुभव मी स्वतः खूप घेतला आहे.

ही सर्व वृक्षवल्ली खूप हळवी आहे. प्रत्येक पालवी ही हळवी आहे. मुळात सद्गुणी असणाऱ्या सर्व जीवसृष्टीचे आपल्या दुर्गुणांच्या वर्चस्वांनी कुठेतरी त्राण जात आहेत. परिणामी ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सर्व जीवसृष्टीसाठी ऊर्जावान सकारात्मकतेच्या आणि संजीवनीचा खजाना असणाऱ्या या पर्वतांना वेळीच मानवाने अंतर्मनाने समजून अगदी हळुवारपणे हाताळलेच पाहिजे. जर पृथ्वीवरील कोणत्याही रचनेला मानवाने धक्का पोहोचवला, तर ही सर्व पंचतत्त्वे कमकुवत होतील आणि त्यामुळे सर्व सृष्टीचे संतुलन पूर्णपणे बिघडेल. निसर्ग जरी परमेश्वराने बनवलेला असला तरी आपण केलेल्या कृतीमुळे निसर्गाचा कोप होतो. या धरती मातेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याऐवजी आपण प्रमाणाच्या बाहेर जाऊन या भूमातेचा छळ करीत आहोत. तेव्हा तो निसर्गाचा कोप नसून आपण निसर्गात ढवळाढवळ केल्याचा परिणाम आहे. तरीही परमेश्वर आपल्याला संधी देतोय. आपलं संरक्षण करतोय. पण… ज्या दिवशी परमेश्वराचा कोप होईल तेव्हा… तेव्हा ही पृथ्वी, ही भूमाता कोणीही वाचवू शकणार नाही. या भूमातेच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यामुळे आपल्या कर्माच्या भोगाप्रमाणे आपल्याला नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते आणि मग मानव ग्लोबल वॉर्मिंगचा काळिमा या पृथ्वी मातेला लावतो. तिच्यावर अनेक आरोप करतो. पण ही भूमाता तिच्या गुणधर्माप्रमाणे जसं देते तसं घेते.

आपण या मातेसाठी काय करतो? तिची घुसमट? जिच्यामुळे आपल्याला श्वास घेता येतो, तिचाच आपण आपल्या कर्मामुळे जीव घुसमटवतोय. तिचे सर्व अवयव निकामी करतोय. वृक्षतोड, पर्वत फोडणे, प्लास्टिकचा कचरा तिच्याजवळ जमा करणे, तिच्या नद्या-झरे यांना अटकाव करणे, खनिज निर्मिती थांबवणे, तिचं संवर्धन करणाऱ्या जीवसृष्टीतील पशु-पक्ष्यांची शिकार करणे असे अनेक गुन्हे आपण कायम करत आलो आहोत आणि करत आहोत. आपले ग्रंथपुराण आपल्याला प्रगतीच्या दिशेनेच नेणारे आहेत. या आपल्या भूमीवर असणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी स्वर्गीय सुख आणि नंदनवन आहे. आपल्याला सर्व काही परमेश्वररूपी ऋषीमुनींनी सर्व ग्रंथातून दिलेलेच आहे. त्याचे अनुकरण आपल्याला करायलाच लागेल. याचे साक्षात स्वरूप मंदिरातील रचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्व जगात भारतीय संस्कृती श्रेष्ठ असण्याचे कारण हेच आहे की, भारतीय संस्कृतीत त्या ब्रह्मांडाचे आणि सर्व जीवसृष्टीचे संवर्धन आणि संरक्षण यांचे ज्ञान उच्च कोटीचे आहे. म्हणूनच भारतात वेद निर्मिती झालेली आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या कर्माची दिशा योग्य दिशेने वळवावीच लागेल.

जर खरंच या भूमातेची आपल्याला काळजी असेल, तर आपण आपल्या मातेसाठी (निसर्गासाठी), आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी शास्त्र आणि अध्यात्म समजून घ्यायला लागेल, गरजा कमी कराव्या लागतील, निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत-जास्त राहावे लागेल, संस्कृती आणि संस्कार जपावे लागतील. या पृथ्वीचे नंदनवन टिकवून ठेवून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे हेच आपले कर्म आहे, तरच आणि तरच आपण सुखा-समाधानाने आणि आनंदाने या पृथ्वीवर आपले स्थान निर्माण करू शकू.
dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -